गणितकोंडी फोडताना शिक्षण पद्धतीेचाही विचार व्हावा
By admin | Published: June 30, 2017 12:08 AM2017-06-30T00:08:55+5:302017-06-30T05:54:52+5:30
भारतीयांचे आम्ही खूप देणे लागतो. मोजायचे कसे हे त्यांनी साऱ्या जगाला शिकविले. त्याशिवाय कोणतेही फायदेशीर संशोधन होऊ शकले नसते,
भारतीयांचे आम्ही खूप देणे लागतो. मोजायचे कसे हे त्यांनी साऱ्या जगाला शिकविले. त्याशिवाय कोणतेही फायदेशीर संशोधन होऊ शकले नसते, अशी कबुली प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी दिली होती आणि ती खरीही होती. कारण अगदी शून्याच्या शोधापासून अनेक महत्त्वाचे गणितीय आणि शास्त्रीय शोध हे या भारतवंशातच लागले आहेत. असे असताना याच गणित विषयाने आज विद्यार्थ्यांची एवढी कोंडी केली आहे की हा विषय ऐच्छिक असावा की नको यावरून सध्या जोरदार विचारमंथन सुरू आहे. गणित आणि इंग्रजी या दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या निश्चितच लक्षणीय आहे. अनेक विद्यार्थी तर दोन-दोन तीन-तीन वर्षे केवळ याच विषयांमुळे दहावीत अडकून राहतात आणि शिक्षणाचा त्यांचा पुढील मार्ग बंद होतो. अनेकदा या गणितापायी विद्यार्थ्यांना एवढे नैराश्य येते की त्यांचा शिक्षणातील रसच निघून जातो. हे एक वास्तव आहे आणि ते सर्वांनी स्वीकारले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनातील गणित आणि भाषाविषयक कोंडी फोडण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे होत असले तरी ते कुठेतरी कमी पडत आहेत हे या विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या भीतीवरून स्पष्ट होते. विद्यार्थ्यांच्या मनातील ही कोंडी फोडण्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयाने अलीकडेच केलेल्या सूचनेचाही त्याअनुषंगाने विचार होणे आवश्यक आहे.
गणित आणि भाषा या विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने शाळा सोडण्याकडे त्यांचा कल अधिक असतो. असे निरीक्षण नोंदवितानाच गणित हा विषय ऐच्छिक ठेवता येईल काय, यासंदर्भात विचार करण्याचा सल्ला उच्च न्यायालयाने दिला आहे. असे केल्यास विद्यार्थ्यांना कला शाखेची पदवी घेणे सोपे जाईल, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.
न्यायालयाने मांडलेल्या या भूमिकेवरून सध्या शिक्षणतज्ज्ञांमध्ये वेगवेगळे विचारप्रवाह पुढे येत आहेत. गणित हा केवळ एक अभ्यासाचा विषय नाही तर दैनंदिन जीवनाचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषत: व्यावहारिक जीवनातील त्याचे स्थान नाकारता येणार नाही. मानवी जीवनशैलीशी तर या गणिताचा अगदी जिवाभावाचा संबंध आहे, हे मान्य करावेच लागेल. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला गणिताचे किमान ज्ञान तरी असावे, असे मानणारा एक वर्ग आहे. दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांना पुढे कला शाखेतच पदवी घ्यायची आहे त्यांना दहावीत अडकवून ठेवण्यात काय अर्थत असा प्रश्न उपस्थित होणेही स्वाभाविक आहे.
एखाद्या विषयाची सक्ती कायम ठेवल्याने मुलांमध्ये विनाकारण न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. याउलट प्रारंभापासूनच त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात शिक्षण घेण्यास मिळाले तर त्यांचा अधिक चांगल्याप्रकारे विकास होऊ शकतो, असे काहींचे म्हणणे आहे. हे दोन्ही विचार आपापल्या ठिकाणी योग्य वाटतात आणि आहेत.
परंतु मूळ प्रश्न गणिताची मुलांना एवढी धास्ती का वाटावी हा आहे आणि या दोन्ही पर्यायांनी तो सुटत नाही. त्याचे उत्तर आपल्याला आपल्या शिक्षणपद्धतीतून शोधावे लागणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादी जाहीर करणे बंद झाले असले तरी गुणांचा खेळ मात्र संपलेला नाही. परीक्षेवर आधारित या शिक्षण पद्धतीत मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे अधिक लक्ष न देता केवळ परीक्षेपुरता अभ्यास करायचा आणि पुढील इयत्तेत प्रवेशाचा मार्ग मोकळा करायचा याचेच गणित मुलांना अधिक शिकविले जाते असल्याचे दिसून येते. दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये हजारो विद्यार्थी कॉपी करताना पकडले जातात त्यामागीलही हे एक कारण आहे.
पूर्वी एक म्हण प्रचलित होती, ‘छडी लागे छमछम विद्या येई घमघम’. अर्थात आता ही म्हण कालबाह्य झाली आहे. छडी मारणारे शिक्षक राहिले नाहीत अन् छडी खाऊनही शिक्षकांचा आदर करणारे विद्यार्थीही कुठे दिसत नाहीत. बदलत्या काळासोबत शिक्षणाच्या पद्धतीही बदलत आहेत. मुलांना अभिरुची वाढविणारे शिक्षण कसे देता येईल, यावर भर आहे. विदेशांमध्ये पुस्तकी घोकंपट्टीपेक्षा प्रात्यक्षिक शिक्षण देण्याकडे अधिक कल असल्याचे आपण बघतो. भारतातही अनेक राज्यांमध्ये शिक्षणाच्या नवनवीन अभिनव पद्धती अवलंबल्या जात आहेत. महाराष्ट्रातही असे प्रयत्न होत असले तरी ते अधिक प्राधान्याने तसेच गांभीर्याने होण्याची गरज आहे.
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही योजना राबविली जात आहे. गणित आणि भाषा हे दोन विषय पक्के करुन घेण्याचे उद्दिष्ट त्यामागे आहे. हा प्रकल्प स्वागतार्ह असला तरी आज खरी गरज प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा पाया पक्का करायची आहे. तेव्हा सर्वप्रथम यासंदर्भात धोरण निश्चित झाले पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीचेही प्रयत्न करावे लागतील. विद्यमान शिक्षणपद्धतीत गुणांचा जो अनावश्यक बागुलबुवा निर्माण करण्यात आलाय तो संपवून विद्यार्थ्यांच्या मनात बालपणापासूनच ज्ञानार्जनाची गोडी कशी निर्माण होईल ते बघितले पाहिजे. शिक्षण हे केवळ तात्पुरती परीक्षा आणि गुणसंपादनासाठी नाही हे त्यांना आधीच कळले तर पुढील वाटा आपसूकच मोकळ्या होतील. शिक्षणाबद्दलची ही गोडी त्यांच्या मनात निर्माण करण्याची खरी जबाबदारी अध्यापकांची आहे. परीक्षा केवळ पाठ्यपुस्तकावर नाही तर अभ्यासक्रमावर आधारित असावी, अशी इच्छा असेल तर शिक्षकांनीसुद्धा पाठ्यपुस्तकाबाहेर पडून विद्यार्थ्यांचे ज्ञानवर्धन करायला हवे आणि ते स्वत:ची ज्ञानकक्षा वाढवतील तेव्हाच हे शक्य होईल.
अध्यापनात रंजकता आणल्यास गणित अथवा भाषाच काय पण इतर कुठलाही विषय शिकणे विद्यार्थ्यांना आनंददायी वाटेल. त्यादृष्टीने शिक्षकांनी शिकविताना वेगवेगळ्या आणि सोप्या, सहज पद्धतींचा वापर केला पाहिजे. प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासोबतच इंटरनेट, मोबाईल, शैक्षणिक अॅप अशा अत्याधुनिक साधनांचा वापर केल्यास त्याचे चांगले परिणाम पुढे येऊ शकतात. काही ठिकाणी शिक्षकांच्या तरुणपिढीने असे अभिनव प्रयोग सुरुही केले आहेत पण त्याची व्याप्ती वाढवावी लागणार आहेत. ‘घोका आणि ओका’ हे आता पूर्णत: बंद झाले पाहिजे. ती काळाची गरज आहे. अशा साचेबद्ध शिक्षण पद्धतीने मुलांचा विकास तर खुंटतोच शिवाय त्यांची विचार क्षमताही मंदावते. याचा सारासार विचार करीत मुलांमधील सृजनशीलता आणि कुतूहल जागरुक करणारे शिक्षण दिल्यास गणितच काय पण कुठलाही विषय त्यांना अवघड वाटणार नाही.
-सविता देव हरकरे