आभासाचा सोस नकोच !
By किरण अग्रवाल | Published: June 14, 2018 08:00 AM2018-06-14T08:00:39+5:302018-06-14T08:00:39+5:30
या आभासी जगताच्या भूलभुलय्यात स्वत:ला हरवून बसणाऱ्या व ठेचकाळणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तीच ठरावी खरी चिंतेची बाब.
इच्छा कितीही आणि काहीही असली तरी इच्छेनुरूप सर्वांनाच सर्व गोष्टी भेटतात, असे कधीच होत नसते. म्हणूनच तडजोड व समझौता करणे प्रत्येकाला भाग पडते. अर्थात, हेदेखील तेव्हाच शक्य होते जेव्हा किमान बाबींवर समाधान मानण्याची तुमची वृत्ती अगर प्रवृत्ती असेल. अन्यथा, तडजोडही व्यर्थ ठरल्याखेरीज राहात नाही. हे समाधानही त्याच्याच ठायी असते, जो वास्तविकतेशी नाळ टिकवून असतो. उगाच स्वप्नातल्या दुनियेत उडविले जाणारे पतंग धाराशयीच होतात. म्हटले तर हे जीवनानुभवाचे साधे-सरळ अध्यात्म; पण यासंबंधीची जाणीव आज बाळगतो कोण? अनुभवसंपन्नता लाभलेली ज्येष्ठांची पिढी तशीही यातून तावून-सुलाखून निघालेली असते. अडते ती तरुण पिढीच, जी वास्तवापेक्षा आभासात रममाण होण्यात अधिक स्वारस्य बाळगते. या आभासी जगताच्या भूलभुलय्यात स्वत:ला हरवून बसणाऱ्या व ठेचकाळणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तीच ठरावी खरी चिंतेची बाब.
तरुण पिढी जी आभासी जाळ्यात गुंतताना दिसत आहे, त्यात टीव्ही मालिका तसेच सोशल मीडियाचा मोठा वाटा असल्याचे म्हणता यावे. ओसरी पाहून पाय पसरण्याचा मंत्र विसरायला लावून ‘अनलिमिटेड’ महत्त्वाकांक्षांचे पेव त्यातूनच फुटतात. वास्तविकतेशी फारकत घडून येण्यास व स्वप्नात झुलण्याची सवय बळावण्यासही ही माध्यमे कारणीभूत ठरण्याची अनेक उदाहरणे आहेत. सोशल मीडियातले मित्र त्यांच्या खासगी जगण्याला ज्यापद्धतीने सोशल-सार्वजनिक करून बसतात, त्यातूनही अनेकांना प्रेरणा लाभून जाते व आपलेही जगणे ‘तसे’ करण्याच्या नादात ते पायावर धोंडा पाडून घेतात. अल्पावधीत व अल्पश्रमात मोठा पल्ला गाठण्याच्या इर्षेतून हे घडून येताना दिसते. अशातून गैरमार्गाचे दरवाजे तर धुंडाळले जातातच; परंतु ही ईर्षा यशस्वीतेचा टप्पा गाठणार नसेल तर विकृतीच्या पातळीवरही पोहोचलेली दिसून येते. मागे असाच सोशल मीडियावरील काही मान्यवरांचे अकाउण्ट्स हॅक करून अश्लील संदेश पाठविणारा राजस्थानातील बाडमेरचा दीप्तेश सालेचा हा तरुण पकडला गेला होता, तर फेसबुकवर बनावट अकाउण्ट उघडून शेकडो महिलांना अश्लील संदेश पाठविणाºया लातूरच्या विश्वजीत जोशीनामक तरुणासही अटक करण्यात आली होती. सोशल मीडियावर बनावट खाते उघडून असा उटपटांगपणा केला गेल्याच्या अनेक घटना ठिकठिकाणच्या पोलीस दप्तरी नोंद होत आहेत. विकृतीचीच ही उदाहरणे असून, आभासी जगण्याला मूर्त रूप देऊ न शकल्यातून ती आकारास आलेली दिसतात. म्हणूनच प्रश्न आहे तो, या आभासी अवस्थेतून तरुणपिढीला कसे बाहेर काढता यावे असा.
बरे, हा जो काही आभास असतो तो पुरती मती गुंग करणारा किंवा विचारशक्ती गहाण टाकायला भाग पाडणाराच असतो. त्यामुळे संबंधिताला स्वत:च्या बरे-वाईटाचीही शुद्ध राहात नाही. अनाकलनीय ओढवलेपण व फसवणुकीला संधीही त्यातूनच मिळून जाते. वास्तविक आयुष्यात खडतरता वाट्यास आलेली मंडळी यात बळी पडण्याची शक्यता मोठी असते. चित्रपटात काम मिळवून देण्याच्या नावाने हर्षद ऊर्फ हॅरी सपकाळ या तोतया चित्रपट दिग्दर्शकाने नाशकातील एका मुलीला साडेनऊ लाखाला गंडविल्याची घटना त्यातूनच घडून आल्याचे पहावयास मिळाले. इतकेच नव्हे तर, फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून आभासी आयुष्याची स्वप्ने रंगवत एक तरुणी हैदराबादला गेल्याची व तेथे तिच्या प्रियकराने ती अल्पवयीन असल्याचे जाणून तिला घरी परत पाठविल्याचाही प्रकार अलीकडेच उघडकीस आला आहे. या सर्व घटना पाहता तरुणांसमोरील मायावी जगाची, इच्छा-आकांक्षांची वाढती क्षितिजे स्पष्ट व्हावीत. तेव्हा त्यातून ओढवणारे धोके लक्षात आणून देऊन, त्यांना जमिनीवर राहण्यासाठी प्रोत्साहित करण्याची भूमिका ज्येष्ठांना व पालकांना घ्यावी लागेल. स्वप्ने जरूर बघायला हवीत; पण ती सत्यात उतरवता येण्याजोगीच हवीत. आभासाऐवजी वास्तवाशी प्रामाणिकता असायला हवी. गुणवत्तेची स्पर्धा करताना कमी टक्क्यांमुळे मुले आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, तो याच आभासाशी नाते सांगणारा असतो. म्हणूनच आभासाचा सोस नकोच !