सहिष्णुतेचे आदर्श
By admin | Published: June 23, 2017 12:01 AM2017-06-23T00:01:41+5:302017-06-23T00:01:41+5:30
असहिष्णुतेमुळे देशातील सामाजिक वातावरण गढुळले असल्याची टीका सातत्याने होत आहे. धार्मिक कारणांवरून परस्परांमध्ये तेढ निर्माण होत आहे.
असहिष्णुतेमुळे देशातील सामाजिक वातावरण गढुळले असल्याची टीका सातत्याने होत आहे. धार्मिक कारणांवरून परस्परांमध्ये तेढ निर्माण होत आहे. तथाकथित गोरक्षकांचे हल्ले, अल्पसंख्यांकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करीत आहे. परधर्मीयांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करण्याचे, त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रमाण आपल्या देशातच नव्हे, तर जगभर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, धार्मिक सहिष्णुतेची काही उदाहरणे जगातील इतर देशांसह आपल्या देशातही दिसतात. जर्मनीत बर्लिनमध्ये ख्रिश्चन प्रोटेस्टंट पंथीयांच्या सेंट योहान्स चर्चमध्ये चक्क एक मशीद सुरू करण्यात आली आहे. ‘इबान रुश्द गोयेथ’ या नावाने ही मशीद ओळखली जाते. मुस्लिम विचारवंत इबान रुश्द आणि प्रख्यात जर्मन साहित्यिक योहान व्हॉन गोयेथ यांचे संयुक्त नाव या मशिदीला देण्यात आले आहे. अशीच दुसरी आदर्श घटना आहे संयुक्त अरब आमिरातची राजधानी अबूधाबी येथील. येथील महम्मद बिन झायेद मशिदीचे नाव आता मरियम उम्म इसा (मेरी मदर जिझस) असे करण्यात आले आहे. देशातील विविध धर्मांच्या नागरिकांशी सलोख्याचे संबंध असावेत, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सहिष्णुतेचा आदर्श घालून देणारी उदाहरणे जशी परदेशात घडतात, तशीच आपल्या देशातही घडत आहेत. सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. केरळमधील मल्लपुरम येथे असलेल्या १७ मशिदींपैकी एकाच मशिदीतून अजान (प्रार्थना) ध्वनिक्षेपकावरून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वलिया जुमा या मोठ्या मशिदीतून दिवसातून पाच वेळा दिली जाणारी अजान ध्वनिक्षेपकावरून ऐकवली जाईल. अन्य मशिदीत यावेळी नमाज पढताना ध्वनिक्षेपक वापरला जाणार नाही. दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील बरेली येथे विविध ध्वनिक्षेपकांवरून पहाटे दिल्या जाणाऱ्या अजानच्या आवाजासाठी ध्वनिक्षेपक वापरू नये, या मागणीला काही मुस्लिम बांधवांनीही पाठिंबा दिला आहे. धर्मा-धर्मांमध्येच नव्हे, तर एकाच धर्मातील जाती-जातींमध्ये तेढ वाढविणाऱ्या घटना सध्या घडत आहेत. ही आपली परंपरा नाही. आषाढीसाठी पंढरीला गावागावातून दिंड्या निघाल्या आहेत. धर्म-जातीच्या पलीकडे जाऊन विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या आपल्या संतपरंपरेचा विसर कुणालाही पडू नये. त्यासाठी सौहार्दाचे दर्शन घडविणारे असे आदर्श दीपस्तंभाप्रमाणे काम करतील.