हुरड्यासंगे भविष्यवाणी...
By सचिन जवळकोटे | Published: January 4, 2018 12:06 AM2018-01-04T00:06:31+5:302018-01-04T00:07:23+5:30
थोरल्या बारामतीकरांचं भविष्य सुशीलकुमारांनी वर्तविल्यापासून चर्चेला ऊत आलेला. अनेक नेते सुशीलकुमारांना आपला हात दाखविण्यासाठी भेटायला आसुसलेले. (तसं तर सोलापुरातल्या काही सहका-यांनी त्यांना यापूर्वीच हात दाखविलेला म्हणा.) तेव्हा सुशीलकुमारांनी आपल्या ‘जाई-जुई’ फार्मवर अस्सल सोलापुरी हुरड्याचा बेत रचला.
थोरल्या बारामतीकरांचं भविष्य सुशीलकुमारांनी वर्तविल्यापासून चर्चेला ऊत आलेला. अनेक नेते सुशीलकुमारांना आपला हात दाखविण्यासाठी भेटायला आसुसलेले. (तसं तर सोलापुरातल्या काही सहका-यांनी त्यांना यापूर्वीच हात दाखविलेला म्हणा.) तेव्हा सुशीलकुमारांनी आपल्या ‘जाई-जुई’ फार्मवर अस्सल सोलापुरी हुरड्याचा बेत रचला. सर्वांना आमंत्रणं गेली. नेत्यांच्या गाड्या टाकळीच्या दिशेनं धावू लागल्या.
गाडीतून सर्वप्रथम पतंगराव उतरले. स्वागतावेळी त्यांंनी शेजारच्या विश्वजित यांना पुढं केलं. कदाचित आपल्यापेक्षा चिरंजीवांचं भविष्य जाणून घेण्याची गरज अधिक असावी. यानंतर आले जाकीटवाले सुधीरभाऊ अन् विनोदभाऊ. बहुधा देवेंद्रपंत येण्यापूर्वीच ‘सेल्फी’ काढून घेण्याचा इरादा असावा. नाहीतरी आपलं ‘फोटोसेशन’ पंतांच्या डोळ्यात येऊ नये, यासाठी विनोदभाऊ नेहमीच सतर्क असायचे.
एवढ्यात ‘मातोश्री’हून उद्धोंसोबत युवराजही आले. झाडाखालच्या सतरंजीवर बसताना पिताश्रींच्या कानात युवराज पुटपुटले, ‘व्हॉट इज धिसऽऽ? मांडी घालून बसताना माझ्या जीन पॅन्टला माती लागेल ना. आमच्या नाईट लाईफमध्ये असलं काही नसतं हंऽऽ’ हे ऐकून चपापलेल्या पिताश्रींनी युवराजांना ‘शेतकºयांची काळजी’ हे पुस्तक वाचायला दिलं, मात्र युवराजांनी ‘काळजी म्हणजे कळवळा नाऽऽ’ असा प्रश्न जोरात विचारताच पिताश्री पुन्हा गडबडले. त्यानंतर नेहमीप्रमाणं मोबाईलवर बोलत पंकजाताई गाडीतून उतरल्या. त्यांच्या सोबत असलेले महादेवदादा अन् सदाभाऊ ‘तार्इंच्या वाटेत कुठं काटे तर नाहीत ना?’ याचा शोध घेण्यातच दंग होते.
एकेक मंडळी येऊ लागली. देवेंद्रपंत आले. चंद्रकांतदादाही आले. विजयदादा मात्र थोरले बारामतीकर अन् देवेंद्रपंत या दोघांमध्ये समान अंतर ठेवून बसले. चांगला हुरडा खाण्यासाठी कुणाकडं सरकावं, याचा २अंदाज बांधू लागले. मात्र, अजितदादांनी खुणावताच माढ्याच्या संजयमामांनी शेंगा चटणी देण्याच्या निमित्तानं पंतांशी जवळीक साधली. त्यामुळं विजयदादांची गोची झाली. इकडं भट्टीतली कोवळी कणसं तडतडू लागली. सोबतीला राजाराणी, गूळ अन् भरलं वांगं होतंच. एकनाथभाऊंच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या अजितदादांनी स्वत:च्या हातानं हुरडा चोळून त्यांना देण्यास सुरुवात केली. तेव्हा अस्वस्थ झालेल्या देवेंद्रपंतांनी दोघांनाही टोमणा हाणलाच, ‘जरा हळू दादाऽऽ भाऊंच्या नादानं तुमचेही हात काळे होऊ देऊ नका.’
तिकडं बांधावरचा रानमेवा घेऊन गप्पा मारत तासगावच्या स्मिताताई अन् सोलापूरच्या प्रणितीताईही जवळ आल्या. ‘लग्न ठरल्यानंतरच्या गोष्टीऽऽ’ एवढंच स्मितातार्इंच्या तोंडून काहीतरी वाक्य इतरांना ऐकू आलं. पप्पांजवळ आल्यानंतर प्रणितीतार्इंनी हात पुढं करताच त्यांचीही काहीतरी ‘गोड भविष्यवाणी’ जाहीर होणार, या आनंदोत्सुकतेनं सारेजण सुशीलकुमारांकडं पाहू लागले. तेव्हा नेहमीचं मिश्किल हास्य फेकत प्रणितीतार्इंच्या हातात हुरडा ठेवून सुशीलकुमार एकच वाक्य उत्तरले, ‘बेटा... एप्रिल २०१९ मध्ये ठरेल अगोदर माझं भविष्य. मग त्याच्यावर अवलंबून असेल आॅक्टोबर २०१९ मध्ये तुझं भविष्य.’