मी आत्महत्येच्या कड्यावरून परत फिरलो, त्याची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 10:32 AM2023-04-22T10:32:57+5:302023-04-22T10:33:22+5:30

शिकागोत राहणाऱ्या यश हाटकरचा ‘Hattie’ हा स्टॅण्डअप कॉमेडी शो अमेरिकेत गाजतोय. आत्महत्येच्या टोकावरून परत फिरण्याच्या त्याच्या प्रवासाबद्दल..

I walked back from the cliff of suicide, his story! | मी आत्महत्येच्या कड्यावरून परत फिरलो, त्याची गोष्ट!

मी आत्महत्येच्या कड्यावरून परत फिरलो, त्याची गोष्ट!

googlenewsNext

-  यश हाटकर
(मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद - रश्मी चाफेकर)

२३ मे २०२२. ह्या दिवशी मी माझं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्या विचित्र क्षणी, एक पोकळी निर्माण झालेली असताना, ‘आपण या जगातून गेलो तर?’- हा विचार मी केलाच नाही आणि खूपशा अँटीडिप्रेसंट गोळ्या एकदम खाऊन टाकल्या. एक तास गेला, नेटफ्लिक्सवरच्या ‘ओझार्क’ ह्या सिरीजचा शेवटचा एपिसोड बघून झाला. एकदम मला जाणवलं, की  मी खूप मोठी चूक केली होती. लगेचच माझ्या थेरपिस्टला फोन केला, तिने माझ्या आईला कळवलं. आई तातडीने घरी आली. मला हायलंड पार्क हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. काही वेळाने कळलं, की उरलेला सगळा आठवडा इथेच काढावा लागणार! - हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आठवडा ठरला. 

मी हे अपयश स्वीकारायला तयार आहे का? माझा कशावरच ताबा नाही हे मान्य करायची माझी तयारी आहे का? मी बरा होईन की नाही, झालो तर कसा? - माझ्याकडे कशाचीच उत्तरं नव्हती. या काळात एक गोष्ट लक्षात आली, की अपयशाने कधी खचून जायचं नाही कारण  आधार देणारं कोणीतरी नक्की भेटतंच.  आपलं मन हे एखाद्या चिडलेल्या, भ्रमात पडलेल्या मुलासारखं असतं.  मनात असंख्य विचित्र गोष्टींची चलबिचल चालू असते. या लहानग्या, चिडलेल्या मुलाला अडवण्यापेक्षा त्याला  मोकळीक देणं गरजेचं असतं. माझा आजही या सगळ्या गोष्टींबरोबर संघर्ष चालूच आहे.

डिस्चार्ज मिळाल्यावर मी ‘बाहेरच्या जगाला’ सामोरं जायला तयार झालो.  थेरपी ही कधीही न संपणारी गोष्ट आहे, हे मी शिकलो होतो. हे खरं, की जगण्याशी सामना करता करता मनाकडे लक्ष देणं कठीण होतं. कधीकधी तर भीतीही वाटते. पण हे खरं, की ‘बाहेरचं जग’ एखाद्या आठवड्यात, दोन-चार महिन्यांत , एका झटक्यात बदलू शकणार नाही. म्हणूनच मी आजही स्वतःला संयम ठेवण्याची सतत आठवण करून देतो. २०१२ ते २०२० हा काळ मला खूप संभ्रमात टाकणारा  होता. आपण कोण आहोत, गे की स्ट्रेट? काय खरं, काय खोटं ह्याचा अंदाज बांधणं अवघड होत होतं. २०२० मध्ये मी गे आहे असं मी सांगितलं. पण आता मी स्वतःला पॅनसेक्शुअल, म्हणजे ‘सर्वांकडे आकर्षित होणारी व्यक्ती’ म्हणवतो.

सतत चाकोरीबद्ध विचार करण्याच्या, गोष्टींची खात्री करून त्या पडताळून बघण्याच्या सवयीमुळे २०२१ मध्ये ओसीडीने मला घेरलं आणि काही कळायच्या आतच मी खोल गर्तेत जायला लागलो. पण माझ्या, फिल्ममेकर होण्याच्या एका स्वप्नाने मला आशा दाखवली. २०२१ च्या ॲाक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मी एका टीव्ही सिरीजचं काम चालू केलं होतं, ते संपल्यावर डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा  मी आणि माझं मन एकटे पडलो.  काहीतरी वाईट घडेल ह्या भीतीने, शेवटी १ जानेवारी २०२२ ला, मला मदतीची अत्यंत गरज असल्याचं मी माझ्या कुटुंबाला सांगितलं. थेरपी सुरू झाली. अँटीडिप्रेसंटपण फारशी उपयोगी पडेनात.  निद्रानाशामुळे किंवा मनावरचा ताबा सुटल्यामुळे काहीतरी वाईट होणार, असं सतत वाटू लागलं. त्याच वर्षीच्या मे महिन्यात मी सुरुवातीला सांगितलेला प्रसंग घडला.बघता बघता जुलै आला. माझा मित्र मला म्हणाला ‘यश, तू स्वतः आत्महत्या ह्या विषयावर एवढे विनोद करतोस; लवकरच नेटफ्लिक्सवर तुझ्यावर तयार झालेला स्डॅंडअप शो बघायला मिळेल.’

ह्याच काळात मला एक देवदूत भेटला. त्याने एक खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगितली : लोकांची क्षमा मागणं बंद कर, लोकांनी केलेल्या कौतुकाचा स्वीकार कर आणि  स्वतःवर प्रेम करायला शिक. चांगलं, वाईट सगळ्याचा स्वीकार कर. त्या दिवसापासून, दुसऱ्याविषयी वाटणारी करुणा, स्वतःवरचं प्रेम आणि एक नवीनच क्रिएटिव्हिटी ह्यांनी जन्म घेतला. कल्पना सुचत गेल्या. ॲागस्टमध्ये कॅनडात केलेल्या प्रवासाने  वेगळीच दृष्टी दिली आणि ‘Hattie’ ची निर्मिती झाली.

‘Hattie’ ही माझ्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतरच्या प्रवासाविषयीची स्डॅंडअप कॅामेडी आहे. हो, मी आत्महत्या ह्या विषयावर खूप विनोद करतो पण हा विषय हसण्यावारी नेण्याचा आहे म्हणून नव्हे, तर आपण  एखाद्या विषयावर हसतो तेव्हा आपण त्याचा स्वीकार करायला तयार झालेलो असतो, म्हणून!
- हसलो, की मला आतून बरं वाटतं. हसून सुरुवात केली, तर खूपशा अवघड विषयांवर बोलणं सोपं होतं, आपण एकमेकांच्या आणखी जवळ येऊ शकतो. उपचारांचा, बरं होण्याचा प्रवास एकत्र करू शकतो!
 

Web Title: I walked back from the cliff of suicide, his story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.