आई

By admin | Published: April 5, 2017 12:00 AM2017-04-05T00:00:08+5:302017-04-05T00:00:08+5:30

किशोरीतार्इंकडे शिकायला मला मिळालं, हे माझं भाग्यच होतं. वीस वर्षं मी शिकलो त्यांच्याकडे.

I come | आई

आई

Next

- रघुनंदन पणशीकर

किशोरीतार्इंकडे शिकायला मला मिळालं, हे माझं भाग्यच होतं. वीस वर्षं मी शिकलो त्यांच्याकडे.
एका नाटकातलं माझं पद ताईंनी ऐकलं आणि मला भेटून म्हणाल्या, आज संध्याकाळपासून माझ्याकडे शिकायला ये, असे त्यांनी सांगितले. हा माझ्यासाठी एक सुखद धक्का होता.
ताई स्वत:हून मला बोलावून गाणं शिकवतील अशी शक्यता मी स्वप्नातही कधी पाहिली नव्हती आणि त्या म्हणत होत्या, संध्याकाळपासून ये! तार्इंनी शिकवायला सुरुवात केली तेव्हा एकच गोष्ट मला सांगितली होती. माझ्या गळ्यातून जे येईल ते तुझ्या गळ्यातूनही आलं पाहिजे.
स्वरांची, रागाची तालीम शिस्तीची. त्यात जरा कसूर चालत नसे. गळ्यावर सगळ्या प्रकारची गाणी चढावीत हाही आग्रह नेहमीचा, पण पोपटपंचीचा भयंकर राग!
आणखी एका गोष्टीवरून सतत मला रागवत. मी एका बाईकडे शिकतो म्हणून माझ्या आवाजाचा पोत बदलून बायकी होऊ नये यावर त्यांचं करडं लक्ष असे नेहमी.
जयपूर घराण्यात त्यांनी आलापी भाव प्रस्थापित केला. त्यांच्यामुळे जयपूर घराण्यातील भावांगातील आलापाची व्याप्ती वाढली. ताई गाताना एक राग दीड तास गायच्या, त्यात सव्वा तास आलाप असायचा.
तार्इंना शब्द पाळलेला आवडायचा. काटेकोरपणा न पाळल्यास त्या अशा पद्धतीने ताडताड बोलत की डोळ्यात पाणी येई.. त्यांच्या प्रत्येकच शिष्याने हा अनुभव घेतलेला आहे. त्यांनी शिकवलेली प्रत्येक गोष्ट शिष्यांच्या डोक्यात शिरली पाहिजे यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असायच्या. त्यामुळे सर्व शिष्यांवर त्यांचा वचक होता. तार्इंचे गुरू वाघवेंद्र स्वामी यांच्याप्रति त्यांची खूप श्रद्धा होती. त्यामुळे त्यांच्या साधनेला आध्यात्मिक बळ होतं. ताई स्वामींच्या मठात गायच्या तेही मी ऐकलं आहे. पण, ताई घरी गायच्या तेव्हा ती साधना असायची. डोळे बंद करून तार्इंना गाताना पाहणं हा एक अलौकिक अनुभव असे आम्हा सगळ्यांसाठी! एकदा तार्इंनी राघवेंद्रला मंगलाष्टक ऐकायला बोलावलं होतं. ते ऐकायला बसलो आणि एका क्षणी मी ओक्साबोक्शी रडायला लागलो. मला काय होतंय काही कळेना आणि आवरताही येईना. खूप वेळाने शांत झालो. मला काहीच समजले नाही. ताई नंतर म्हणाल्या, ज्या क्षणी मला रडावंसं वाटलं, त्याच क्षणी तू रडायला लागलास. हा स्वरांचा परिणाम आहे.
त्यांची प्रतिभा अथांग होती. सारखे बदल करत. आजचं गाणं कालच्यासारखं कधी-कधीच नसे. मी त्यांचा एकेक राग किमान चार-पाचशे वेळा तर सहज ऐकला असेन. जास्तच. पण प्रत्येक वेळी वेगळी छटा. वेगळी अनुभूती. त्यांचं घरचं गाणं म्हणजे एक प्रकारची साधनाच असायची. घरी गात असताना आपोआप डोळे मिटून त्यांच्या गायनात तल्लीन होऊन जायला व्हायचं. जयपूर गायकीत त्यांनी आलापी आणि भावअंग आणलं. जयपूर घराण्याला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.
माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी त्या गुरू तर होत्याच, पण आमच्या सहप्रवासी होत्या.. आणि आईही!
- या मातृत्वभावाचा वियोग सहन करण्याची ताकद आता शोधायची. ती त्यांनीच दाखवलेल्या वाटेवर गवसेल कदाचित...
>ईश्वरा, एवढं दे...
माझं आयुष्य हा स्वरांच्या संगतीतला, त्यांच्या मागून चाललेला एक अखंड, अव्याहत प्रवास आहे. फार कठीण आहे ही वाट. तिला ना आदि, ना अंत. रोज रियाजाला बसले की वाटतं, ही तर सुरुवातच आपली. पहिलं पाऊल. कशी पोचू मी ‘तिथवर’? ‘स्वर’ ही फार अदभुत गोष्ट. त्या लखलखत्या चकव्याला निदान स्पर्श करता यावा म्हणून सततची तगमग हेच माझं आयुष्य आहे. स्वर म्हणजे हवा. स्वर म्हणजे अवकाश. कसं कवेत येणार?
...कधीतरी तो स्वर माझ्या ‘आतून’ येईल, आणि मग माझी ही कुडी उरणार नाही. ईश्वरा, मला असा मृत्यू दे!... मी जाईन, आणि काही नाही उरणार
मागे !! हवेच्या झोक्यावरून एखाद्या स्वराचा पक्षी गाईल कधीतरी, तेवढाच!
(प्रसिद्ध गायक आणि शिष्य)

Web Title: I come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.