कल्पना आणि त्यामधील खोटे !!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 03:02 AM2020-04-28T03:02:40+5:302020-04-28T03:02:56+5:30
आरोपींपैकी आणखी कित्येकजण भाजपचेच आहेत, हे पुढे चौकशीत आणि खटल्यात स्पष्ट होईलच.
- अजित अभ्यंकर
दिनांक २५ एप्रिल २०२० रोजीच्या ‘लोकमत’मध्ये आशिष शेलार यांनी लिहिलेला ‘घटना आणि त्यामागील ‘बावटे’ हा लेख प्रकाशित झालेला आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती सांगणारा हा लेख.
देशात कोरोना नावाच्या अत्यंत भीषण अशा आपत्तीला संपूर्ण देश एकजुटीने, निर्धाराने तोंड देतो आहे, पण महाराष्ट्रातील तसेच देशातील अशी ही एकजूट ज्यांना पहावत नाही, ज्यांचे राजकारण हे धार्मिक-सामाजिक फूट पाडण्यावरच उभे आहे आणि महाराष्ट्रात ज्यांना लाज राखण्यासाठी काहीही उरलेले नाही, अशा काहींचा जीव त्यामुळे कासावीस झाला आहे. जनतेच्या या अपूर्व एकजुटीच्या वातावरणामध्ये शेलार यांचा लेख व त्यातील बेताल-बेछूट वक्तव्ये म्हणजे द्वेषाचा खडा टाकणाऱ्या अफवा आहेत. मात्र, त्या अफवा असल्याने प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.
१४ एप्रिल रोजी बांद्रा स्टेशनवर जी गर्दी जमली त्यामागे विवेक माँटेरो राज्य सचिव असणारी सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) ही संघटना होती, असे ते म्हणतात. त्यांनी असेदेखील ठोकून दिले आहे की, बांद्रा येथे ‘सिटू’ संघटनेच्या वतीने १४ तारखेपूर्वी निदर्शने झालेली होती. त्याची दखल सरकारने घेतली नाही म्हणून हा जमाव जमविण्यात आला. त्यांची ही सर्व विधाने धादांत खोटी आहेत. ती निखळ द्वेषबुद्धीमधून निर्माण झालेली आहेत. पोलिसांनी बांद्रा घटनेची चौकशी आणि काही कारवाईदेखील केलेली आहे. त्यात सिटू, विवेक माँटेरो हे नाव दुरान्वयानेदेखील आलेले नाही. शिवाय या घटनेचा संबंध आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो तर हास्यास्पद आहे. त्याला काहीही आधार नाही. काहीही करून महाराष्ट्राच्या राज्यकारभारात केंद्राचा, खासकरून अमित शहांचा हस्तक्षेप करवून घेण्यासाठीचा कपटी इरादा या लेखनामागे स्पष्ट दिसतो.
मुंबईमध्ये अडकून पडलेल्या असहाय्य गरजू कामगारांना मदत देण्यासाठी कामगार संघटना कृती समिती काम करते आहे. त्याचाच एक भाग असणाºया ‘सिटू’चे मुंबईमधील एक नेते विवेक माँटेरो यांनी स्वत: बांद्रा पश्चिम येथील लोकप्रतिनिधी आमदार म्हणून शेलार यांच्याशी संपर्क केला. १७ व १८ एप्रिलला त्यांच्यामध्ये तोंडी तसेच एसएमएस माध्यमातून संवाद झाला. त्यामध्ये माँटेरो यांनी या परिसरात असे ५ हजार कामगार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. या संपूर्ण सकारात्मक संवादात शेलार यांनी १४ एप्रिलच्या घटनेचा अथवा तथाकथित निदर्शनांचा उल्लेखसुद्धा केला नाही. तरीही उपाशी कामगारांना मदत करणाऱ्यांवरच ते आता असे बेछूट आरोप करीत आहेत.
पालघर येथील जमाव हत्या
१६ एप्रिलला रात्री डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात जमावाकडून तिघांची (दोन साधू व एक ड्रायव्हर) अत्यंत दु:खद जमावहत्या झाली. सर्व डाव्या पक्षांनी व संघटनांनी तत्काळ त्याचा निषेध करून त्यातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, या घटनेचे भांडवल करून धार्मिक द्वेष भडकविण्यासाठी भाजपचे नेते सुनील देवधर, संबित पात्रा व त्यांच्या गोदी मीडियाचे प्रवक्ते अर्णब गोस्वामी यांनी आणि आता शेलार यांनी बेछूट वक्तव्ये केली आहेत. तेथे खरे तर पक्षीय मुद्दाच नसतानाही त्यामागे लाल बावटा असल्याचे ध्वनीत केले जात आहे. वस्तुस्थिती मात्र नेमकी उलट आहे. हे सर्वांनी नीट माहीत करून घेणे गरजेचे आहे.
पोलिसांनी जे पाच मुख्य आरोपी अटक केलेले आहेत, त्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एकही सभासद नाही. तेथे कोणीही मुस्लिम नाही. गडचिंचले गाव गेली १० वर्षे भाजपच्याच प्रभावाखाली आहे. आजसुद्धा तेथील सरपंच भाजपच्याच आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर पुरावे आणि फोटो देऊन दाखविले आहे की, या प्रकरणात अटकेत असलेले दोघेजण भाजपच्या बूथ कमिटीचे सदस्य आहेत. आरोपींपैकी आणखी कित्येकजण भाजपचेच आहेत, हे पुढे चौकशीत आणि खटल्यात स्पष्ट होईलच.
गडचिंचले या दुर्गम आडगावात अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेला कोणताही धार्मिक-राजकीय रंग नव्हता. रात्री चोर मुले पळविण्यासाठी येतात, ते मुस्लिम असून वेश बदलून येतात, विहिरीत कोरोनाग्रस्त थुंकतात, आदी अफवा या परिसरातील गावांमध्ये गेल्या काही आठवड्यात पसरविल्या गेल्या होत्या. अशा अफवांबाबत काही ग्रामपंचायतींनी पोलीस तसेच प्रशासनाकडे तक्रारीदेखील केलेल्या होत्या.
या वातावरणात गुजरातला जाण्यासाठी परवाना नसल्यामुळे पोलिसांना चुकविण्यासाठी त्या रात्री गडचिंचले गावात ही जीप अचानकपणे आली. जमाव जमला व ही घटना घडली. घटना आणि त्यामागचे बावटे बघायचे असतील, तर नुकतेच दिल्लीत झालेले दंगे पहा. त्या दंग्यांआधी भाजपच्या खासदाराने गोळ्या घालण्याचे आवाहन केले. तसेच देशाच्या गृहमंत्र्यांसह अन्य नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्ये केली होती. नंतर तशाच गोळ्या घालण्याच्या कृती व दंगे कसे झाले? महात्मा गांधींचा खुनी नथुराम गोडसेचे जाहीर उदात्तीकरण करणाºयांना खासदारकीची तिकिटे देणाºयांचा बावटा कोणता? याचा शोध शेलार यांनी घ्यावा. त्यातून घटनांमागचे खरे बावटे दिसतील. त्यांना सद्बुद्धी सुचेल व त्यांच्या मतदारसंघातील उपाशी मजुरांबाबत तरी ते संवेदनशील होतील, अशी अपेक्षा करूया.
(डाव्या चळवळीचे नेते)