‘अच्छे दिन’ची संकल्पना मोदींसाठी दुधारी तलवार ठरू शकेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:24 AM2017-10-18T00:24:46+5:302017-10-18T00:25:17+5:30
नोटाबंदीचा फटका आणि त्यानंतर वस्तू व सेवाकराचा झटका, आम्हाला दुहेरी मार बसला, असा दावा एका चिंताग्रस्त उद्योजकाने केला. मी त्याला म्हटले, ‘‘या परिस्थितीत आज निवडणुका झाल्या तर तू कुणाला मतदान करशील.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्याशिवाय दुसरा पर्याय तरी आहे का?’’
- राजदीप सरदेसाई
मुंबईत नुकत्याच झालेल्या लघु आणि मध्यम उद्योगांच्या उद्योजकांच्या बैठकीत एकूण वातावरण चिंतेचे होते. सुरुवातीला नोटाबंदीचा फटका आणि त्यानंतर वस्तू व सेवाकराचा झटका, आम्हाला दुहेरी मार बसला, असा दावा एका चिंताग्रस्त उद्योजकाने केला. मी त्याला म्हटले, ‘‘या परिस्थितीत आज निवडणुका झाल्या तर तू कुणाला मतदान करशील.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्याशिवाय दुसरा पर्याय तरी आहे का?’’ या संभाषणातून देशात सध्या जो विरोधाभास पाहायला मिळतो, त्याचे दर्शन घडले. मोदी सरकारने भ्रमनिरास केल्याचे अनेक पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे व्यापारी समुदाय आणि मध्यम वर्ग अस्वस्थ आहे पण त्याचे रूपांतर सरकारविरोधी संतापात होताना दिसत नाही.
२०१४ साली ‘अच्छे दिन’च्या लाटेवर नरेंद्र मोदी सत्तेवर आले. संपुआ राजवटीकडून दहा वर्षात निराशा पदरी पडल्यानंतर आलेल्या थकव्यामुळे नंतर आलेल्या मजबूत नेतृत्वामुळे आशादायक वातावरण निर्माण झाले होते. विशेषत: शहरी भागात या भावना जास्त प्रखर दिसत होत्या. तीन वर्षांनी शहरी भागातील एकेकाळचे भाजपचे बालेकिल्ले ढासळू लागले आहेत. तरीही पक्षाने ग्रामीण भागात नव्या सामाजिक-आर्थिक घटकांची निर्मिती करून स्वत:चे प्रभावक्षेत्र वाढवले आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत रा.स्व. संघाची विद्यार्थी संघटना असलेल्या अ.भा.वि.प.चा पराभव हा दिशादर्शक म्हणावा लागेल. शहरी तरुण जो काही काळ मोदींच्या भाषणांनी मंत्रमुग्ध होत होता, तो आता तेवढ्या प्रमाणात त्यांच्या भाषणाने भारावून जात नाही. बेरोजगारी आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा संकोच यामुळे पंतप्रधानांभोवतीची आभा कमी झाली आहे. गुजरातच्या या बासरीवाल्या मोदींच्या मागे १८ ते २३ वर्षाचे तरुण वेड्यासारखे धावत होते, ती उर्मी आता दिसून येत नाही. नोटाबंदीनंतर देशाच्या आर्थिक स्थितीत जो निराशाजनक बदल झाला त्याचा संबंध या परिस्थितीशी आहे. नोटाबंदीच्या सुरुवातीच्या काळात भाजपला त्या बंदीतून मोदींचा भ्रष्टाचारविरोधी संदेश लोकांपर्यंत देता आला. स्वत:च्या उत्कृष्ट संवाद कौशल्याच्या जोरावर मोदींना नोटाबंदीतून श्रीमंत विरुद्ध गरीब, तसेच काळ्या पैशाच्या विरोधातील हे युद्ध आहे असे चित्र उभे करता आले. पण अर्थकारण गडगडत असताना उद्योगांची घसरण होत असताना २०१७ च्या सुरुवातीच्या काळातील उत्साहाची जागा नकारात्मकतेने घेतली आहे. विकासाची घसरण तांत्रिक कारणांमुळे दिसते आहे, असा त्याचा खुलासा भाजपचे अध्यक्ष अमित शहा करीत असून नोटाबंदीने अर्थकारणातील काही दुवे तुटले असल्याची गोष्ट ते अमान्य करीत आहेत. पण वस्तुस्थिती ही आहे की लघु उद्योगांसमोर आर्थिक संकट ओढवले असून त्यांना रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. वित्तमंत्री अरुण जेटली त्याचे वर्णन ‘तात्पुरते परिणाम’ असे करीत असून आपल्या अर्थकारणाचा मूलभूत पाया मजबूत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण असे म्हणणे म्हणजे मुख्य दुखण्यापासून दूर पळण्यासारखे आहे. मुख्य दुखणे उत्पादकता, कृषी क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्रावर जो परिणाम झाला ते आहे. तेव्हा वास्तव हे आहे की आर्थिक स्थितीत सुधारणा लगेच घडून येतील ही शक्यता नाही आणि तोंड पाटीलकी केल्याने दुखणे लांबवले जाण्यापलीकडे काहीच साध्य होणार नाही.या सर्व पार्श्वभूमीवर भाजपने यंदा होणाºया गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका जर जिंकल्या तर त्यातून आर्थिक घटक आणि निवडणुकीचे निकाल यांच्यात परस्पर संबंध उरले नसल्याचे स्पष्ट होईल. आजही मोदी हे अत्यंत विश्वासार्ह नेते असून, भ्रष्टाचारापासून दूर असलेला कर्मयोगी नेता या त्यांनी निर्माण केलेल्या स्वत:च्या प्रतिमेतील ‘गुडविल’ अजून टिकून असल्याचे दिसून येईल. दुसरीकडे २०१४ च्या पराभवातून बाहेर पडण्यासाठी धडपडणाºया काँग्रेसपेक्षा रा.स्व. संघ-भाजपची निवडणूक यंत्रणा कमालीची उत्कृष्ट दर्जाची आहे, हेही स्पष्ट होईल. तिसरी गोष्ट ही की राहुल गांधींना अमेरिकेच्या पश्चिम किनाºयावर स्वत:चा आवाज गवसला असला तरी पश्चिम भारत आणि हिमालयाच्या पर्वताराजीत त्यांनी उभे केलेले आव्हान वेगळ्या तºहेचे आहे आणि सर्वात शेवटी निराश झालेला मध्यम वर्ग मोदी भक्तीपासून भलेही दूर जाताना दिसत असेल, पण उज्ज्वला योजनेची लाभार्थी असलेली गरीब जनता मात्र सरकारकडे अजूनही सकारात्मक भूमिकेतून पाहात आहे!
अशा स्थितीत भाजप आणि मोदी हे अजिंक्य आहेत असे म्हणायचे का? त्याचे उत्तर होय आणि नाही असेच आहे. नवा भारत घडवू इच्छिणारा दूत ह्या पंतप्रधानांच्या प्रतिमेला कुणी आव्हान देऊ शकेल असे दिसत नाही. पण असे अनेक ऐतिहासिक दाखले देता येतील जेव्हा सध्याच्या स्थितीविषयीचा संताप भविष्यात उफाळून आलेला आहे. हीच गोष्ट हळुवारपणाने सांगायची झाल्यास नोटाबंदी ही चमत्कार घडवून आणणारी जडीबुटी नव्हती, ही बाब मान्य करावी लागेल. पण त्यासाठी पंतप्रधानांना आपल्या निर्णयातील ती चूक होती हे मान्य करावे लागेल, जी ते आजवर टाळीत आले आहेत!
जाता जाता- शहरी भावना दर्शविण्यासाठी सोशल मीडिया उपयुक्त ठरू शकेल. काही महिन्यापूर्वीपर्यंत राहुल गांधींवर सर्व तºहेचे विनोद केले जात होते. आता मोदींवर ती पाळी आली आहे. ‘‘अच्छे दिन’’ ही संकल्पना दुधारी तलवारीसारखी ठरू शकते!