मानव
By Admin | Published: January 14, 2015 03:44 AM2015-01-14T03:44:10+5:302015-01-14T03:44:10+5:30
मानव या शब्दामध्ये तीन अक्षरे आहेत. यामध्ये ‘मा’ म्हणजे अज्ञान, ‘न’ म्हणजे नष्ट करून, ‘व’ म्हणजे वर्तन करणारा! याचा पूर्ण अर्थ असा की, अज्ञान नष्ट करून वर्तन करणारा तो मानव!
अॅड. जयवंत महाराज बोधले -
मानव या शब्दामध्ये तीन अक्षरे आहेत. यामध्ये ‘मा’ म्हणजे अज्ञान, ‘न’ म्हणजे नष्ट करून, ‘व’ म्हणजे वर्तन करणारा! याचा पूर्ण अर्थ असा की, अज्ञान नष्ट करून वर्तन करणारा तो मानव!
परंतु, प्रश्न असा आहे की, मानवाच्या ठिकाणी असलेले हे अज्ञान नष्ट करण्याकरिता मानवाने काय केले पाहिजे? योगवासिष्ठामध्ये वसिष्ठ मुनी अज्ञान नष्ट करण्याकरिता संतसंगती, शास्त्रश्रवण, स्वप्रयत्न अशा तीन मार्गांनी मानवाने स्वत:च्या ठिकाणचे अज्ञान नष्ट करावे, असे सांगतात. मानवाच्या सर्व दु:खाचे मूळ हे त्याचे आत्मस्वरूपाविषयीचे अज्ञान आहे, असे वेदांतशास्त्र स्पष्ट सांगते. हे अज्ञान घालविण्याकरिता ज्ञानाचीच गरज आहे आणि आत्मस्वरूपाविषयीचे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार हा फक्त मानव योनीलाच भगवंतांनी दिलेला आहे.
वास्तविक विचार केला असता अलीकडच्या काळामध्ये मानवच मानवाला जाणत नाही, असेच आपल्याला दिसून येते. एका नावेमधून तीन मनुष्य नदीमध्ये विहार करायला निघाले. परंतु, अचानक मोठे वादळ आले आणि नाव पाण्यामध्ये बुडू लागली. तिघेही भगवंताचा धावा करू लागले. भगवान तिथे प्रकट झाले व तिघांकडेही पाहून भगवान म्हणाले की, मी कोणाही एकाला वाचवितो, बोला कोणाला वाचवू? त्यातील दोघे म्हणू लागले, देवा मला वाचवा. परंतु, तिसरा एका कडेला शांत बसलेला होता. भगवंतांनी त्याला विचारले, ‘तू काहीच बोलत नाही, तू सांग ना कोणाला वाचवायचे’, तो मनुष्य म्हणू लागला, ‘देवा मी ज्याला वाचव म्हणेन त्याला वाचवशील?’, देव म्हणाला, ‘हो वाचवेन’, सांग कोणाला वाचवायचे? तो मनुष्य म्हणाला, ‘देवा वाचवायचे असेल तर ‘वाचव मानवाला’!
या कथेमध्ये इतर भाग जरी काल्पनिक असला तरी ‘वाचव मानवाला’ ही मात्र वस्तुस्थिती आहे. मानवाचे जीवन हे त्याच्या बाह्य संपत्तीवरून श्रेष्ठ ठरत नसून त्याच्या आंतरिक संपत्तीवरून श्रेष्ठ ठरत असते. त्या आंतरिक संपत्तीलाच संत ज्ञानेश्वर महाराजांनी दैवी संपत्ती असे म्हटले आहे. आंतरिक संपत्तीला सोडून मिळविलेली बाह्य संपत्ती ही मानवाच्या सुखाला कारण होऊ शकत नाही. बऱ्याच वेळा मनुष्य बाह्य संपत्तीने मोठा झाला की तो आपण मनुष्य आहोत, हेच विसरून जातो आणि मानवाचा दानव होतो आणि म्हणूनच मानव कोणत्याही क्षेत्रात कार्य करीत असला तरी त्याच्या मानवी जीवनाला अध्यात्म्याचा स्पर्श असावा, त्याचे ‘मन’ हे सत्वगुणी असावे, असे झाले तर संत निळोबाराय म्हणतात तसे,
‘तनु मानवी दिव्य रुपीच केली।’
ही अवस्था प्राप्त होईल.