शरद पवार यांचा फोटो लावला नाही तर?

By अतुल कुलकर्णी | Published: August 27, 2023 02:38 AM2023-08-27T02:38:00+5:302023-08-27T02:38:12+5:30

काका एक सांगतात. पुतण्या दुसरेच सांगतो. मुलगी तिसरीच भूमिका मांडते. काकांच्या बोलण्यातून किती अर्थ काढायचे ते कळत नाही. पुतण्याची इमेज निगेटिव्ह कोणी केली? असा प्रश्न त्यांच्या गोटातून विचारला जातो.

If Sharad Pawar's photo is not posted? | शरद पवार यांचा फोटो लावला नाही तर?

शरद पवार यांचा फोटो लावला नाही तर?

googlenewsNext

आदरणीय यशवंतराव चव्हाण,
वयाच्या ८२ व्या वर्षी राजकारणात नवी खेळी खेळण्याची सुरुवात शरद पवार यांनी आपल्याच प्रीतीसंगमावरून केली. तेथे पृथ्वीराज चव्हाण त्यांना सामोरे गेले.  वेगळाच संगम महाराष्ट्राने पाहिला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रीतीसंगमावर येऊन आत्मकलेश केला होता. याच काका-पुतण्याच्या राजकीय भूमिकांवरून अवघा महाराष्ट्र संभ्रमात आहे. उत्तराच्या शोधात प्रीतीसंगमावर यावे का? या विचारात आहे. म्हणून आपल्याला हे पत्र.
काका एक सांगतात. पुतण्या दुसरेच सांगतो. मुलगी तिसरीच भूमिका मांडते. काकांच्या बोलण्यातून किती अर्थ काढायचे ते कळत नाही. पुतण्याची इमेज निगेटिव्ह कोणी केली? असा प्रश्न त्यांच्या गोटातून विचारला जातो. तर ताई राहतात काकांसोबत पण नेता पुतण्याला म्हणतात. अशावेळी गावागावांत पसरलेल्या कार्यकर्त्याने नेमके करायचे काय? राजकारणात संभ्रम निर्माण करून खेळी खेळण्याचे काकांचे कसब देशाला माहिती आहे. एखादा विषय सोडून द्यायचा आणि त्यावरून येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत आपली पुढची खेळी आखायची हा त्यांच्या आवडीचा खेळ. मात्र, आता हा खेळ काकांना अडचणीत आणणार की पुतण्याला..?
काका म्हणतात ते दोघे बहीण-भाऊ आहेत. त्या नात्यातून त्यांनी भावाला नेता म्हटले असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र राष्ट्रवादी पक्षात जे काही सुरू आहे, तो कौटुंबिक विषय कसा ठरेल..? का हा पक्षच एका कुटुंबापुरता आहे म्हणून विषय कौटुंबिक आहे? आमच्या हाती जी माहिती आली आहे ती वेगळीच आहे.
याच कुटुंबाची एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये काकांनी राजीनामा द्यायचा निर्णय झाला होता. त्यानंतर जी कमिटी नेमली जाईल त्या कमिटीने ताईंना राष्ट्रीय अध्यक्ष करायचे आणि महाराष्ट्राचे नेतृत्व पुतण्याने करायचे, असे सगळे ठरले होते. कोणत्याही परिस्थितीत काका राजीनामा परत घेणार नाहीत हेही ठरले होते. मात्र ऐनवेळी काकांनी राजीनामा परत घेतला. पुतण्याला त्या दिवशीच्या वागणुकीवरून व्हिलन ठरवले गेले. 
१० जूनला पक्षाच्या वर्धापनदिनी दिल्लीत ताईंना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करायचे, असे ठरले होते. मात्र प्रफुल्ल पटेल पक्षाचे ज्येष्ठ नेते. त्यांनी विरोध केल्याने पक्षात दोन कार्याध्यक्ष केले गेले. महाराष्ट्र कोणाकडे याचा निर्णय झाला नाही. त्यामुळे नंतरच्या पत्रकार परिषदेत पुतण्याने काही न बोलता काढता पाय घेतला. 
२०१७ मध्ये एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अशीच बैठक झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायचे ठरले. मात्र, दिल्लीतून शिवसेना आमचा जुना मित्र असल्यामुळे त्यांना आम्ही सोडणार नाही. यायचे असेल तर त्यांच्यासोबत या, असा मेसेज आला. काकांनी शिवसेना सोबत येत असेल तर आपण सत्तेत जाणार नाही, असे सांगत नकार दिला. हे सगळे जुळवून आणणारे पुतणे मात्र विनाकारण तोंडघशी पडले. 
२०१९ मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करायला आधी काकांनी संमती दिली. मात्र रात्रीतून यू टर्न घेत काँग्रेस, शिवसेनेसोबत महाविकास आघाडी घडविली तेथेही अडचण पुतण्याचीच करून ठेवली. जर शिवसेनेसोबत जायचेच होते तर २०१७ ला का जाऊ दिले नाही? या प्रश्नावर काका काहीच उत्तर देत नाहीत, अशी पुतण्याची तक्रार आहे.
ही माहिती चर्चेत आहे. ही खरी की खोटी याचे उत्तर काका, पुतण्या आणि ताई कोणीही देत नाहीत. विरोधी पक्ष म्हणून काम करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षातील काही नेते सत्तेत असणाऱ्या भाजपसोबत सहभागी झाले, तर तो पक्ष फुटला असे म्हणायचे की नाही? सत्तेत असणारेही आपले आणि विरोधात असणारेही आपले अशी भूमिका घेता येते का? जे नऊ सदस्य भाजपसोबत मंत्रिमंडळात सहभागी झाले त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करायची. तसे पत्र विधानसभा अध्यक्षांना द्यायचे. मात्र, पक्षात फूट पडलेली नाही, ते आमचेच आहेत असे सांगायचे, याचा अर्थ काय..? माझे फोटो लावाल तर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा काकांनी देताच पुतण्याने काकांचे फोटो लावणे बंद केले. त्यातून हा प्रश्न सुटणार आहे का? जिथे काका सभा घेतात तिथेच काही दिवसांनी पुतण्याने जाऊन सभा घ्यायची. तरीही आमच्यात फूट पडलेली नाही, असे लोकांना सांगायचे. याचा अर्थ लोकांना काहीच कळत नाही असा घ्यायचा का..?
पक्षाचे चिन्ह आणि नाव टिकवण्यासाठी अशी खेळी खेळली जात आहे, असे लोक उघड बोलत आहेत. त्याचे उत्तर कोण देणार आहे? ताई आणि दादांनी आपले बहीण-भावाचे नाते जपलेच पाहिजे. मात्र, त्यासाठी गावागावांतल्या कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला का लावायचा..? यशवंतरावजी, आपण द्रष्टे नेते होता. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होता. आपल्या त्यागाच्या कथा एवढ्या वर्षानंतरही लोक सांगतात. सध्या महाराष्ट्रात त्यागाचे हे जे काही नवे धडे गिरवले जात आहेत, त्याला नेमके काय म्हणायचे..?
जाता जाता : वर्षभरापूर्वी शिवसेनेत दोन गट झाले. त्यावर प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर कार्यक्रमात एक प्रश्न विचारला होता. त्याची आज पुन्हा आठवण झाली. ‘तुम्ही राजकारण म्हणून वेगळा पक्ष स्थापन कराल. उद्या आणखी वेगळं काही कराल... तुमच्या या निर्णयामुळे दोन भावात, वडील - मुलात, घराघरात, गावागावात जी फूट पडली आहे, ती कशी भरायची?’, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काहीच उत्तर दिले नव्हते. राष्ट्रवादीत आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यातून पुन्हा एकदा कार्यकर्ते, नेते यांच्यात फूट पडली आहे. ही कशी भरून काढायची याचे उत्तर महाराष्ट्र शोधत आहे. आपण काही मार्गदर्शन करू शकाल का...?
- आपलाच, 
बाबूराव

Web Title: If Sharad Pawar's photo is not posted?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.