माणुसकी घुसमटली !

By सचिन जवळकोटे | Published: February 9, 2020 07:24 AM2020-02-09T07:24:55+5:302020-02-09T07:27:12+5:30

मुर्दाडांची बरणी.. मुक्या जीवाची करुण कहाणी..

Humanity has gone! | माणुसकी घुसमटली !

माणुसकी घुसमटली !

googlenewsNext

- सचिन जवळकोटे

‘लगाव बत्ती’मधून आजपावेतो आपण कैक ‘खादी’वाल्यांची ‘टोपी’ उडविलेली. पांढºयाशुभ्र कपड्याआडची काळीबेरी कहाणीही उलगडलेली; मात्र आजचा विषय एकदम वेगळा. भलताच संवेदनशील. मुर्दाडगिरीचा पर्दाफाश करणारा. घुसमटलेल्या माणुसकीचा टाहो तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा अस्वस्थ प्रयत्न करणारा.

तब्बल अठ्ठेचाळीस तास व्याकुळलेली वणवण..

   स्थळ : करमाळा प्रशासकीय कार्यालय. आपापल्या कामानिमित्त खेडोपाडीची मंडळी आलेली. एवढ्यात एक वेगळं दृष्य अनेकांना दिसलं. ते पाहून कुणाला हसू आलं तर कुणी चुकचुकलं. काही जणांना तर तिकडं पाहायलाही वेळ नव्हता. काहींची इच्छाही नव्हती; मात्र त्याचवेळी तिथं उपस्थित असणाºया आमच्या प्रतिनिधीला या दृष्यातलं वेगळेपण जाणवलं. नासीर कबीर यांनी पटकन् मोबाईल काढला, कॅमेरा आॅन केला. पटापटा दोन-चार फोटो काढले. आपल्या गावचा पत्रकार कशाचे फोटो काढतो, या उत्सुकतेपोटी काहीजणांचे पाय थबकले. नजरा वळल्या. दृष्य पाहून पुन्हा आपापल्या कामाला लागल्या.

   दृष्य म्हटलं तर खूप साधं होतं. म्हटलं तर काळीज पिळविटणारं होतं. एका भटक्या कुत्र्याचं तोंड प्लास्टिकच्या बरणीत अडकलेलं होतं. ती बरणी घेऊन बिच्चारं अस्वस्थपणे भटकत होतं. केविलवाणेपणे लोकांकडं बघत होतं. इकडं या मुक्या प्राण्याचा जीव बरणीत घुसमटतोय, तर तिकडं लोकांसाठी तो टिंगलटवाळीचा विषय बनतोय, हे पाहून प्रस्तुत प्रतिनिधीनं दोघा-तिघांना आवाहन केलं. बरणीच्या विळख्यातून त्याचं तोंड मुक्त करण्याची विनंतीही केली.
  
  तेव्हा एका-दोघांनी त्या कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र तोंडावरच्या बरणीपेक्षाही आपल्याकडे धावून येणाºया माणसांची भीती त्याला अधिक वाटली असावी. तो बरणीतल्या बरणीतच केकाटत दूर पळाला. त्यानंतर चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात भटकू लागला. तिथंही दिगंबर कांबळे अन् हनुमंत सुतार यांनी त्याला पकडून ती बरणी काढण्याचा प्रयत्न केला; मात्र इथंही यश आलंच नाही.
  
   बोलता-बोलता एकानं सांगितलं, ‘ह्ये बेणं दोन दिसांपासून बरणी घिऊनशान फिरतंया. इतंच झोपतया.. पन त्याला काय खायला येत नाय आन् प्यायलाबी जमत नाय,’ सांगणाºयाच्या चेहºयावर कौतुक होतं. ही ‘ब्रेकिंग न्यूज’ फक्त आपल्यालाच कशी माहीत; याचा आनंद होता. बाकी त्या मुक्या प्राण्याच्या वेदनेशी कसलंच सोयरसुतक नव्हतं. तब्बल अठ्ठेचाळीस तासांपासून एक मुका जीव बरणीची नरकयातना सोबत घेऊन तहानलेल्या अवस्थेत उपाशीपोटी अख्ख्या गावात फिरत होतं; पण कुणालाच त्याच्याशी देणं घेणं नव्हतं. आलाच संबंध तर हसण्यापुरता होता. निसर्गाच्या विनोदाला दाद देण्यापुरता होता.

  ...अन् हा विनोद नैसर्गिक तर कसा ? पुरता मानवी विकृतीनं झपाटलेला. कामापुरती वापरून बरणी रस्त्यावर टाकून देणारा माणूसच. त्यानंतर त्यात अडकलेल्या तोंडानिशी गावभर काकुळतीनं फिरणाºया कुत्र्यावर हसणारा माणूसच. खरंच, वाळवंटात तडफडणाºया गाढवाला रामेश्वरचं पाणी पाजणाºया संत एकनाथ महाराजांचा हा का तो महाराष्ट्र ? चपाती घेऊन पळालेल्या कुत्र्याच्या मागं तुपाची वाटी घेऊन धावणाºया संत नामदेव महाराजांची ही का ती मराठी माती ?

  जाता जाता : तब्बल दोन-तीन दिवस ती बरणी घेऊन अस्वस्थपणे गावभर फिरणारं कुत्रं नंतर म्हणे कुणाला दिसलंच नाही. कुणी म्हणालं, ‘बहुधा अन्नपाणी न मिळाल्यानं उपाशीपोटी मेलं असावं’, .. कुणाला तर  म्हणे वाटलं,‘एकाद्यानं ती बरणी काढून टाकून त्या कुत्र्याची सुटका केली गेली असावी.’ खरं खोटं कुणाला माहीत; मात्र एक खरं...मुर्दाड बनत चाललेल्या जगात माणुसकी पुरती घुसमटलेली होती. लगाव बत्ती !

हायवे’वरच्या भीषण अपघातातही 
लाईक अँड कमेंटस्च्या किंकाळ्या !

  मध्यंतरी मोहोळजवळ ‘हायवे’वर भीषण अपघात घडलेला. एक कार भरवेगात उलटून दूरवर शेतात जाऊन कलंडलेली. आतली माणसं बाहेर फेकली गेलेली. कुणाचं डोकं फुटलेलं, तर कुणी जागीच गेलेलं. सर्वत्र काचांचा विळखा, रक्ताचा सडा. अशावेळी रस्त्यावरनं जाणारी-येणारी माणसं तिथं धावली. कारमध्ये अडकलेल्यांना काढण्याचा प्रयत्न दोघं-तिघं करू लागली. बाकीची मात्र हातात मोबाईल घेऊन हा भीषण अपघात ‘लाईव्ह कॅप्चर’ करण्यात गुंतली. कुणी विव्हळणाºयांचा आवाज ‘व्हिडिओ’तून टिपू लागला तर कुणी रक्ताळलेल्या मृतांचे उघडे डोळे ‘फोटो’तून सेव्ह करू लागला.
 
  या मोबाईलबहाद्दरांना ना मृत्यूशय्येवरच्या असहाय्य जीवाची काळजी होती...ना जागीच गतप्राण झालेल्या इवल्याशा जीवाचं दु:ख. त्यांना फक्त एकच घाई झालेली. कधी एकदा हे सारे व्हिडिओ अन् फोटोज सोशल मीडियावर टाकतो.. कधी एकदा जगाला सर्वप्रथम ‘ब्रेकिंग न्यूज’ आपणच सांगतो... कधी एकदा सर्वाधिक लाईक अन् कमेंटसचा विक्रम आपल्या अकौंटवर जमा करतो. होय...मुर्दाडांच्या जगात माणुसकी पुरती बावचळली होती. लगाव बत्ती !

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Humanity has gone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.