जिंकलो मी, हरला पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 06:15 IST2018-12-29T06:15:06+5:302018-12-29T06:15:26+5:30
इतरांना मोदींचे भय आहे. गडकरींना ते नाही. कारण त्यांच्या पाठीशी संघ आहे. ‘माझ्यात व नेतृत्वात वाद निर्माण करण्यासाठी ही चर्चा सुरू झाली आहे’ असा आव गडकरींनी आणला तरी कुणी विश्वास ठेवत नाही.

जिंकलो मी, हरला पक्ष
भारतीय जनता पक्षात सारे काही सुरळीत नाही ही गोष्ट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अलीकडच्या दोन वक्तव्यांनी स्पष्ट केली आहे. ‘पक्षाच्या विजयाचे श्रेय जसे नेतृत्वाने घ्यायचे तसे पराजयाचे अपश्रेयही त्याने घेतले पाहिजे. पराभवाची जबाबदारी न घेणारे नेतृत्व पक्षात विश्वासाचे वातावरण तयार होऊ देत नाही’ हे त्यांचे उद्गार कुणाला उद्देशून आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. याआधी भाजपाने देशातली राज्ये एकामागोमाग एक अशी जिंकली. त्या वेळी त्या यशांचे सारे श्रेय त्यातील आनंदासह चेहऱ्यावर घेऊन मोदी व अमित शहा देशासमोर उभे राहिले. त्या विजयांसोबत त्यांची काँग्रेसवरील टीकाही जास्तीत जास्त जहरी होत गेली. सोनिया गांधींना विधवा म्हणून झाले.
राहुल गांधींना पप्पू म्हणणे जुने झाले. पुढे ही टीका थेट इंदिरा गांधी, राजीव गांधी व पुढे तर ती प्रत्यक्ष जवाहरलाल नेहरूंपर्यंत पोहोचली. ‘सरदार भगतसिंग तुरुंगात असताना त्यांना नेहरू कुटुंबातील कुणी कधी भेटायलाही गेले नाही’ हे मोदींनी कमालीच्या धिटाईने आणि तेवढ्याच खोटारडेपणाने देशाला ऐकविले. वास्तव हे की लाहोरच्या तुरुंगात नेहरूंनी भगतसिंगांची भेट तर घेतलीच, पण त्याविषयीचा सविस्तर वृत्तांत त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहूनही ठेवला. ‘भगतसिंग निर्भय होते, शांत होते आणि आपल्याला झालेल्या शिक्षेबद्दल निश्चिंतही होते’ हे त्यांनी त्यात लिहिले आहे. संघातील बौद्धिकांपलीकडे काही एक न ऐकणाºयांचे अज्ञान मग अशा वेळी उघड होते. पण आताचा प्रश्न मोदींचा नाही. तो गडकरींच्या विधानाचा आहे. तीन राज्यांत एकाच वेळी भाजपाला पराभव पत्करावा लागला तेव्हाच ‘मोदींना पर्याय शोधण्याची’ भाषा पक्षात सुरू झाली. तो पर्याय ‘गडकरीच असावा’ अशी चर्चा उत्तरेकडे होताना दिसली.
जेटली आजारी, सुषमा आजाराने त्रस्त, प्रभूंना जनाधार नाही आणि अमित शहा? त्यांचा तर सर्वत्र तिरस्कारच आहे. या पार्श्वभूमीवर गडकरींचे विधान महत्त्वाचे आहे. कारण गडकरी बोलतात तेव्हा त्यांच्या रूपाने प्रत्यक्ष संघच बोलत असतो. भाजपाच्या अध्यक्षपदावरून लालकृष्ण अडवाणींना काढून त्या पदावर संघाने गडकरींना ज्या तºहेने बसविले तो प्रकार संघाचे गडकरीप्रेम उघड करणारा होता. मोदी तेव्हाही होते. झालेच तर शिवराजसिंग आणि रमणसिंग होते. राजनाथ होते आणि वसुंधराही होत्या. त्या साºयांना वगळून कोणतेही मंत्रिपद नसलेल्या गडकरींना संघाने तेव्हा पक्षाध्यक्षपद दिले होते. या गोष्टीचा अर्थ तेव्हाही मोदींना समजला होता. त्यांनी त्यांच्या हस्तकाकरवी मग गडकरी यांच्याविरुद्ध पूर्तीपासूनची सगळी प्रकरणे बाहेर आणली. त्यात त्यांना राम जेठमलानी यांनीही साथ दिली. मोदींनी आपल्या मंत्रिमंडळातही गडकरींना रस्तेबांधणीचे दूरस्थ व कमी महत्त्वाचे खाते दिले.
पर्रीकर गोव्यात गेले तेव्हा गडकरींना संरक्षणमंत्रीपद दिले जाईल असे अनेकांना वाटले. पण सुषमा स्वराज यांनी नकार दिल्यानंतर मोदींनी ते निर्मला सीतारामन यांना दिले. मोदींचा धाक असा की त्यांच्याविरुद्ध कुणी टीकेचे बोलत नाही. निदान आजवर बोलले नाही. पण आता स्थिती बदलली आहे. आपण सत्ता गमावू शकतो हे भाजपाला कळले आहे. अशा वेळी विजयाचे श्रेय घेणाºयानेच अपयशाची जबाबदारीही घेतली पाहिजे, असे पक्षात बोलले जाऊ लागले. आता ती भाषा खुद्द गडकरी यांनीच, म्हणजे संघाने उच्चारली आहे. एरवी भरमसाट बोलणारे मोदी पराभवानंतर एकदाही बोलले नाहीत. त्या अमित शहांनीही त्यांचे तोंड उघडले नाही. जेटलींनीच तेवढी त्यांच्या ‘नोटाबंदीच्या परिणामाचा अभ्यास न केल्याची’ कबुली परवा दिली. आता यापुढे इतरही लोक बोलणार आणि त्यांनी तसे बोललेही पाहिजे. आमचा पक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवतो,
असे भाजपाकडून अनेकदा सांगितले गेले. ती लोकशाही आता दिसू द्यावी लागेल. रविशंकर बोलू लागले पण ते मोदींच्या बचावाचे. शिवराज किंवा वसुंधरा बोलत नाहीत. कारण त्यांचा पराभव झाला आहे़ मोदींची लोकप्रियता झपाट्याने खालावत आहे, त्यांच्यासोबत त्यांचा पक्षही जनाधार गमावताना दिसला आहे. या स्थितीत नेतृत्वात बदल हाच एक उपाय राहतो व त्याची चर्चा भाजपाच्या ज्या एका नेत्याला बळ देणारी व सुखावणारी आहे ते नेते गडकरी आहेत. त्यामुळे ही चर्चा अर्थहीन नाही आणि उथळही नाही. ती संघाने सुरू केली व चालविली आहे.