नायलॉन मांजा लोकांनीच या घातक वस्तूचा वापर करणे बंद केला तर त्याचा वापर थांबेल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 06:05 AM2023-01-17T06:05:05+5:302023-01-17T06:05:17+5:30
प्रेमात आणि युद्धात सारेच क्षम्य असते. त्यामुळे प्रेमात ज्यांची पतंग भरकटली आहे, अशांकरिता आपल्या नायलॉन मांजामुळे कुणाचा गळा कापला जातो आहे किंवा कुणाला जखम होत आहे, याचे भान असण्याचा प्रश्नच नाही
नववर्षाचे वेध लागताच देशातील काही राज्यांत विशेषकरून गुजरात, महाराष्ट्रामध्ये पतंगबाजीला ऊत येतो. तसाही सध्या वेगवेगळ्या क्षेत्रातील पतंगबाजीला ऊत आला आहेच. म्हणजे राजकीय नेते कधीही पूर्ण न होणाऱ्या आश्वासनांचे पतंग बदवत असतात; तर इलेक्ट्रॉनिक माध्यमे दररोज दिवसभर अफवांचे पतंग हवेत उंचच उंच घेऊन जातात व नंतर त्या तथाकथित बातम्या म्हणून बदवलेले पतंग सोडून देतात. अनेक उत्पादने आपल्या प्रॉडक्टच्या गुणांबाबत पतंगबाजी करतात. ग्राहक वर्षानुवर्षे ती उत्पादने वापरतात. परंतु जाहिरातीत दावा केल्याप्रमाणे गुण येत नाही. मात्र ही पतंगबाजी जीवघेणी नाही. नायलॉन मांजाचा वापर करून खरीखुरी केली जाणारी पतंगबाजी सध्या अनेकांकरिता जीवघेणी ठरत आहे. गेल्या १५ दिवसांत नायलॉन मांजामुळे ५० व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये राहणारे संजय कबीर हजारे हे कल्याण नाका येथून भिवंडीच्या दिशेने जात असताना त्यांचा गळा कापला गेला व हजारे यांचा मृत्यू झाला. नागपूर येथील वेद कृष्णा साहू या ११ वर्षीय मुलालाही मांजामुळे जीव गमवावा लागला. दरवर्षी संक्रांतीच्या सुमारास या मांजाच्या वापरामुळे अनेकांचे गळे, चेहरे कापले जात असल्याने राज्यात नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी आहे. मात्र हा मांजा सर्रास विकला जात आहे. ‘लोकमत’ने आपल्या प्रतिनिधींच्या मदतीने नायलॉन मांजाची उपलब्धता, कारवाई व जखमी व्यक्ती यांचा आढावा घेतला असता जानेवारी महिन्यात पोलिसांनी १३१ कारवाया करून २७ लाखाहून अधिक किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला. त्यामध्ये विदर्भात सात लाख २३ हजारांचा, मराठवाड्यात १६ लाखांचा, उत्तर महाराष्ट्रात तीन लाख ५८ हजारांचा तर पश्चिम महाराष्ट्रात २९ हजार रुपयांचा मांजा जप्त केला.
एकीकडे कारवाया सुरू असल्या तरी नायलॉन मांजा सर्रास उपलब्ध होत असून, लहान मुले व तरुणाई पतंग उडवण्याकरिता त्याचा वापर करीत आहे. आपल्याकडे प्लास्टिक पिशव्यांपासून अमली पदार्थांपर्यंत अनेक वस्तूंच्या विक्रीवर, वापरावर निर्बंध आहेत. परंतु प्लास्टिक पिशवी मागितल्यावर हळूच ती काढून दिली जाते व शाळा-कॉलेजच्या जवळील पानवाले, खाद्यपदार्थांचे स्टॉल येथे अमली पदार्थांची गुपचूप विक्री होते. प्रतिबंध केलेल्या वस्तूंवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेले विभाग दिखाव्यापुरती कारवाई करतात. कारवाई करणाऱ्या विभागांवर आठ-दहा जबाबदाऱ्या टाकलेल्या असतात. त्यापैकी एक जबाबदारी म्हणजे नायलॉन मांजाची विक्री रोखणे ही असते. त्यामुळे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या प्राधान्यक्रमावर कदाचित आठव्या किंवा दहाव्या स्थानी नायलॉन मांजा पकडणे हे काम असते. नायलॉन मांजामुळे लागोपाठ दुर्घटना घडल्या तर कदाचित एखाद्या शहरात नायलॉन मांजावर कारवाई करण्याचा प्राधान्यक्रम वरचा होतो.
गेल्या काही वर्षांत लहान मुले, तरुण यांच्यातील मोबाइल गेमचे आकर्षण वाढल्याने ती लगोरी, डबा ऐसपैस, पकडापकडी, उभा अथवा बैठा खो-खो यासारखे मैदानी दमछाक करणारे खेळ कमी खेळतात, हे वास्तव असले तरी ‘पतंग’ हा खेळ बॉलिवुडमधील रोमान्सच्या पतंगबाजीला बराच ढील देत असल्याने या खेळाची क्रेझ तरुणाईत आहे. गच्चीच्या टाकीवर चढून किंवा स्टंटबाजी करून समोरच्या गच्चीवरील प्रतिस्पर्ध्याची पतंग काटताना ‘ती’ची नजर आपल्यावर आहे किंवा कसे, याकडे डोळा लावून बसलेल्या रोडरोमिओंमध्ये पतंगाचा शौक ठासून भरलेला आहे. आता काटाकाटीत जास्तीत जास्त पतंग धाराशाही पाडून तिच्या हृदयाचा पतंग पकडायचा तर नायलॉन मांजाला पर्याय नाही, अशी तरुणाईची धारणा असते.
प्रेमात आणि युद्धात सारेच क्षम्य असते. त्यामुळे प्रेमात ज्यांची पतंग भरकटली आहे, अशांकरिता आपल्या नायलॉन मांजामुळे कुणाचा गळा कापला जातो आहे किंवा कुणाला जखम होत आहे, याचे भान असण्याचा प्रश्नच नाही. घरातील थोरले पतंगाची काटाकाटी करत असताना लहानगे कापलेली पतंग पकडण्याकरिता भान हरपून धावतात. रस्त्यावरून धावताना किंवा इमारतीच्या गच्चीवरून पतंग पकडण्याच्या नादात अपघात होऊन जीव गमावतात. पतंग उडवताना नायलॉनचा मांजा न वापरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्लास्टिक पिशव्या असो की नायलॉन मांजा लोकांनीच या घातक वस्तूचा वापर करणे बंद केला तर त्याचा वापर थांबेल. ‘मांजा’ या चित्रपटातील एक गीत लोकप्रिय आहे. ‘है मांजा तेरा ये दिल की पतंग को कांटे... मेरी जान चली जाए’. जीवघेणा मांजा व्हर्च्युअल आणि रियल लाइफमधून हद्दपार केलाच पाहिजे.