२०१९ ची गाडी सुटली तर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:27 AM2018-04-07T00:27:38+5:302018-04-07T00:27:38+5:30
संघटनेच्या बळावर निवडणुका जिंकण्याचे टायमिंग साधणाऱ्या नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची गुरुवारी मुंबईची गाडी सुटली. नियोजित वेळेच्या आधी गाडी सोडण्याचा स्मार्टपणा रेल्वेने दाखविल्याने केवळ २४ कार्यकर्त्यांना घेऊन भाजपाच्या स्थापना दिनाचा सोहळा गाठण्यासाठी स्पेशल गाडी मुंबईकडे रवाना झाली.
संघटनेच्या बळावर निवडणुका जिंकण्याचे टायमिंग साधणाऱ्या नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची गुरुवारी मुंबईची गाडी सुटली. नियोजित वेळेच्या आधी गाडी सोडण्याचा स्मार्टपणा रेल्वेने दाखविल्याने केवळ २४ कार्यकर्त्यांना घेऊन भाजपाच्या स्थापना दिनाचा सोहळा गाठण्यासाठी स्पेशल गाडी मुंबईकडे रवाना झाली. मात्र पक्षाच्या स्थापना दिनी नागपुरातून केवळ २४ कार्यकर्तेच मुंबईला गेल्याची नोंद झाली तर,पक्षश्रेष्ठींना काय मॅसेज जाईल? अशी चर्चा नागपुरातील रेल्वेस्थानकावर रंगली. याचवेळी रेल्वेस्थानकावर उपस्थित असलेल्या दीड हजारांहून अधिक भाजपा कार्यकर्त्यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ला सुरुंग लावत गाडी नियोजित वेळेच्या आधी सोडणाºया रेल्वे अधिका-यांना निलंबित करण्याची मागणी केली. मुळात मुंबईसाठी नागपुरातून जाणा-या स्पेशल गाडीचे बुकिंग हे मुंबईतूनच करण्यात आले होते. यात नागपूर रेल्वे स्थानकावरून गाडी सुटण्याची वेळ ८.१५ अशी नमूद करण्यात आली होती. मात्र असे असतानाही स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना पक्षाने रेल्वे स्थानकावर १० वाजता येण्याची वेळ दिली होती. त्यामुळे ‘टायमिंग’ रेल्वेचे चुकले की भाजपचे यावर सध्या खल सुरू आहे. हा विषय केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प नागपुरातील पक्ष कार्यकर्त्यांनी केला आहे. पहिल्या स्पेशल गाडीचे टायमिंग चुकल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांना घेऊन दुसरी गाडी गुरुवारी दुपारी ३.२४ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे रवाना झाली. मात्र ती गुजरातमार्गे मुंबईला पोहोचल्याने शुक्रवारी नव्या वादाला रेल्वे प्रशासनाला तोंड द्यावे लागले. संघाच्या शिस्तीत वावरणाºया नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांचा स्थापना दिनाचा सोहळा गाठण्याचे टायमिंग चुकविणाºया रेल्वे प्रशासनाला हे निश्चितच महागात पडेल! मात्र रेल्वेने ८.१५ वाजताची वेळ दिली असताना कार्यकर्त्यांना १० वाजता रेल्वे स्थानकावर येण्यास सांगण्याचा स्मार्टपणा कुणी दाखविला? कार्यकर्त्यांचे ‘टायमिंग’ कुणी चुकविले यावर शिस्तप्रिय भाजपात निश्चितच मंथन होईल. मात्र भाजप कार्यकर्त्यांची गाडी चुकल्याने आणि ती गुजरातमार्गे मुंबईला पोहोचल्याने विरोधकांच्या मनात निश्चितच गुदगुल्या झाल्या असाव्या. २०१९ मध्ये भाजपची गाडी अशीच सुटेल, असे मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. अॅट्रॉसिटी, महागाई, बेरोजगारी आणि जातीय दंगलीवर देशभरात वादंग सुरू आहे. मात्र भाजपाचे यावर मौन आहे. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३५० जागांचा पल्ला गाठण्यासाठी भाजपाला संघाने सुचविलेल्या ‘सामाजिक समरसता एक्स्प्रेस’मधून प्रवास करणे गरजेचे आहे. अन्यथा नागपुरातील घटनेचा प्रत्यय भाजपाला २०१९ मध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही.