उपाशीपोटी जनतेला शांती!
By सचिन जवळकोटे | Published: July 5, 2018 06:37 AM2018-07-05T06:37:17+5:302018-07-05T06:37:37+5:30
टीव्हीवरील लोकप्रिय ‘जनता की अदालत’ शोमध्ये बंडोपंतांना ‘अँकरिंग’ची संधी मिळाली, तेव्हा ते भलतेच हरखले. त्यांनी या ‘शो’मध्ये नवा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. केवळ एकाच ‘होस्ट’ला न बोलविता तमाम नेतेमंडळींना यात आमंत्रित केलं गेलं.
टीव्हीवरील लोकप्रिय ‘जनता की अदालत’ शोमध्ये बंडोपंतांना ‘अँकरिंग’ची संधी मिळाली, तेव्हा ते भलतेच हरखले. त्यांनी या ‘शो’मध्ये नवा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. केवळ एकाच ‘होस्ट’ला न बोलविता तमाम नेतेमंडळींना यात आमंत्रित केलं गेलं. एकच प्रश्न सर्वांना विचारून यातून अचूक उत्तर देणाऱ्याला किताब जाहीर करण्याची घोषणा केली गेली. मात्र, अट एकच. प्रत्येकानं खरं-खरं बोलायचं. सारे नेते स्टुडिओत जमले... अन् मग कायऽऽ... सुरुवात झाली धमाल सवाल-जवाबाची.
बंडोपंतांनी पहिला प्रश्न विचारला, ‘रेल्वे पूल कोसळला. त्याला जबाबदार कोण?’ पटकन् दोन हात वर झाले; परंतु एकमेकांकडं बोटं दाखविण्यासाठीच. आशिषभार्इंनी ‘उद्धों’कडं बोट केलं तर महापालिकेतल्या ‘विश्वनाथअण्णां’नी ‘पीयूषभार्इं’कडं. ‘शिशिर’भाऊंनी मात्र ‘राज’कडं बोट केलं, ‘यांचं इंजिन नीट चाललं नाही म्हणून हेच रेल्वेच्या अधोगतीला जबाबदार,’ असं सांगत त्यांनी हातातलं ‘सेकंड हॅन्ड शिवबंधन’ दाखविलं. कुणीतरी हळूच मागून खुसपुसलं, ‘धावता येईना... रेल्वे रूळ वाकडं.’
बंडोपंतांचा दुसरा प्रश्न होता, ‘यंदा पावसाला चांगलीच सुरुवात झाली, हे कुणामुळं घडलं?’ युवराज ‘आदित्य’राजे झटकन हात वर करत मोठ्या कौतुकानं उद्गारले, ‘हे तर केवळ आमच्या पिताश्रींमुळंच घडलं. आजपर्यंत ते नुसतेच एवढे गरजले... एवढे गरजले की, शेवटी लाजून खरे-खुरे ढगच बरसले.’
‘जळगावातल्या नाथाभाऊंना अडगळीत कुणी बसविलं?,’ असा पुढचा प्रश्न बंडोपंतांनी विचारताच ‘अंजलीताई’ हात वर करणार होत्या. एवढ्यात बेलिफानं त्यांच्या हातात नव्या केसचं समन्स ठेवलं. त्यामुळं त्या गप्पच राहिल्या. ‘देवेंद्रपंत’ मात्र ‘गिरीशभाऊं’च्या कानात कुजबुजले, ‘यात सोलापूरचे सुभाषबापू अन् बीडच्या पंकजातार्इंचंही नाव असतं तर मीही मोठ्या प्रामाणिकपणे हात वर केला असता.’
बंडोपंतांनी पुढचा प्रश्न विचारला, ‘महाराष्ट्रात कमळाचा घमघमाट कुणामुळं अधिक पसरला?’ या प्रश्नावर मात्र अनेक ‘हात’वाल्यांचे हात वर आले. प्रत्येक जण प्रामाणिकपणे शपथेवर सांगू लागला, ‘माझ्यामुळंऽऽ माझ्यामुळंऽऽ.’ बहुधा सत्ता जाऊन चार वर्षे उलटली तरीही श्रेय घेण्याची सवय काही सुटली नसावी. अजूनही एक होण्याची मानसिकता नसावी.
बंडोपंतांनी पुढचा प्रश्न टाकला, ‘कर्जमाफी नेमकी कुणामुळे झाली?’ तेव्हा ‘थोरले काका बारामतीकर’ यांनी शांतपणे हात वर केला. काही जणांना वाटलं, काकांनी ‘शिष्यनमों’ना कानमंत्र दिल्यामुळंच कदाचित कर्जमाफी झाली... पण ‘काकां’नी सांगितलेलं धक्कादायक होतं, ‘ गेल्या काही दशकांत आम्ही शेतकºयांना प्रचंड कर्जात बुडविलं म्हणूनच कर्जमाफी झाली. हे शेतकरी कर्जबाजारी झाले नसते तर कुठनं आली असती डोंबल्याची माफी?’
असो... बंडोपंतांनी आता अखेरचा प्रश्न विचारला, ‘महागाईनं पिचलेल्या जनतेला मानसिक उभारी देण्यासाठी आहे का कुणाकडं मास्टर प्लॅन?’ तेव्हा सा-यांना फक्त ‘रामदास’च आठवले... कारण त्यांनी तत्काळ हात वर करून छानपैकी एक कविताही म्हणून टाकलेली, ‘उपाशीपोटी म्हणे, होत नसते क्रांती... माझ्या कवितांमुळे तेवढीच, खंगलेल्या जनतेला शांती!’
(तिरकस)