राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षे; पुढची शंभर वर्षेही निश्चितच टिकेल, अधिक बलशाली होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2024 07:48 AM2024-10-12T07:48:39+5:302024-10-12T07:49:03+5:30

शतकी वर्षात पाऊल ठेवत असलेल्या संघाने हिंदुंचे प्रभावशाली, आक्रमक संघटन उभे करताना ते अतिरेकी, अविवेकी होणार नाही, याची तेवढीच दक्षता घेतली.

hundred years of rss rashtriya swayamsevak sangh | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षे; पुढची शंभर वर्षेही निश्चितच टिकेल, अधिक बलशाली होईल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षे; पुढची शंभर वर्षेही निश्चितच टिकेल, अधिक बलशाली होईल

जगातील अत्यंत प्रभावी संघटनांपैकी एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आजच्या विजयादशमीपासून सुरू होत आहे. क्रांतिकारकांसोबत स्वातंत्र्यलढ्यात उतरलेले आणि पुढे काँग्रेसमध्ये राहूनही तितक्याच तन्मयतेने राष्ट्रकार्य केलेले डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी स्वातंत्र्यासाठी लढतानाच मुळात आपल्या देशाला  मुघलांच्या, ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात का राहावे लागले, याचे चिंतन केले. या चिंतनातून हिंदुंना संघटित करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. 

गेल्या दहा दशकांत संघ जगभर पोहोचला. केवळ सात स्वयंसेवकांच्या साथीने नागपुरात पहिली संघशाखा सुरू झाली, आज संघ सातासमुद्रापलीकडे विस्तारला आहे. शतकी प्रवासात या  संघटनेने टीकेचे, हेटाळणीचे अनेक वार झेलले. मनुवादी, ब्राह्मणवादी, जातीयवादी म्हणून संघाला हिणवणारे कमी नव्हतेच, पण समर्पित भावनेने अविचल, अविरत कार्यरत राहणाऱ्या हजारो, लाखो स्वयंसेवकांच्या साथीने संघाची दमदार वाटचाल सुरूच राहिली. डॉ. हेडगेवार यांच्या आधी हिंदुत्त्वाचा विचार अनेकांनी मांडला होता. पण, डॉक्टरांनी आपल्या विचाराला कृतीचे सातत्य असलेल्या संघशाखांची मजबूत जोड दिली. हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचा मिलाफ त्यांनी घडवून आणला आणि  हिंदुंना आत्मभान दिले. या देशातील हिंदू संघटित आणि सशक्त होऊ शकतो, हे सिद्ध करून दाखविणारे डॉ. हेडगेवार हे द्रष्टे नेते होते. हे संघटन टिकवायचे असेल तर समाजाच्या विविध क्षेत्रात त्याचा विस्तार झाला पाहिजे आणि त्याला विधायक कार्याची जोड दिली पाहिजे. या विचारातून मग संघ परिवारात एकेक करून तब्बल ३२ प्रभावशाली संघटना सक्षमपणे उभ्या झाल्या. त्यापैकीच एक असलेला भारतीय जनता पक्ष गेली दहा वर्षे केंद्रात सत्तेत आहे. 

आजवर अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी हे दोन संघप्रचारकच पंतप्रधान झाले. आज समाजाचे एकही क्षेत्र असे नाही, की जिथे संघ विचारातून निर्माण झालेल्या संघटनांचा दबदबा नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येनंतर पहिल्यांदा, १९७५च्या आणीबाणीमध्ये दुसऱ्यांदा आणि १९९२मध्ये अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडली गेल्यानंतर एकदा अशी तीनवेळा संघावर बंदी आली. मात्र, त्यातून संघ संपला तर नाहीच उलट उत्तरोत्तर मोठा होत गेला. संघ आडमुठा आहे; बदल स्वीकारत नाही, अशी टीका केली जाते. पण, काळाच्या कसोटीवर स्वत:ला सिद्ध करत संघाने लहान-मोठे बदल स्वत:मध्ये घडवून आणले. गणवेश बदलला, हे किरकोळ झाले. पण ‘बंच ऑफ थॉट’मध्ये श्री. गोळवलकर गुरुजी यांनी लिहिलेले ‘मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट हे हिंदुंचे सर्वांत मोठे शत्रू आहेत’ हे वाक्य आणि त्यानुषंगाने केलेले विवेचन संघाकडून जाहीरपणे काढले गेले. 

आपल्या पूर्वसुरींचे अंधानुकरण केले जाणार नाही, हा मोठा संदेश त्यातून दिला गेला. डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, प्रा. राजेंद्रसिंह उपाख्य रज्जूभैया, के. सी. सुदर्शन आणि आताचे डॉ. मोहन भागवत या सर्व सरसंघचालकांनी संघविस्तारात वेगवेगळ्या पद्धतीने अमूल्य योगदान दिले.  रा. स्व. संघाची खरी शक्ती कशामध्ये आहे? याची वेगवेगळी उत्तरे येऊ शकतात. पण, संघाच्या अभ्यासकांची मते एकत्र केली तर तीन शक्तिकेंद्रे ही नक्कीच सामायिक दिसतील. एक म्हणजे संघाचा स्वयंसेवक, संघ शाखा आणि विनावेतन, विनाअपेक्षेने देशभर, जगभर कार्यरत असलेले संघ प्रचारक. लाखो स्वयंसेवकांचे पाय आजही संघशाखेकडे वळतात, हे विलक्षण आहे. 

जगातल्या इतर कोणत्याही संघटनेला हे इतका दीर्घकाळ जमलेले नाही. संघाने स्वयंसेवकांना अर्थसहाय्य वगैरे कधीही केले नाही. उलट लाखो स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजाला गुरु मानत त्याच्या चरणी आजवर गुरुदक्षिणा वाहिली आहे. देशावर जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा तेव्हा संघ स्वयंसेवकांनी तन-मन-धनाने अजोड असे सेवाकार्य केले.  प्रचारकांची यंत्रणा तर अद्वितीयच आहे. विशीतले, तिशीतले असंख्य कर्तृत्ववान, हुशार तरुण आपले अख्खे आयुष्य प्रचारक म्हणून संघाला देतात. वैयक्तिक, खासगी आयुष्याला मूठमाती देऊन राष्ट्रकार्यासाठी आसेतूहिमाचल कुठेही जातात; स्वत:ला झोकून देतात. संघाने देशकार्यासाठी घालून दिलेली ही विलक्षण अशी व्यवस्था आहे. 

शतकी वर्षात पाऊल ठेवत असलेल्या संघाने हिंदुंचे प्रभावशाली, आक्रमक संघटन उभे करताना ते अतिरेकी, अविवेकी होणार नाही, याची तेवढीच दक्षता घेतली. शंभरीत प्रवेश करत असलेला संघ पुढची शंभर वर्षेही निश्चितच टिकेल, अधिक बलशाली होईल, असा विश्वास आजवरच्या संघकार्याने नक्कीच दिला आहे.

 

Web Title: hundred years of rss rashtriya swayamsevak sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.