सेवा-करुणेचा आदर्श : सावित्रीबाई फुले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 05:59 AM2020-01-03T05:59:31+5:302020-01-03T06:01:51+5:30
Information About Savitribai Phule : १९व्या शतकातील कठोर सामाजिक वास्तवाचे कवच भेदून भविष्याचा अचूक वेध घेण्याची कुवत भारतातील ज्या अपवादात्मक स्त्री क्रांतिकारकांमध्ये होती त्यात सावित्रीबाईंचे नाव अग्रणी आहे.
- प्रज्ञा अभय गायकवाड, सामाजिक चळवळीच्या अभ्यासक
१९व्या शतकातील कठोर सामाजिक वास्तवाचे कवच भेदून भविष्याचा अचूक वेध घेण्याची कुवत भारतातील ज्या अपवादात्मक स्त्री क्रांतिकारकांमध्ये होती त्यात सावित्रीबाईंचे नाव अग्रणी आहे. सावित्रीबाई फुलेंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. पुणे-सातारा रस्त्यावरील शिरवळजवळील नायगाव हे त्यांचे जन्मगाव. सावित्रीबाई या खंडोजी नेवशे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत. १८४० साली वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा जोतिरावांशी विवाह झाला. ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात जन्मलेले जोतिराव त्यावेळी १३ वर्षांचे होते.
महात्मा जोतिराव फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे देशाच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील आगळेवेगळे जोडपे होते. १ मे १८५१ ते ३० एप्रिल १८५२च्या शैक्षणिक अहवालात म्हटल्याप्रमाणे ‘जोतिरावांनी स्वत:च्या पत्नीला घरी शिक्षण देऊन
शिक्षिका बनविले.’ २२ नोव्हेंबर १९५१च्या ‘बॉम्बे गार्डियन’ वृत्तपत्रातील बातमीवरून सावित्रीबाईंच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी जोतिरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर (जोशी) यांनी घेतल्याचे दिसते. सावित्रीबाईंनी अहमदनगर येथे फॅरारबाई व पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचे प्रशिक्षणही घेतल्याने सावित्रीबाई याच आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत, हे तत्कालीन दस्तऐवजांवरून स्पष्ट होते.
संपूर्ण देशात मुलींची शाळा आणि ‘नेटिव्ह लायब्ररी’ सर्वप्रथम सुरू करण्याचे श्रेय या पती-पत्नींकडेच जाते. देशातील ‘साक्षरता अभियानाची’ सुरुवात फुले दाम्पत्याने १८५४-५५मध्ये केली. फसवल्या गेलेल्या ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी १८६३ साली स्वत:च्या घरात त्यांनी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ काढले. ‘सत्यशोधक समाज’ स्थापन करून हुंड्याशिवायच्या कमी खर्चातील पद्धतीच्या सत्यशोधक विवाहाची प्रथा त्यांनी सुरू केली. स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला करून जातिनिर्मूलनाच्या कार्यक्रमाला फुले दाम्पत्याने थेट हात घातला. बालविवाहांना विरोध करूनच सावित्रीबाई व जोतिबा फुले थांबले नाहीत, तर त्यांनी विधवांचे पुनर्विवाह समारंभपूर्वक घडवून आणले. स्वत:ला मूलबाळ झाले नाही, तेव्हा एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेऊन त्याला वैद्यकीय शिक्षण दिले आणि त्याचा आंतरजातीय विवाह करून दिला. या त्यांच्या कामाचे वर्णन करताना एका अनामिक पत्रकाराने ‘दि पुना ऑब्झर्व्हर अॅण्ड डेक्कन विकली’ या नियतकालिकात लिहिले होते, ‘हे काम म्हणजे हिंदू संस्कृतीच्या इतिहासातील एका नव्या युगाचा आरंभ होय.’
वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी जोतिरावांनी एका ऐतिहासिक कामात हात घातला होता. त्यांना संपूर्ण साथ देणारी त्यांची पत्नी त्या वेळी अवघ्या १८ वर्षांची होती. एक चांगला विचार एकट्याने करण्याऐवजी समविचारी मंडळी एकत्र येऊन ते काम करावे यासाठी त्यांनी संस्था स्थापन केली. जोतिराव-सावित्रीबाईंनी नेटिव्ह फिमेल स्कूल, पुणे तसेच दि सोसायटी फॉर प्रमोटिंग दि एज्युकेशन ऑफ महारस्, मांग्ज अॅण्ड एक्सट्राज अशा दोन शिक्षण संस्था सुरू केल्या. या संस्थेमार्फत त्यांनी पुणे परिसरात शाळांचे जाळे विणले. जोतिराव-सावित्रीबाईंचा मुलामुलींना श्रमप्रधान शिक्षण देण्यावर भर होता.
समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाई काम करीत होत्या. त्या शाळेत जाता-येताना टोळभैरव मुद्दाम रस्त्यावर थांबत. अचकट-विचकट बोलत, कधी कधी दगड मारीत, अंगावर चिखल किंवा शेण टाकीत असत. शाळेत जाताना सावित्रीबाईंना सोबत दोन साड्या न्याव्या लागत. रस्त्याने जाता-येता त्या खराब होत आणि तरीही सावित्रीबाई आपल्या कामात खंड पडू देत नव्हत्या. हे असेच सुरू राहिल्यामुळे सावित्रीबाईंच्या व लहान मुलींच्या संरक्षणासाठी संस्थेने एका शिपायाची नियुक्ती केली. त्या शिपायाने लिहून ठेवलेल्या आठवणीनुसार सावित्रीबाई आपल्या अंगावर दगड फेकणाऱ्यांना म्हणत, ‘मी माझ्या भगिनींना शिकविण्याचे पवित्र कार्य करत असताना तुम्ही माझ्यावर शेण आणि दगड फेकत आहात. पण, ही मला फुलेच वाटतात. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो!’ अशाप्रकारे सावित्रीबाई प्रत्येक काम धैर्याने करत गेल्या.
१८७४ साली एक स्त्री त्यांच्याकडे आली होती. तिचाच मुलगा सावित्रीबाईंनी दत्तक घेतला. त्याला वैद्यकीय शिक्षण देऊन डॉक्टर बनविले. त्या यशवंत नावाच्या मुलाने सावित्रीबाई व जोतिराव फुले यांचे काम पुढे चालविले. ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाभिकांना संघटित करून त्यांचा संप घडवून आणण्याचा उपक्रम दीनबंधूचे संपादक, कामगार नेते मेघाजी लोखंडे यांनी घडवून आणला. त्यामागची प्रेरणा सावित्रीबाई होत्या. ज्योतिराव व सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना २४ सप्टेंबर १८७३ रोजी केली. सावित्रीबाई समाजाच्या खंद्या कार्यकर्त्या होत्या. सावित्रीबाईंनी आपल्या दत्तक पुत्राचा यशवंताचा विवाह देखील सत्यशोधक पद्धतीने केला. विशेष म्हणजे हा विवाह भारतातला आधुनिक काळातला पहिला आंतरजातीय विवाह मानला जातो.
सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालविले होते. लक्ष्मण कराड जाया या विद्यार्थ्याने सावित्रीबाईंबद्दल काढलेले उद्गार ‘सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी अजूनही कोठे पाहिलेली नाही’ सावित्रीबाई १८४८ ते १८८७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी अखंड राबत होत्या. सेवा आणि करुणा याचा एक अनोखा आदर्श या स्त्रीने घालून दिला.
अशा या सावित्रीआईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चार ओळी मी मांडते आणि थांबते.
तुमच्यामुळेच ज्ञानरथ हा दौडू लागे वेगात,
सिद्ध केला शिष्य तुम्ही, स्पर्धा करण्या जगात,
मोल ना तुमच्या सेवेचे, अमूल्य आहे कार्यगाथा,
तुमच्या शिक्षणसेवेपुढे नमतो आमचा विनम्र माथा ।।
समाजाने पुरोहित नाकारुन साध्या पद्धतीने, हुंड्याशिवाय कमी खर्च करून विवाह लावावे असा त्यांचा आग्रह किंवा मत असायचे. पहिला सत्यशोधक विवाह २५ डिसेंबर १८७३ रोजी लावण्यात आला. ‘सावित्रीबार्इंची मैत्रिण बजूबाई ग्यानोबा निंबणकर यांची कन्या राधा आणि कार्यकर्ते सीताराम जबाजी आल्हाट यांचा विवाह हा पहिला सत्यशोधक विवाह.’
ज्योतिरावांना जुलै १८८७ मध्ये पक्षाघाताचा आजार झाला आणि या आजारातच त्यांचे निधन २८ नोव्हेंबर १८९० रोजी झाले. अंत्ययात्रेच्या समयी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावांचे पुतणे आडवे आले आणि यशवंताला विरोध करू लागले. अशावेळी सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या आणि स्वत: त्यांनी टिटवे धरले. अंत्ययात्रेत त्या अग्रभागी चालल्या आणि त्यांनी स्वत:च्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासात एका स्त्रीने अग्नी देण्याचा हा पहिलाच प्रसंग. अशा प्रकारचे धाडस सावित्रीबाई फुलेंमध्ये शिक्षणाने आले.
१८९७ साल उजाडले ते प्लेगचे थैमान घेऊनच. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई त्याच्याकडे धावल्या. मुलाला पाठीवर घेऊन धावत-पळत त्या दवाखान्यात पोहोचल्या. त्यातच सावित्रीबार्इंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ रोजी रात्री ९ वाजता प्लेगमुळे त्यांचे निधन झाले.
- प्रज्ञा अभय गायकवाड