माणुसकी आणि सुरक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 04:40 AM2018-07-03T04:40:29+5:302018-07-03T04:40:39+5:30
अखेर मनुष्यधर्म मोठा की सरकारचे संरक्षक धोरण महत्त्वाचे? डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून व अमेरिका सुरक्षित करण्याचे धोरण जाहीर केल्यापासून त्यांच्यात व अमेरिकेतील मानवतावादी जनतेत संघर्षाची मोठी लाट उसळली आहे.
- सुरेश द्वादशीवार
(संपादक, नागपूर)
अखेर मनुष्यधर्म मोठा की सरकारचे संरक्षक धोरण महत्त्वाचे? डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून व अमेरिका सुरक्षित करण्याचे धोरण जाहीर केल्यापासून त्यांच्यात व अमेरिकेतील मानवतावादी जनतेत संघर्षाची मोठी लाट उसळली आहे. मुळात अमेरिका हा युरोप व अन्य देशातून आलेल्या निर्वासितांनी वसविलेला, वाढविलेला व समृद्ध केलेला देश आहे. खरे तर अमेरिका ही जगाच्या एकीकरणाची प्रयोगशाळाच आहे. परंतु ९-११ च्या ओसामा बिन लादेनच्या हल्ल्यापासून त्या देशाभोवती संरक्षक स्वरूपाची कायदेशीर व भौगोलिक तटबंदी उभी करण्याचा आणि त्यात नव्या लोकांना प्रवेश नाकारण्याचा प्रयत्न तेथील काही पक्षांनी व पुढाऱ्यांनी चालविला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या नेत्यांचे म्होरके असून त्यांनी प्रथम सात मुस्लीम देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाकारला आहे. त्यांच्या या भूमिकेला तेथील सर्वोच्च न्यायालयानेही आता उचलून धरले आहे. अमेरिकेच्या दक्षिण सीमेलगत असलेल्या मेक्सिको या देशाच्या सीमेवर एक अनुल्लंघ्य भिंत बांधून तिकडच्या लोकांवरही अशी प्रवेशबंदी लादण्याचा त्यांचा प्रयत्न आता सुरू आहे. तशी भिंत बांधून तीत विजेचा प्रवाह सोडण्याचा त्यांचा इरादा आहे. पुढल्या काळात व्हिसाचे नियम आणखी जाचक करून विदेशातून नोकरी व शिक्षणासाठी येणाºया तरुणांवर निर्बंध लादण्याचेही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांची ही बंदी एवढ्या अमानुष पातळीपर्यंत वाढली आहे की मेक्सिकोतून प्रथम आलेल्या आई-बापांना त्यांनी देशात राहू दिले मात्र त्यांच्या मुला-मुलींना व नवजात अर्भकांनाही अमेरिकेत प्रवेश नाकारला. ही मुले आता मोठ्या पिंजºयात वा तशा स्वरूपाच्या तुरुंगात मेक्सिकोच्या सीमेवर अडकली आहेत.
लहान मुलांना सोडा आणि त्यांच्या आईबापांजवळ जाऊ द्या अशी मागणी करणारे किमान एक हजारावर मोर्चे न्यूयॉर्कपासून टेक्सासपर्यंत त्या देशातील लोकांनी आजवर काढले. देशाचे संरक्षण ठीक, पण त्यासाठी माणुसकीवर आघात नको असे या मोर्चेकºयांचे म्हणणे आहे. डेमोक्रॅटिक पक्ष अशा प्रवेशाच्या बाजूने आहे तर प्रत्यक्ष ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष त्या प्रश्नावर विभागला गेला आहे. ‘बाहेरून येणारी माणसे देशात हिंसाचार आणतात, गुंडगिरी व गुन्हेगारी वाढवितात. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालणे आवश्यक आहे’ ही भूमिका ही मेक्सिकोएवढीच सगळ्या द. अमेरिकेबाबत व आता आशियाई देशांबद्दलही ट्रम्प घेत आहेत. अमेरिकेतील कर्मठ व पुराणमतवादी वर्गांचा त्यांच्या भूमिकेला पाठिंबा आहे आणि देश जुन्याच वळणावर ठेवणे त्यांना सुरक्षेचे वाटत आहे. ट्रम्प यांच्या भूमिकेमागे हा वर्ग उभा आहे. याउलट उदारमतवादी व मानवतावादी जनतेचा तिला विरोध आहे आणि अमेरिका हा मुळातच निर्वासितांनी वसविलेला, वाढविलेला व आजच्या वैभवापर्यंत आणलेला देश आहे असे त्यांचे म्हणणे आहे. थोडक्यात कर्मठ पुराणमतवादी आणि उदार मानवतावादी यांच्यातले व त्यांच्या भूमिकांमधले हे भांडण आहे. कॅनडा, जर्मनी, इटली व फ्रान्स यासारख्या पाश्चात्त्य लोकशाही देशांची भूमिका उदारमतवादी आहे आणि त्यातील नेत्यांनी या भूमिकेसाठी आपल्या देशातील पुराणमतवाद्यांचा रोषही ओढवून घेतला आहे. जर्मनीच्या अॅन्जेला मेर्केल, फ्रान्सचे इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी या भूमिकांसाठी आपला जनाधार कमी करून घेण्याचे धाडसही दाखविले आहे तर कॅनडाचे अध्यक्ष जस्टीन ट्रुड्यू यांनी आपल्या देशात सर्व निर्वासितांना निमंत्रण असल्याचे अमेरिकेचा रोष ओढवून घोषित केले आहे.
याच काळात दक्षिण-मध्य आशियातील अरब व मुस्लीम देशात वाढीला लागलेल्या इसीस किंवा बोको हरामसारख्या धर्मांध हिंसाचाºयांनी माजविलेल्या अतिरेकामुळे आपआपले देश सोडून सुरक्षित जागी निर्वासित म्हणून जायला निघालेल्या लोकांची संख्या सहा कोटींवर गेली आहे. ही माणसे असले-नसले किडुक-मिडुक घेऊन देश सोडतात आणि त्यांना नेणारी दुबळी जहाजे त्यांना हवे तिथपर्यंत पोहचवतही नाहीत. त्यातील अनेकजण प्रवासात मरतात आणि जे प्रत्यक्ष मुक्कामापर्यंत पोहचतात त्यांना तेथे प्रवेशही नाकारला जातो. अशा अनिकेत झालेल्या लक्षावधी लोकांसाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने आता निवारे उभारले आहेत. त्यात पुरेसे अन्न नाही, पाणी नाही, स्वच्छतेच्या व्यवस्था नाहीत. अशा स्थितीत ही माणसे आपापली कुटुंबे घेऊन कशीबशी जगतात व आलेल्या रोगराईला तोंड देतात. साºया जगात अशा अनिकेतांविषयीची सहानुभूतीची लाट आता उभी होत आहे. अमेरिकेपासून चीनपर्यंतचे सारे लोकशाहीवादी व मानवतावादी लोक तशा स्वरूपाच्या जागतिक संघटनांसोबत या माणसांना कायमचे सुरक्षित स्थान मिळावे या प्रयत्नात आहेत. मात्र विदेशात जागा नाही आणि स्वदेशात राहण्याची सोय नाही या शृंगापत्तीत सापडलेल्या या लोकांची तथाकथित राष्टÑवादी, पुराणमतवादी व धर्मांध लोकांना जराही कणव नाही. आपल्याकडचे साधे उदाहरण द्यायचे तर ते खेड्यातून येऊन शहरात वस्ती शोधणाºया आणि ती न सापडलेल्या लोकांचे सांगता येईल. मोठ्या घरांच्या आसºयाने व फुटपाथवर जगून आयुष्य काढणाºया या लोकांच्या कहाण्या आपल्या परिचयाच्या आहेत. हाच प्रकार जगाच्या पातळीवर अमेरिका, युरोप आणि दक्षिण-मध्य आशिया यातील देश आज अनुभवत आहेत. एका अर्थाने राष्टÑधर्म किंवा देशाच्या सीमांबाबतची सावधानता आणि मनुष्यधर्म यातील ही कमालीची विषम लढाई आहे. राष्ट्रे लष्करसज्ज व सार्वभौम आहेत तर निर्वासितांचे वर्ग अर्धपोटी, नि:शस्त्र व निराधार आहेत. भारताच्या पूर्व सीमेवरील रोहिंग्या आदिवासींची समस्याही अशीच आहे. हे रोहिंगे इतिहासात कधीकाळी जाणता न जाणता मुसलमान झाले एवढाच त्यांचा अपराध. म्यानमार त्यांना देशात राहू देत नाही आणि बांगला देशात त्यांना जागा नाही. दोन्ही बाजूंनी मरण भोगत हा दरिद्री अनिकेतांचा वर्ग जगाकडे जगण्याची भीक मागत आहे. निर्वासितांना नेता नसतो, त्यांना वेळेवर मिळणारे उत्पन्न नसते आणि आपल्या मुलाबाळांचे उद्या काय होईल याची भ्रांत नसते. भूतकाळ गमावलेला, भविष्यकाळ नसलेला आणि वर्तमानकाळ हातात नसलेल्यांचा हा वर्ग आहे आणि तरीही तो आपल्यासारखाच माणसांचा वर्ग आहे.
वास्तव हे की जगाच्या उत्पत्तीला काही अब्ज वर्षे लोटली. धर्मांचे जन्म गेल्या चार हजार वर्षातले तर देशांचे गेल्या तीन-साडेतीनशे वर्षातले आहेत. आजचे निम्मे जग गेल्या १०० वर्षातच देश म्हणून अस्तित्वात आले. तात्पर्य, देश नवे, धर्म नवे, मात्र माणूस व जग जुने आहेत. नव्या जगाने जुन्या जगाला निर्वासित व अनिकेत करण्याचा घेतलेला हा आताचा अमानुष वसा आहे. जगाच्या मानेभोवती आवळलेले व त्यानेच निर्माण केलेले निर्वासितांचे हे मानवी संकट आहे. त्यातून त्याची मुक्तता कधी व कशी होईल हा साºयांना भेडसावणारा प्रश्न आहे.