आदर्श लोकोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:42 PM2017-09-08T23:42:03+5:302017-09-09T00:25:17+5:30
गणेशोत्सवाला लोकोत्सवाचे रूप देण्यासाठी प्रशासनासोबतच स्वयंसेवी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आणि त्याचे दृश्य परिणाम दिसून आले.
गणेशोत्सवाला लोकोत्सवाचे रूप देण्यासाठी प्रशासनासोबतच स्वयंसेवी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आणि त्याचे दृश्य परिणाम दिसून आले. शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था कायम राहिली, पण त्यासोबतच स्वच्छता व सौंदर्य प्राप्त झाले.
गणेशोत्सव हा लोकोत्सव बनावा, ही अपेक्षा या उत्सवाच्या शताब्दीमध्ये पूर्णत्वाला गेल्याचा आनंद आहे. अलीकडे सण-उत्सव म्हटला की, प्रशासनावर ताण येतो. कायदा व सुव्यवस्था राखणे हे मोठे आव्हान असते. केवळ शांतता समितीच्या बैठका घेऊन सण शांततेत साजरे होतील, ही शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे काही प्रशासकीय अधिका-यांनी वेगळी वाट चोखाळत या उत्सवात स्वत: सक्रिय सहभाग घेतला तसेच लोकसहभाग मोठ्या प्रमाणात वाढविला. त्याचे दृश्य परिणाम खान्देशात दिसून आले. किरकोळ अपवाद वगळता बकरी ईद आणि गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे झाले.
नंदूरबार जिल्ह्यात या उत्सवाला यंदा नोव्हेंबरमध्ये होणाºया पालिका निवडणुकांची पार्श्वभूमी होती. नंदुरबार, नवापूर आणि तळोदा या शहरात सर्वपक्षीय इच्छुकांनी गणेशोत्सव धडाक्यात साजरा केला. मोठ्या वर्गणीमुळे उत्सवामध्ये रंगत आली आणि कार्यकर्तेदेखील सुखावले. नंदुरबार शहरात वर्षभरात झालेल्या दंगलीच्या दोन-तीन घटनांमुळे चिंतेचे सावट होते. राज्य सरकारनेदेखील त्याची दखल घेत गणेशोत्सवाच्या तोंडावर जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली करून संजय पाटील या खान्देशपुत्राला पाठविले. त्यांनी परिस्थिती कुशलतेने हाताळली. तशीच अवस्था धुळ्यात होती. कुख्यात गुंड गुड्ड्याच्या खुनाचे सावट अजून कायम आहे. एक-दोन आरोपी फरार असल्याने पोलीस दलावर ताण कायम आहे. या प्रकरणावरून राजकीय धुळवड कायम असताना प्रशासनाने त्याचा परिणाम गणेशोत्सवावर होऊ दिला नाही.
जळगावात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सकारात्मक भूमिका घेत गणेशोत्सव महामंडळ, स्वयंसेवी व सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद साधत गणेशोत्सवाला लोकोत्सवाचे रूप दिले. जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त प्रभार असल्याने त्यांनी कायदा व सुव्यवस्थेसोबतच स्वच्छता मोहिमेची जोड दिली. गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाºयांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन अडचणी समजून घेतल्या. वेळेपूर्वी एक खिडकी योजना सुरू करून सर्व परवानगी तात्काळ देण्यात आल्या. हद्दपारी व प्रतिबंधात्मक नोटिसा हे हत्यार आवश्यक त्या व्यक्तींविरुध्दच वापरण्यात आले. विसर्जन मार्ग, अतिक्रमणे यासंबंधी महामंडळ कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरून समस्या जाणून घेतली आणि तातडीने उपाययोजना केल्या. त्याचा परिणाम असा झाला की, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी, अडचणी उरल्या नाहीत. त्यापाठोपाठ प्रशासनाने स्वच्छता मोहिमेमध्ये स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे यांना सहभागी करून घेतले. स्थापनेनंतर विक्री केंद्रांजवळ पडलेला कचरा दुसºया दिवशी सकाळी उचलून घेण्यात आला. त्यात चक्क मूर्तीविक्रेत्यांनी सहभाग दिला. दीड, तीन, पाच व सात दिवसांच्या मूर्ती विसर्जनानंतर मेहरुण तलावाजवळ निर्माल्य अस्ताव्यस्त पडले होते. तेथे सफाई मोहीम राबविण्यात आली. १२ व्या दिवसाच्या विसर्जनानंतर शाळकरी मुले, महाविद्यालयीन तरुणांच्या सहकार्याने पुन्हा एकदा तलाव आणि शहरातील विसर्जन मार्ग पूर्ववत करण्यात आला. एवढ्या मोठ्या संख्येने जळगावकर स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्याचे हे पहिले उदाहरण ठरले.
१९८० च्या दंगलीनंतर जळगावातील गणेशोत्सवाचा उत्साह ओसरला होता. दंगलीची भीती आणि पोलीस दलाचे कारवाईचे भूत मानगुटीवर असल्याने तरुणांचा सहभाग कमी झाला होता. सुसंस्कृत आणि निकोप वातावरणासाठी हे योग्य नाही, असे समाजमनाला जाणवत होते. प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.अविनाश आचार्य यांनी पुढाकार घेऊन एक चमू तयार केली आणि रस्त्यावर उतरून समाजात विश्वास आणि उत्साह पुन्हा निर्माण केला. तो उत्साह अजूनही कायम असून प्रशासनाच्या पुढाकाराने त्याला विधायक वळण देण्यात आले, हे यंदाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. सज्जनशक्ती सक्रिय झाल्यास बदल निश्चित होणार, हा विश्वास निर्माण झाला.
- मिलिंद कुलकर्णी