मै विजय दीनानाथ चौहान... ये मेरी आवाज है!
By संदीप प्रधान | Published: November 26, 2022 12:28 PM2022-11-26T12:28:59+5:302022-11-26T12:30:28+5:30
अमिताभ यांच्या आवाजाचे गारुड आजही जनमानसावर कायम आहे. त्याचसाठी त्यांना न्यायालयात जावे लागले. न्यायालयानेही त्यांचा ‘आवाज’ उचलून धरला!
संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत
आकाशवाणीच्या स्टुडिओत एक हडकुळा, लंबू तरुण आशाळभूत नजरेने अधिकाऱ्याच्या समोर उभा होता. त्या अधिकाऱ्याने रेकॉर्ड केलेला ‘तो’ आवाज ऐकला व दोन्ही खांदे उडवले, तोंड वेडेवाकडे केले आणि त्या तरुणाला आवाज ‘नापास’ झाल्याने स्टुडिओबाहेर काढले. त्याच तरुणाच्या आवाजाचे तो आज पंचाहत्तरीचा झाला तरी भारतीयांवरील गारुड कायम आहे. ‘मै अमिताभ बच्चन... कौन बनेगा करोडपती में आपका स्वागत है’, अशा शब्दांत तो आवाज कानावर पडतो तेव्हा हात टाळ्या कधी वाजवू लागले तेच कळत नाही. बच्चन यांच्या याच आवाजाचा वापर करून ‘कौन बनेगा करोडपती’ या नावानेच लॉटरी चालवली जात आहे. कुठलीही पूर्वपरवानगी न घेता आपला आवाज वापरल्याने बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला. बच्चन यांचे छायाचित्र, आवाज यासह त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हक्क न्यायालयाने अबाधित ठेवले. पूर्वपरवानगीखेरीज त्याचा वापर करता येणार नाही. ख्यातकीर्त विधिज्ञ हरीश साळवे यांनी बच्चन यांची बाजू न्यायालयात मांडली. वॉशिंग पावडरपासून पचनशक्ती वाढवणाऱ्या औषधापर्यंत अनेकविध उत्पादनांकरिता बच्चन मॉडेलिंग करतात. त्यामुळे या उत्पादनांची विक्री वाढते. साहजिकच बच्चन यांची बिदागी देऊ न शकणाऱ्या अनेक छोट्या व्यावसायिकांनीही बच्चन यांची छबी व आवाज याचा बेकायदा वापर सुरू ठेवल्याने अखेर त्यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला.
बच्चन यांच्या आवाजाची जादू ओळखून ‘अग्निपथ’ चित्रपटाचे दिग्दर्शक मुकुल आनंद यांनी त्या चित्रपटात बच्चन यांना संवादाकरिता वेगळा थोडासा घोगरा आवाज लावायला सांगितले. बच्चन त्याच पद्धतीने संवाद बोलले. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मुंबईतील काही दोन-चार नामांकित थिएटरमध्ये उत्तम दर्जाची साउंड सिस्टम असल्याने ते संवाद प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वीकारले. मात्र गावागावातील थिएटरमध्ये प्रेक्षकांनी साउंड सिस्टममुळे बच्चन यांचे डायलॉग नीट ऐकू येत नाहीत, असे समजून चित्रपटानंतर नाराजी प्रकट केली. आनंद यांनी लागलीच बच्चन यांच्या संवादाचे परत डबिंग करून घेतले, अशी आठवण प्रसिद्ध सिनेसमीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितली. ‘जंजीर’ चित्रपटाने या आवाजाची जादू चित्रपट रसिकांच्या मनावर कोरली गेली. जंजीर हीट झाल्यावर ‘दुनिया का मेला’, ‘प्यार की कहानी’ वगैरे अगोदर प्रदर्शित होऊन फ्लॉप झालेले सहा चित्रपट निर्मात्यांनी थिएटरला प्रदर्शित करून चांगली कमाई केली होती. बच्चन यांच्या आवाजाची जशी जादू आहे तसेच काही आवाज माणसाच्या मनावर कोरले गेले आहेत. त्या आवाजांनादेखील भारतात १९९९ च्या ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार संरक्षण आहे. २००८ मध्ये याहूने पुरुषाच्या आवाजातील ‘याहू’ हा आवाज सुरक्षित केला. आयसीआयसीआय बँकेची ‘धीन चिक धीन चिक’ ही कॉर्पोरेट जिंगल, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे थीम साँग, सिस्कोची ट्यून, नोकियाची ‘गिटार नोट’, नेटफ्लिक्सच्या वेबसिरीज अथवा डॉक्युमेंटरीच्या वेळी ‘एन’ या लाल रंगाच्या अक्षरासोबत येणारा ‘ढम’, असा आवाज, एमजीएम एंटरटेनमेंटच्या चित्रपटांपूर्वी ‘सिंहाची गर्जना’, असे असंख्य आवाज कायद्याने संरक्षित केले आहेत. त्याचा विनापरवानगी वापर केल्यास कारवाई होऊ शकते. भारतामधील कायद्यात ‘सुवास’ अजून संरक्षित केलेले नाहीत. मात्र विदेशात ‘वास’ अथवा ‘सुवास’ यांनाही संरक्षण प्राप्त आहे. त्यामुळे एखाद्या परफ्युमची नक्कल करणे शक्य नाही. मुळात भारतात या कायद्याबाबत जागरूकता कमी आहे.
सुप्रसिद्ध कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार सांगतात की, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइटस याबाबत भारतामधील न्यायालयांनी दिलेले काही निवाडे कायदेशीरदृष्ट्या प्रागतिक आहेत. अमेरिका, युरोपातील कोर्टांनी या निवाड्यांचे कौतुक केले आहे. व्हर्लपूल नावाची एक कंपनी भारतात फ्रीज विकायची. परंतु ती कंपनी भारतात नव्हती. त्यामुळे काही छोट्या कंपन्यांनी त्या ब्रँडचा गैरवापर करून इतर उत्पादने तयार करुन कंपनीच्या नावे विकली. प्रकरण कोर्टात आले तेव्हा व्हर्लपूलचे भारतात रजिस्ट्रेशन नसल्याचा मुद्दा न्यायालयाने फेटाळून लावला व कंपनी भारतात नसली तरी तिचा जागतिक बाजारपेठेतील नावलौकिक लक्षात घेऊन त्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांना रोखले. भारतात इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्सबाबत सक्षम कायदे असल्यानेच विदेशी गुंतवणुकीत देश आघाडीवर असल्याचे पोतदार म्हणाले.
‘अग्निपथ’ चित्रपटातील बच्चन यांचा संवाद खूप लोकप्रिय आहे. ‘मै विजय दीनानाथ चौहान... इस दुनिया में तरक्की करने के लिए ना बोलना जरुरी है...’ आता त्यात बदल करून असे म्हणूया ‘इसके बाद मेरा आवाज चुरानेवालों ने ना बोलना जरुरी है...’