पर्यावरणाच्या ऱ्हासाला मानवी कृतीच जबाबदार

By Admin | Published: June 5, 2016 02:04 AM2016-06-05T02:04:30+5:302016-06-05T02:04:30+5:30

पर्यावरणाच्या हानीवरून विकसित देश आणि विकसनशील देश एकमेकांकडे बोटे दाखवत असली, तरी प्रत्येक देशातील नागरिक हा पर्यावरणाच्या हानीला जबाबदार आहे, याकडे लक्ष वेधावे लागेल.

Human action is responsible for the rehabilitation of the environment | पर्यावरणाच्या ऱ्हासाला मानवी कृतीच जबाबदार

पर्यावरणाच्या ऱ्हासाला मानवी कृतीच जबाबदार

googlenewsNext

- विजय अवसरे, निसर्गमित्र

पर्यावरणाच्या हानीवरून विकसित देश आणि विकसनशील देश एकमेकांकडे बोटे दाखवत असली, तरी प्रत्येक देशातील नागरिक हा पर्यावरणाच्या हानीला जबाबदार आहे, याकडे लक्ष वेधावे लागेल. आपण आपला म्हणजे वैयक्तिक आणि देशाचा विकास करताना पर्यावरणाला हानी पोहोचेल, अशा गोष्टी करतो. प्रथमत: त्या विकासाच्या गोष्टी आपणाला लहानसहान वाटतात. मात्र, याच लहानसहान गोष्टी कालांतराने अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण करतात. परिणामी, छोट्या-छोट्या मानवी कृतीच पर्यावरणाच्या हानीला जबाबदार ठरतात.
जागतिक पर्यावरणाचा दिनाचा विचार केवळ या दिनापुरती जनजागृती झाली, म्हणजे सर्वकाही झाले असे होत नाही. आपण पर्यावरणाच्या हानीला तंत्रज्ञानाला जबाबदार धरतो किंवा तसे ठोकताळे बांधतो. मुळात आपण काहीसा तत्त्वज्ञानाचाही विचार केला पाहिजे. तापमानवाढीच्या समस्येचे उत्तर अंतिमत: तंत्रज्ञानात नसून, ते तत्त्वज्ञानात आहे. खरे तत्त्वज्ञान म्हणते की, इच्छांपासून मुक्त होणे म्हणजे खरे स्वातंत्र्य. मात्र, हे अर्थशास्त्र म्हणते की, इच्छा पूर्ण करत राहणे म्हणजे स्वातंत्र्य. या मूलभूत पातळीवर विचार नेल्यास आता मानवजात व सृष्टी वाचेल.
कार्बन ऊर्जेला कार्बनरहित ऊर्जेने उत्तर देण्याचा पाश्चात्यांचा विचार घातक ठरेल. कारण आता त्यासाठी वेळ उपलब्ध नाही, शिवाय अशा ऊर्जेने नैसर्गिक संसाधनाचा, जंगलाचा नाश अधिक वेगाने होईल. तापमानवाढीला शहरीकरण कारणीभूत आहे. अनेक शहरे प्रदूषणाने ग्रस्त आहेत.
१९८० सालच्या सुमारास वातावरण बदलाचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले. भारतीय मान्सून तेव्हापासून अनियमित झाला. वेळापत्रक चुकू लागले. ऋतूचक्र विस्कळीत झाले. बाष्पीभवनाचा वेग वाढू लागला आणि अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत भर पडली. १ हजार ५०० शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास गटाने आपल्या चौथ्या आणि अंतिम अहवालात ‘जागतिक तापमानवाढ’ ही वस्तुस्थिती असल्याचे नमूद केले आहे. १७५० सालानंतर कार्बन डायआॅक्साईड आणि उष्णता शोषून घेणारी द्रव्ये व वायू मोठ्या प्रमाणावर वातावरणात सोडण्यात आले आहेत. मानवी कृतीमुळे दरवर्षी एक हजार कोटी टन कार्बन डायआॅक्साईड व तत्सम वायूची भर वातावरणात पडते आहे. १७५० सालाच्या तुलनेत पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानात सुमारे १.५ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली आहे. पृथ्वीवर यापूर्वी आलेल्या सर्वात मोठ्या उष्णयुगात म्हणजे, २५ कोटी वर्षांपूर्वी ९० टक्के जीवजाती नाहीशा झाल्या होत्या.
मुंबई शहर आणि उपनगरांत मोटारींमुळे शहरात दररोज तब्बल ९०० टन वायुप्रदूषण होत आहे. दुर्दैव म्हणजे, उद्योग आणि वाहने हे दोन घटक वायुप्रदूषणात सातत्याने भर घालत असून, त्यातील ८० टक्के प्रदूषण हे मोटारींमुळे होत आहे. म्हणजेच एवढे प्रदूषण करून आपण पर्यावरणाचा गळा घोटतो आहे. त्यामुळे आता केवळ मुंबईकरांनी नाही तर समस्त मानव जातीने पर्यावरणाचा विचार केला पाहिजे आणि सुरुवात स्वत:च्या घरापासून केली पाहिजे. घरातील कचरा कमी केला पाहिजे. सुका आणि ओला कचरा वेगळा केला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे, कचरा सुका आणि ओला कचरा वेगळे करण्याचे आवाहन यापूर्वीच महापालिकेने केले आहे.
महापालिकेने केलेल्या आवाहनाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. केवळ पर्यावरण दिनापुरती पर्यावरणाची जनजागृती केली, म्हणजे पर्यावरणाच्या समस्या मिटतील, असे नाही, तर सर्वच घटकांनी एकत्र येत, यासाठी पुढाकार घेऊन कृती आरंभ करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

Web Title: Human action is responsible for the rehabilitation of the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.