‘मी टू’ला हवे शासन कायद्याचे भक्कम बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 03:52 AM2018-10-25T03:52:43+5:302018-10-25T03:52:53+5:30
उत्क्रांताच्या काळापासून ते आजच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल काळापर्यंत पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही.
- दिनेश कांबळे
उत्क्रांताच्या काळापासून ते आजच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल काळापर्यंत पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. स्त्री म्हणजे भोगवस्तू होय हाच विचार आतापर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीत रुजत आला आहे. आज स्त्री शिक्षणाने समृद्ध झाली आहे. ती स्वत:च्या पायावर उभी राहिलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात पुरुषाशी स्पर्धा करून ती आर्थिकदृष्ट्या पुरुषावर अवलंबून राहिलेली नाही.
आतापर्यंत लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावरून बऱ्याच महिला संघटनांनी आवाज उठवला. महिला आयोगाची स्थापना झाली. महिला लेखकांनीसुद्धा आपल्या साहित्यातून आवाज उठवला. सरकार बदलले; पण शासन आणि न्यायालय स्तरावर कोणतीच ठोस पावले उचलली गेली नाहीत. विनयभंगापासून ते बलात्कार करून खुनापर्यंतच्या चौकशीमध्ये पोलीस प्रशासन आणि न्यायालयीन स्तरावर ७५ टक्के पुरुष अधिकाºयांचा सहभाग असतो.
आज स्वत:च्या पायावर उभी राहणारी स्त्री कोणत्याच क्षेत्रात सुरक्षित नाही. मग ते क्षेत्र सरकारी / खाजगी / मनोरंजन / खेळ / राजकीय असो. सरकारी सेवेत असणाºया महिलांना वेतनवाढ / बढती / बदली या भीतीपोटी त्या वरिष्ठ अधिकाºयाच्या लैंगिक शोषणास बळी पडतात. खाजगी क्षेत्रामध्ये बेरोजगारीची समस्या असल्यामुळे कामगारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कामावरून काढून टाकण्याच्या / रोजगार जाण्याच्या भीतीपोटी महिलांना व्यवस्थापकाच्या लैंगिक शोषणास बळी पडावे लागते.
शासन आणि न्यायालय स्तरावर महिलांसाठी स्वतंत्र कार्यालये जलदगतीने स्थापन केली पाहिजेत. कामाच्या ठिकाणी होणाºया लैंगिक शोषणासाठी स्वतंत्र कायदा केला पाहिजे. प्र्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष महिला कामगारांशी संपर्क साधून चौकशी केली पाहिजे. प्रत्येक कामाच्या ठिकाणी हेल्पलाइन नंबर असला पाहिजे. ज्या चित्रपटात गुन्हेगारी विश्वातील गुंतवणूक केली जाते त्याची चौकशी केली पाहिजे. परदेशात वास्तव्य करून राहणाºया आणि भारतातील चित्रपट व्यवसायामध्ये भलीमोठी गुंतवणूक करणाºया गुन्हेगारी विश्वातील म्होरक्यांच्या मुसक्या आवळून भारतात आणण्याची घोषणा करून सत्ता मिळवली़ परंतु सत्ता संपण्याचा काळ आला तरी ही घोषणा हवेतच राहिली.
जगाच्या इतिहासामध्ये जेवढे राजे झाले त्यामध्ये शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या राज्यामध्ये स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला होता. त्यांच्या राज्यात स्त्री सुरक्षित होती. स्त्रियांवर अत्याचार करणाºयांचे महाराजांनी हात-पाय तोडले, तोफेच्या तोंडी दिले. त्या शिवाजी महाराजांच्या नावावर ज्यांनी पक्ष, संघटना काढल्या त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी काय ठोस योजना केल्या? कोणती एखादी भक्कम संघटना उघडली? सत्ता मिळविण्यासाठीच फक्त शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर किती दिवस करायचा?
ब्लॅक अॅण्ड व्हाइट चित्रपटापासून ते आताच्या डिजिटल चित्रपटापर्यंत त्यांचे नाव आदराने घेतले जाते ते म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन. त्यांच्या तोडीचा एकही कलाकार आजही चित्रपट व्यवसायामध्ये नाही. बीग बी त्याच दलदलीत मोठे झाले; पण त्यांनी स्वत:वर कधी चिखल उडवून घेतला नाही. आजच्या चित्रपट व्यवसायातील प्रसिद्ध कलाकार अक्षयकुमार यांनी महिलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवूून भल्याभल्यांना चित्रपट सोडण्यास भाग पाडले.
(सामाजिक कार्यकर्ता)