...म्हणजे,कंबरेचे सोडून डोक्याला बांधणे यालाच म्हणतात का ?
By सुधीर महाजन | Published: February 4, 2021 08:29 AM2021-02-04T08:29:55+5:302021-02-04T08:32:00+5:30
Dhananjay Munde एक तर धनंजय मुंडे कोणताही विजय संपादन करून किंवा एखादी मोहीम फत्ते करून येत नव्हते. क्रेनद्वारे भला मोठा हार स्वीकारण्याएवढे कोणते कर्तृत्व गाजवले होते, असाही प्रश्न पडतो.
कृतीमधून प्रवृत्ती झळकते असे म्हणतात. आज सकाळीच काही राजकीय मंडळींशी गप्पा मारताना शरद पवारांचा विषय निघाला आणि एकाने त्यांच्या साधेपणाचे वर्णन करताना सांगितले की, एकदा ते पाचोडकडे आले. शेतातून फिरले. साधी पांढरी पँट, शर्ट, पायात बूटही साधेच होते आणि खिशाला लावलेले पेनसुद्धा, इतकेच काय हातातील घड्याळही महागडे नव्हते. शेतातून फिरून आल्यानंतर ते बसले. मातीने पँट खराब झाली तर हाताने झटकली. मी त्यांच्या वागण्यातील सहजतेकडे, साधेपणाकडे फार बारकाईने पाहत होतो. माणसे उगाचच मोठी होत नाहीत, हे यातून समजले. हे सांगणारी व्यक्ती जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाची गणली जाते. त्यांच्या सांगण्याचा मथितार्थ असा की, सारे ऐश्वर्य पायाशी लोळण घेत असताना पवारांसारख्या माणसानेच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांनी साधेपणा अगदी सहजपणे स्वीकारला. त्यात कोणताही अभिनिवेश नाही.
प्रस्तावना करण्याचेही कारण तेच की, त्यांच्याच पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे काल औरंगाबादेत झालेले स्वागत वेगळ्याच कारणाने गाजायला लागले आहे. गेला महिनाभर धनंजय विवाह, अंगवस्त्र, लैंगिक शोषणाचे आरोप अशा विविध कारणांनी वादग्रस्त ठरले. विवाहबाह्य संबंधांची जाहीर कबुली त्यांना द्यावी लागली. पुढे आरोप करणाऱ्या तथाकथित मेव्हणीने तक्रार मागे घेतली; पण तोपर्यंत धनंजय यांचे पुरते वस्त्रहरण झाले होते. त्यांना नामुष्कीही वाचवता आली नाही. असे असताना औरंगाबादेत त्यांच्या स्वागतासाठी क्रेनद्वारे पुष्पहार घालण्याचा उपद्व्याप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी करतात आणि हा सत्कार धनंजय मुंडे स्वीकारतात. एक तर मुंडे कोणताही विजय संपादन करून किंवा एखादी मोहीम फत्ते करून येत नव्हते. क्रेनद्वारे भला मोठा हार स्वीकारण्याएवढे कोणते कर्तृत्व गाजवले होते, असाही प्रश्न पडतो. अशा प्रकारची प्रवृत्ती ही राष्ट्रवादी काँग्रेसची समजायची तर फुले-शाहू-आंबेडकरांचा उठता-बसता उद्घोष करणाऱ्या राष्ट्रवादीतही सरंजामशाही प्रवृत्ती वाढते आहे असाच अर्थ घ्यावा लागेल.
सरंजामशाही हा शब्दही जबाबदारीने वापरावा लागतो. कारण वेळ सायंकाळची, गर्दीची. मुख्य मार्गावर हा क्रेनद्वारे स्वागताचा उपद्व्याप चाललेला. खोळंबलेली वाहतूक आणि फुले-शाहू- आंबेडकरांना अपेक्षित असणाऱ्या सामान्य माणसाला वेठीस धरण्याचा बेमुरवतपणा याच गोष्टी कृतीतून झळकतात. प्रशासन, कायदा सुव्यवस्था जेथे नगण्य समजली जाते हे सगळे पाहून पोलीस यंत्रणाही लोटांगण घालते हे चित्र पाहायला मिळते.
राजकारणी आणि राजकीय पक्षांकडून अशा सरंजामी प्रवृत्तींना अप्रत्यक्ष खतपाणी मिळते आणि त्यातूनच नवी राजकीय संस्कृती उदयाला येते. साठ वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाणांनी आणलेल्या महाराष्ट्राच्या मंगल कलशातील पाणी तर बदलले नाही? कारण ही राजकीय संस्कृती ठायीठायी दृष्टीस पडते. कंबरेचे सोडून डोक्याला बांधण्याचा तर हा प्रकार नाही? ना, अशी अनामिक भीती वाटायला लागली आहे.
-सुधीर महाजन