हैदराबादी खिचडी !
By सचिन जवळकोटे | Published: July 2, 2023 07:03 PM2023-07-02T19:03:59+5:302023-07-02T19:04:39+5:30
लगाव बत्ती..
- सचिन जवळकोटे
‘आरएसएस’ची बी टीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बीआरएस’नं सोलापुरात ‘व्हीआरएस’ घेतलेल्या नेत्यांना जणू ‘ओआरएस’ दिलेलं. सहाशे गाड्यांचा ताफा इथल्या रस्त्यांवर घुमवून ‘तेलंगणा’च्या पार्टीनं आपल्या ‘मोटार’ चिन्हाचं ब्रँडिंग केलेलं. यामुळं कुठल्यातरी अडगळीतल्या भंगार गॅरेजमध्ये बंद पडलेल्या काही ‘सोलापुरी’ गाड्याही हैदराबादच्या उसन्या पेट्रोलवर टुकूटुकू धावू लागलेल्या. असा हा ‘अतृप्त आत्म्यांचा शोध’ इथल्या राजकारणात आणखी ‘हॉरर स्टोरीज’ रंगवू करू लागलेला. लगाव बत्ती..
बाहेरच्या पक्षांसाठी ठरलंय साेलापूर ‘पॉलिटिकल गिनीपिग’..
आजपावेतो परराज्यातील अनेक प्रादेशिक पक्षांचा सोलापुरात कैकवेळा प्रयोग झालेला. जुन्या ‘आंध्र’मधल्या ‘एनटीआर’च्या ‘तेलुगू देशम’नं एकेकाळी इथं एक ‘मेंबर’ निवडून आणण्याचा चमत्कार घडवून आणलेला. ‘उत्तर प्रदेश’मधल्या ‘बहेन’च्या ‘हत्ती’नंही ‘इंद्रभवन’मध्ये किमान तीन-चार तरी मेंबर देण्याचं सातत्य दाखविलेलं. काही राज्यांपुरतं मर्यादीत असलेल्या ‘लाल बावटा’नं पूर्वभागातल्या दत्तनगरमध्ये अनेक दशकं स्वत:चं अस्तित्व टिकवलेलं. ‘आडम मास्तरां’सारखा खमक्या अन् लढवय्या नेताही दिलेला. फक्त ‘दिल्ली’तले ‘केजरीवाल’ मात्र सोलापूरकरांना कधीच ‘आप’ले न वाटलेले. तरीही त्यांचे इथले काही मूठभर कार्यकर्ते चिवटपणेे झुंज देत राहिलेले.
जे महाराष्ट्रात इतरत्र कुठं घडत नसतं, ते सोलापुरातच सक्सेस होत असतं, हे कदाचित ‘केसीआर’ टीमनं अचूक ओळखलेलं. म्हणूनच बाहेरच्या पक्षांसाठी ‘पॉलिटिकल गिनीपिग’ ठरलेल्या सोलापुरात त्यांच्या गाड्या घुसलेल्या. इथं आल्यानंतर ‘वल्याळ-म्हेत्रें’पासून ‘चाकोते-शिवदारें’पर्यंत कैक छोट्या-मोठ्या नेत्यांशी गाठीभेटी झालेल्या. खरं तर इथं येण्यापूर्वीच ‘हैदराबाद’च्या टीमनं खूप सखोल अभ्यास केलेला. कुठल्या नेत्याला कुणी कॉन्टॅक्ट करायचं, याचंही परफेक्ट नियोजन केलेलं. ‘तम-तम मंदी’वाल्या नेत्यांना ‘कन्नड’ बोलणाऱ्या नेत्याचे कॉल गेलेले. पूर्वभागातल्या ‘मन मन्शी’वाल्यांना खास ‘तेलुगू’तूनच आमंत्रण दिलं गेलेलं.
खरी गंमत हॉटेलात झालेली. ‘येमराऽऽ’ बोलणाऱ्यांच्या घोळक्यात ‘ह्यांग इद्दीरी’ असा प्रश्न विचारला गेला, तेव्हा सारेच ‘चाकोते-शिवदारे अन् इंडी पाटील’ यांच्याकडं आश्चर्यानं पाहू लागलेले. या मंडळींची इथली उपस्थिती जेवढीच आश्चर्यकारक, तेवढीच धक्कादायक ठरलेली. ‘चाकोतें’ची तर अख्खी फॅमिलीच भेटायला आलेली. हे कमी पडलं की काय म्हणून त्यांनी ‘तेलंगणा’च्या ‘सीएम्’ना चक्क पुणेरी पगडी घातलेली. याचा राग म्हणे केवळ ‘हात’वाल्यांनाच नव्हे, तर ‘कमळ’वाल्यांनाही आलेला; कारण ‘विश्वनाथअण्णा’ हे ‘हात’वाल्यांचे, तर ‘पगडी’ ही ‘कमळ’वाल्यांची नां. म्हणूनच की काय, ‘चेतनभाऊं’चा थेट या ‘अण्णां’ना कॉल गेलेला, ‘तुम्ही कसं काय त्या हॉटेलात गेलात ?’..लयच धाडस दाखवलं की राव..
दोन दादा अन् एक आबा.. पंत खूश !
जुन्या काळातल्या ‘भगीरथा’नं म्हणे हिमालयातून गंगा आणली. मात्र, पंढरपूरच्या ‘भगीरथा’नं चक्क ‘हैदराबाद’हून ‘मोटार’चं नवं चिन्ह आणलेलं. इकडं ‘अभिजितआबां’च्या टीमनं मात्र ‘खोक्यां’चाच गवगवा केलेला.
प्रत्येक इलेक्शनला चिन्ह बदलण्याची घराण्याची परंपरा ‘भगीरथां’नीही पुढं चालविलेली. आता तर त्यांनी ‘पार्टीचं राज्य’ही बदललेलं. असो. या ‘भगीरथां’ना आता ‘तेलुगू’ शिकण्यासाठी ऑनलाइन क्लास लावावा लागणार. मात्र, त्यासाठी मोबाइल सुरू ठेवावा लागेल.
या साऱ्या गदारोळात सर्वांत जास्त गुदगुल्या म्हणे ‘परिचारक वाड्या’वर झालेल्या. पुढच्या आमदारकीला ‘भगीरथदादा-अभिजितआबा-समाधानदादा’ या तिघांच्या भडक्यात आपली पोळी भाजायला हरकत नाही, अशीही ‘खात्रीशीर आशा’ आता ‘प्रशांतपंतां’ना वाटू लागलेली. कुणाला काय तर कुणाला काय.
काही का असेना. ‘मोहोळ’च्या ‘उमेशदादां’ना ‘पोपट’ म्हणणारा कुणीतरी पहिल्यांदाच भेटलेला. ‘अनगकरां’नीही कधी त्यांचा एवढा असा ‘टीआरपी’ न काढलेला. ‘भगीरथदादा’ बोलतात.. तेही आक्रमकपणे, हे पहिल्यांदाच जनतेला कळलेलं. ‘बारामतीकरां’कडून डिवचला गेलेला एखादा नेता शांत न बसता उसळून बोलतो, हे पाहून ‘अकलूज’च्या जनतेलाही आश्चर्य वाटलेलं; कारण असा अनुभव यापूर्वी त्यांना आजपावेतो कधीच न आलेला. लगाव बत्ती..
बऱ्याच महिन्यांपासून ‘हैदराबादची टीम’ सोलापुरात ‘गळ’ टाकून बसलेली. पहिलाच मासा जुना लागलेला. ‘धर्मण्णा’. हैदराबादमध्ये ते भेटूनही आलेले. प्रवेश करणाऱ्याला तत्काळ ‘नजराणा’ मिळतो, हे समजल्यानं की काय थेट ‘दोन खोक्यां’चीच मागणी केली गेलेली. यातले ‘एक खोकं’ म्हणे तर सोलापूरच्या बड्या नेत्यांचं जुनं देणं चुकविण्यासाठीच. आकडा ऐकून दचकलेल्या ‘हैदराबाद टीम’नं म्हणे नंतर बरेच दिवस त्यांचा कॉलच न घेतलेला. मात्र, सोलापूर दौऱ्यात त्यांच्या घरी जाऊन छानपैकी प्लेटा रिकाम्या केलेल्या.
‘चाकोते’ अण्णांसमोरच ‘नरोटें’ची घोषणा..‘उत्तर’मध्ये ‘काडादीं’ना ‘हात’ !
याच ‘चेतनभाऊं’वरून किस्सा आठवलेला. गेल्या आठवड्यात ‘पटोलेनाना’ सोलापुरात आले, तेव्हा ‘सिद्धेश्वर’ मंदिरात जाताना त्यांच्यासोबत गाडीत ‘चाकोते’ अन् ‘नरोटे’. बोलता-बोलता सहजपणे ‘नानां’नी विचारलं, ‘शहर उत्तरचं काय करायचं.. कोण आहे तिथं स्ट्राँग उमेदवार ?’ तेव्हा ‘चेतनभाऊ’ घाईघाईत बोलून गेले, ‘आपले धर्मराज आहेत की.. त्यांनाच तिकीट देऊ. देशमुखांचा विषयच संपवून टाकू.’
हे ऐकताच डिस्टर्ब झालेल्या ‘चाकोतें’कडं ‘नानां’नी सहेतुकपणे पाहिलं. ‘विश्वनाथअण्णां’चा विभूतीपट्टा कपाळावरील आठ्यांमध्ये गायब झालेला. ‘तो माझा मतदारसंघ. मी तिथं पाच वर्षे आमदार होतो. असं काहीही परस्पर जाहीर करत बसतात बघा तुमचे प्रभारी अध्यक्ष. तुम्हीच सांगा नानाभाऊ.. अशानं आपली पार्टी कशी येणार सत्तेवर ?’ यावर ‘नाना’ काहीच बोलले नाहीत, मात्र, त्यानंतर लगेच चौथ्या-पाचव्या दिवशी ‘चाकोते’ थेट ‘केसीआर’ भेटीला. आम्ही पामरांनी हा निव्वळ योगायोग समजलेला. तुम्हाला काय समजायचा तो समजा. लगाव बत्ती..
‘वल्याळ पुत्र’ही याच दौऱ्यात चर्चेत आलेले. त्यांच्या घरी ‘सीएम’ येण्यापूर्वी अनेकांना आवतणं गेलेली. प्रत्येक पक्षातल्या अतृप्त आत्म्यांची लिस्टही तयार केली गेलेली. यातले काही आले, काही दूरच राहिले. मात्र, ‘हैदराबादी टीम’नं ‘सेटलमेंट’मधल्या दोन ‘घड्याळ’वाल्या नेत्यांचं नाव सांगताच गोंधळ उडालेला. ‘बारामतीकरां’चे निरीक्षक ‘शेखरदादा’ यांचा थेट ‘नागेशअण्णां’ना फोन. ‘आपला काहीही संबंध नाही,’ हे सांगताना ‘गायकवाडां’ना नाकीनऊ आलेलं. एका ‘नागेश’मुळं दुसरे ‘नागेश’ कामाला लागलेले.
हे कमी पडलं की काय म्हणून सोबतचे ‘किसनभाऊ’ही विनाकारण डिस्टर्ब झालेले. ‘अब की बार किसान सरकार’ या घोषणेमुळं तर भलतेच गोंधळून गेलेले; कारण ‘तेलुगू’ भाषिक टीमला म्हणे ‘किसन’ अन् ‘किसान’ शब्दातला फरकच न समजलेला. आता बाेला. लगाव बत्ती..
जाता जाता : वारीच्या चार दिवस अगोदर ‘सीएम एकनाथभाई’ अकस्मात इथं का आले, याची आजही उत्सुकता. ते सकाळी नांदेडमध्ये असताना या ‘हैदराबादी टीम’चा बोलबोला त्यांच्यापर्यंत पोहोचलेला. ‘तेलंगणा’चे सीएम विमानानं सोलापुरात येताहेत, हेही त्यांना कळालेलं. तशातच ‘सावंतां’च्या शिबिराला अधिकाऱ्यांकडून हवा तसा रिस्पॉन्स मिळत नसल्याचंही समजलेलं. त्यामुळंच त्यांनी सोलापूरच्या विमानतळावर पाय टाकल्यापासून जे ‘फायरिंग’ सुरू केलं, ते पंढरपुरातून पुन्हा निघेपर्यंत. एकीकडं ‘महाराष्ट्राच्या सीएम’चं अस्तित्व दाखवताना दुसरीकडं त्यांनी ‘सावंतां’नाही फुल सपोर्ट दिलेला. एकाच दौऱ्यात दोन पक्षी. लगाव बत्ती..