एका व्हॅनच्या माध्यमातून वाचविले शेकडोंचे प्राण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2023 08:20 AM2023-08-16T08:20:06+5:302023-08-16T08:21:46+5:30
घाना या देशात जन्मलेल्या बोटेंग याने लहानपणापासून अनेक मृत्यू बघितले. यापैकी अनेक मृत्यू केवळ आरोग्यसेवेअभावी झालेले होते.
२८ वर्षांच्या ओसेई बोटेंग या तरुण मुलाला एकाच स्वप्नाने पछाडलेले आहे आणि ते म्हणजे घाना या देशातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे. स्वतः घाना या देशात जन्मलेल्या बोटेंग याने लहानपणापासून अनेक मृत्यू बघितले. यापैकी अनेक मृत्यू केवळ आरोग्यसेवेअभावी झालेले होते.
अनेक लोकांना झालेले आजार हे एक तर सहज टाळण्यासारखे असत किंवा सहज उपचार करण्यासारखे असत. मात्र, घाना देशाच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात कुठल्याही प्रकारची आरोग्य व्यवस्था पोहोचलेलीच नव्हती. त्यामुळे असे अनेक मृत्यू तिथे होत असत. बोटेंगची आत्या आणि आजी या दोघींचाही मृत्यू अशाच किरकोळ आजारांमुळे झाला.
बोटेंग म्हणतो, "माझी आजी ही माझ्या आयुष्याचा फार मोठा भाग होती. तिच्या मृत्यूमुळे आम्हा सगळ्यांचंच फार नुकसान झालं." घानामधील सरासरी आयुर्मर्यादा ६४ वर्षे आहे आणि अजूनही तिथल्या मृत्यूंचं कारण हे मलेरिया, स्ट्रोक किंवा श्वसनाचे आजार, असं काही तरी असतं. वेळेवर उपचार मिळाले तर हे आजार सहज बरे होतात.मात्र, घानामध्ये हे आजार अनेकदा प्राणघातक ठरतात.
पण बोटेंगने ठरवले की, या परिस्थितीत आपण काही तरी बदल केला पाहिजे. आपल्या देशातील लोकांना वेळेवर योग्य आरोग्यसेवा देता यावी यासाठी त्याने काम करायचे ठरवले. त्याने अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात जीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवली. त्यानंतर हेल्थकेअर अॅडमिनिस्ट्रेशन आरोग्यसेवा पुरविणे या विषयात उच्चशिक्षण घेतले. तो म्हणतो, 'हे शिक्षण घेत असताना मी उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांबद्दल शिकलो. असे काही आजार असू शकतात आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकतो याची माझ्या देशातील लोकांना कल्पनाही नव्हती. मात्र, घानामधील एकूण आरोग्यसेवा किंवा त्याचा अभाव लक्षात घेता आमच्या लोकांना वेळेवर तपासण्या करून घेणं शक्यच नव्हतं.'
त्याच्या असेही लक्षात आले की आरोग्य या विषयाबाबत लोकांमध्ये जनजागृतीच झालेली नव्हती. त्याचबरोबर आजार होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणे हेही कोणी करत नव्हते. या सगळ्यावर कडी म्हणून डॉक्टरकडे जाणे हेही ग्रामीण आणि दुर्गम घानामध्ये राहणाऱ्या बहुतेक नागरिकांना शक्य नव्हते.
बोग म्हणतो, 'माझ्या हे लक्षात आले, की ते हातावर पोट असलेले लोक आहेत. बाजारात काय आणि किती विकले जाईल यावर त्यांना काय खायला मिळेल हे अवलंबून असते. त्यामुळे त्यांना डॉक्टरकडे जा, असे सांगून काहीच उपयोग नव्हता.
पण रुग्ण जरी डॉक्टरकडे येऊ शकत नसतील तरी डॉक्टर तर रुग्णांकडे जाऊ शकतो, असा विचार करून बोटेंग याने गावोगावी आरोग्यसेवा पुरवण्यासाठी एक व्हॅन विकत घेतली. हे काम उभे करण्यासाठी त्याने २०२१ साली ओकेबी होप नावाची एक संस्था स्थापन केली. त्यामार्फत त्याने ही व्हॅन घेऊन गावोगावी जायला सुरुवात केली. या व्हॅनमध्ये एक नर्स, डॉक्टर, सहायक आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी मदतनीस एवढी टीम असते. त्याशिवाय व्हॅनमध्ये काही मूलभूत रक्त, लघवीच्या चाचण्याही करता येतात. काही नेहमी लागणारी औषधे त्या गाडीत त्याची टीम घेऊन जाते आणि तिथल्या तिथे लोकांना देते. ही व्हॅन म्हणजे लोकांसाठी आरोग्याच्या एक खिडकी योजनेसारखे काम करते. तिथे तपासणी करायला येणाऱ्या बहुतेक लोकांना काही ना काही आजार झालेले असतात. या व्हॅनच्या माध्यमातून बोटेंगने शेकडो लोकांचे प्राण वाचवले!
सुरुवात केल्यापासून आजवर या होप हेल्थ व्हॅनने ४५ वस्त्यांवर राहणाऱ्या ४,००० नागरिकांपर्यंत मूलभूत आरोग्यसेवा पोहोचवली आहे. या हेल्थ व्हॅनचे काम अधिक परिणामकारण पद्धतीने होण्यासाठी बोटेंगच्या संस्थेने २० स्थानिक आरोग्य स्वयंसेवक तयार केले आहेत. हे स्वयंसेवक लोकांचा रक्तदाब आणि रक्तातील शर्करा यासारख्या सोप्या तपासण्या करतात. ते मेडिकल टीमच्या लोकांना ही माहिती देऊन त्यांच्याकडून पुढच्या उपचारांची दिशा समजून घेऊन ती रुग्णांना देतात. ज्यांची तब्येत धोकादायक गटात मोडणारी असते त्यांना याचा उपयोग होतो. आजवर या आरोग्य स्वयंसेवकांनी १००० पेक्षा अधिक लोकांना मदत केली आहे.
मानसिक आरोग्यासाठीही झपाटलेपण!
मानसिक आरोग्याबद्दल जाणीवजागृती करणे हेही काम बोटेंची संस्था करते. घानामध्ये तुम्हाला मानसिक आरोग्यासाठी मदत हवी आहे, असे म्हटले तरी तुम्ही कमकुवत आहात असे समजले जाते. मात्र, बोटेंगला लोकांचे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे आरोग्य सुधारायचे आहे. त्यामुळे तो शाळाशाळांमध्ये मानसिक आरोग्याबद्दल जाणीवजागृती शिबिरे घेतो. आरोग्यसेवेचे हे मॉडेल सब-सहारन आफ्रिकेतील सगळ्या देशांमध्ये राबवले जावे यासाठी तो काम करतो आहे.