मी देव मानत नाही, कारण मी विचार करतो!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 07:46 AM2023-10-03T07:46:25+5:302023-10-03T07:48:16+5:30

­श्रद्धा म्हणजे पुराव्याची अगर तर्काची गरज नसणे. पुरावा व तर्क या दोन्हींच्या आधाराने येतो तो विश्वास! म्हणूनच श्रद्धेवर उभारलेला धर्म ‘तर्कहीन’ होय!

I do not believe in God, because I think Javed Akhtar Article | मी देव मानत नाही, कारण मी विचार करतो!

मी देव मानत नाही, कारण मी विचार करतो!

googlenewsNext

जावेद अख्तर, ख्यातनाम शायर,  विचारवंत

माझे वडील जान निसार अख्तर ख्यातनाम शायर होते. ग्वालियरमध्ये मी जन्मलो तेव्हा ते व्हिक्टोरिया काॅलेजात शिकवायचे. मी जन्मल्यावर नाव काय ठेवायचे असा खल चालू होता. नाव ठेवताना एक विधी असे. कानात अजान देऊन कुराणातील आयता म्हणण्याचा विधी. पण कट्टर कम्युनिस्ट असलेल्या माझ्या वडिलांनी माझ्या कानात ‘कम्युनिस्ट मॅनिफस्टो’ वाचून हा विधी केला. माझे नाव ठेवले ‘जादू’! पुढे शाळेत नाव घालताना बाकी मुलांनी माझी टर उडवू नये म्हणून माझे दुसरे नाव ठेवले जावेद!

नास्तिक परिषदेत सहभागी होताना मी खुश आहे आणि दु:खीही! खुश यासाठी की इतक्या गर्द अंधारातही लोक दिवे लावताहेत. दु:ख या गोष्टीचे वाटते, की ज्याचा निर्णय खरे तर १८ व्या शतकातच व्हायला हवा होता, तो विषय २१ व्या शतकातही जिवंत आहे. खरेतर नास्तिकता हा ऑक्सिजनसारखा आपल्या आयुष्याचा एक हिस्सा असावयास हवा होता. इतके ज्ञान उपलब्ध असतानाही धर्म अजूनही मौजुद आहे, ही हैराण करणारी गोष्ट नव्हे काय?

कुणी मला विचारते, त्या देवा-धर्मामुळे कुणाला शांती-सुख-चैन मिळत असेल तर तुम्हाला का वाईट वाटते? -जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस एलान मस्क हा माझा चुलत भाऊ आहे, अशी समजूत मानून शांती-सुख-चैन मिळवण्यासारखेच नाही का हे? व्यसन सुरुवातीस आनंद देते खरे, पण कालांतराने तुमचे शरीर संपवत जाते. श्रद्धा, मग ती कोणत्याही धर्मावर असो, हे एक व्यसनच होय!

धर्मांध असणे व धार्मिक असणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मोहम्मद अली जीना नास्तिक होते, पण ते धर्मांध - कम्युनल होते. मौलाना अबुल कलाम आझाद, महात्मा गांधी हे धार्मिक होते, पण ते लोकशाहीवादी होते. श्रद्धेचा वापर करून नेतेगिरी पैदा होते. खरे तर श्रद्धा ही अंधश्रद्धाच आहे. या श्रद्धेचा फायदा राजकारणी उचलतात. श्रद्धा म्हणजे पुराव्याची गरज नसणे, तर्काचीही (लाॅजिक) गरज नसणे. पुरावा आणि तर्क या दोन्हींच्या आधाराने येतो तो विश्वास! म्हणूनच श्रद्धेवर उभारलेला धर्म ‘तर्कहीन’ होय. श्रद्धेतून खोटा आदर निर्माण होतो.. म्हणूनच धर्म हा तर्कहीन तर जातीयवाद हा शुद्ध नीचपणा आहे.

धर्मात नंतर वटवले जातील या श्रद्धेने दिले-घेतलेले ‘पोस्ट डेटेड चेक’ असतात. स्वर्ग, नरक, जहन्नूम हे सारे पोस्ट डेटेट चेक होत. आणि हे सारे करणारा तो देव जगातील गरिबी, अन्याय, अत्याचार घडू देतो.

एका मान्यवराने एकदा मला विचारले होते की, ‘तुम्ही देव का मानत नाही?’ मी म्हणालो, ‘कारण मी विचार करतो!’ जगात समजा दहा धर्म असतील तर एक धर्म इतर धर्मांना मानत नाही. माझ्यात आणि कुणाही टोकाच्या धार्मिक माणसात एका सूक्ष्म फरकासह मोठेच साम्य आहे : आम्ही दोघेही धर्म मानत नाही. फरक एवढाच, की मी कोणताच धर्म मानत नाही; तो स्वत:चा सोडून इतर कुठलाच धर्म मानत नाही.

नास्तिकाकडे काय असते? - महत्त्वाचे म्हणजे प्रश्न विचारणे असते. गुहेतून सुरू झालेला माणसाचा इथवरचा प्रवास प्रश्न विचारल्यानेच होऊ शकलेला आहे. नास्तिकांना सर्व ज्ञान नसते, पण धर्म मात्र आपण सर्वज्ञानी असल्याची शेखी मिरवतो.

प्रारंभीच्या काळात जगभरात विविध संस्कृती होत्या. त्यांचे आपापले सणउत्सव-रितीरिवाज होते. धर्माने या संस्कृती ‘हायजॅक’ केल्या. संस्कृतीचे पालन करता करता धर्माने स्वत:चे नियम-कायदे लोकांवर लादले. खरेतर होळी-दिवाळी-ईद हे सगळे सण आहेत, जे संस्कृतीतून आले. चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी आणि आनंदाची होळी माझ्या घरात साजरी होते.

‘भाषा’ ही कोण्या एका धर्माची नसते. बंगालचा मुसलमान बंगाली भाषा तर महाराष्ट्रातला मुसलमान मराठी भाषा बोलतो. म्हणून भाषावार धर्म-राष्ट्र होऊ शकत नाही. म्हणजेच हिंदू व मुसलमान ही दोन राष्ट्रे नाहीत. कारण जमिनीची वाटणी होऊ शकेल, भाषेची कशी करणार?

भाषा विशिष्ट प्रदेशाची असते, धर्माची नव्हे! जगातील सर्व भाषेत एक समान धागा आहे. व्याकरणाच्या मंडळींचा. अनेक वेगवेगळ्या भाषेचे शब्द सामावले गेले आहेत. प्रेमाबद्दल कविता लिहिल्या जाऊ लागल्या, तेव्हा तेव्हा त्या प्रस्थापित धार्मिक सत्तेविरोधात गेल्या! सर्वोत्तम कविता धर्माविरुद्ध बोलतात, धर्मगुरूंविरोधात बोलतात. मीर, गालिब हे नास्तिक होते, हे लक्षात घ्या!

भारतीय संस्कृती खुली आहे. गेली ५ हजार वर्षे इथे सर्वांच्या ज्ञानाला स्थान होते. अलग-अलग विचार या भूमीत सामावले गेले. आज जे चालले आहे ते मध्यपूर्वेतले अतिरेकीपण इथे आणणे होय! ते लोक दहशतवादी आहेत, आपल्याला त्यांच्यासारखे व्हायचे आहे का? आपल्या याच संस्कृतीत चार्वाकाची नास्तिक परंपरा जन्मली. सर्वांना सामावून घेणाऱ्या लोकशाही तत्त्वांना सध्या मुरड घालणे चालू आहे, याविषयी समाजात अस्वस्थता आहे.

(शब्दांकन : डॉ. प्रदीप पाटील) सांगली येथे झालेल्या नास्तिक परिषदेत मांडलेल्या विचारांचा स्वैर गोषवारा

Web Title: I do not believe in God, because I think Javed Akhtar Article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.