मी मला दुरुस्त करीन, तुम्ही तुम्हाला दुरुस्त करा; सगळे प्रश्न सुटतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 02:32 PM2022-04-27T14:32:13+5:302022-04-27T14:32:31+5:30
ख्यातनाम लेखिका, सेलिब्रिटी कोच, काॅर्पोरेट ट्रेनर डेम मुन्नी आयरोनी यांच्याशी ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादातील काही अंश...
डेम मुन्नी आयरोनी
या वयात आपण आपली मानसिक आणि शारीरिक प्रकृती इतकी उत्तम कशी ठेवता?
मी मद्य घेत नाही, धूम्रपान करीत नाही. मी कधीही डेटवर जात नाही. माझे आयुष्य, त्याचा हेतू हे सारे माझ्यासाठी अत्यंत स्पष्ट आहे.
हे कसे जमते?
कारण वयाच्या सातव्या वर्षीच मी ध्यानधारणेला सुरुवात केली. किगोंग या ६००० वर्षे जुन्या चिनी ध्यान पद्धतीमुळे हे शक्य झाले. माझ्या शिफुंनी (गुरू) मला योगसाधना शिकवली. मन आणि शरीराचे आरोग्य त्यामुळे उत्तम राहते. मी दिवसातून १८ तास काम करते. काम करतानाही माझे ध्यान सुरूच असते. आता तुमच्याशी बोलतानाही ते चालू आहे.
हे तुमच्या कुटुंबात चालत आले का?
नाही. माझ्या कुटुंबात माझ्यासारखे कोणी नाही. लहानपणीच मी किगोंग सुरू केले, त्या दिवशी मौन पाळले. नंतर शाळेतून परत आल्यावर दप्तर फेकले की मी माझ्या शिफूंकडे पळायची. रविवारी दुसरे काहीही न करता किती तरी तास हेच केले. शिफूंनी मला सांगितले होते, माझ्याकडे किंवा दुसरीकडे कुठेच पाहू नकोस, स्वत:चा शोध घे. मी तेच केले.
किगोंगचा काय परिणाम झाला ?
मी कायम शांत, हसत राहिले. कारण मी वर्तमानात जगते. भूत अथवा भविष्याचा विचार करीत नाही. सततच्या ध्यान धारणेमुळे याही वयात माझी त्वचा १६ वर्षांच्या युवतीसारखी तुकतुकीत आहे. माझ्या मुलीपेक्षाही माझा शरीरबांधा उत्तम आहे. मी कोणतेही औषध, वेदनाशामक, जीवरक्षक औषध घेत नाही. मी आयुर्वेदीय जीवनशैली जगते.
व्यक्तिगत जीवनात धर्मपालन करता का ?
माझे वडील इटालियन ख्रिश्चन होते, आई भारतीय मुस्लिम. पण आम्ही घरी कोणताच धर्म पाळला नाही. मला ६ मुले असून, ती वेगवेगळ्या श्रद्धा बाळगतात. मला हिंदू धर्म आवडतो. मी रोज पूजा करते. माझ्या कचेरीत ‘ओम नम: शिवाय’ मंत्र लावलेला असतो. त्यामुळे शांत वाटते.
परोपकाराला खूप पैसे लागतात. दान-धर्माला तुम्हाला कोठून पैसे मिळतात?
मी कधी कोणाकडे पैसे मागत नाही. माझ्याकडेच पुष्कळ पैसे आहेत. कोणाच्या पैशाची गरज नाही. माझी सगळी कमाई मी सतत दान करीत असते. माझ्या उद्योगातून भरपूर पैसा येतो. त्यातून लॉस एंजेलिस, आफ्रिका, श्रीलंका, मलेशिया, युरोपमध्ये धर्मदाय कामांसाठी पैसे खर्च करता येतात.
एकाच वेळी तुम्ही सेलेब्रिटीज, पुढारी, उद्योग जगतातील बडे लोक आणि गरजू या सगळ्यांना कशा सामोऱ्या जाता?
हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला माझे ‘गेट बॅलन्स्ड’ हे पुस्तक वाचावे लागेल. तुम्हीही माझ्यासारखे जगू शकता. लोक आपल्या भावाला दिडकी देत नाहीत पण गुरू महाराजांवर मात्र धनाचा वर्षाव करतात. स्वर्गात जागा मिळवण्याचा त्यांचा तो मार्ग असतो. तुम्ही खरे गुरू असलात तर कोणाचाच द्वेष करणार नाही.
भारतातील सामाजिक आणि आध्यात्मिक वातावरण कसे आहे, असे तुम्हाला वाटते?
मी टीव्ही पाहत नाही, वृत्तपत्रे वाचत नाही. त्यामुळे मला फारशी कल्पना नाही. पण आपणच समस्या आहोत हे आपल्याला कळले पाहिजे. मी मला दुरुस्त केले, तुम्ही तुम्हाला केले तर सगळे प्रश्न सुटतील. भारत विकसित करण्याचा चांगला प्रयत्न मोदी करीत आहेत, असे मला वाटते.
भारतात यावे असे का वाटले?
हा एक शांती दौरा होता आणि उद्योगाशीही संबंध होता. मी येथे अनेक आध्यात्मिक नेत्यांना भेटले. तसेच जयपूर, जोधपूर, उदयपूर, आग्रा अशा ठिकाणीही जाऊन आले.
जी तुम्हाला खरोखर आवडते, जिची तुम्ही मनापासून प्रशंसा कराल अशा एका भारतीय व्यक्तीचे नाव सांगाल?
रतन टाटा. हा एक अतीव निर्मळ आणि अंतर्बाह्य ‘खरा’ माणूस आहे. त्यांना आयुष्य कळले आहे. ते स्वत:च स्वत:चे गुरू आहेत.
(लेखिका जागतिक शांतता आणि मानवी हक्क कार्यकर्त्या आहेत)