आमीरच्या जागी कुणी हिन्दू अभिनेता असता तर ?
By admin | Published: November 26, 2015 10:11 PM2015-11-26T22:11:28+5:302015-11-26T22:11:28+5:30
हिंदी चित्रपटातले खरे आणि पहिले महानायक दिलीपकुमार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांना हे नाव कसे मिळाले याविषयी लिहून ठेवले आहे.
राजदीप सरदेसाई, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)
हिंदी चित्रपटातले खरे आणि पहिले महानायक दिलीपकुमार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांना हे नाव कसे मिळाले याविषयी लिहून ठेवले आहे. बॉम्बे टॉकीजच्या मालक देविका राणी यांनी त्यावेळी त्यांना म्हटले होते ‘युसुफ, मी तुम्हाला अभिनेता म्हणून पुढे आणते आहे, पण मला असे वाटते की तुम्ही पडद्यावर येताना वेगळे नाव धारण करण्याची कल्पना वाईट ठरू नये. तुम्ही ज्या नव्या नावाने ओळखले जाल ते तुमच्या पडद्यावरच्या रोमँटीक भूमिकांना साजेसे असेल आणि प्रेक्षकांच्याही ते चांगले लक्षात राहील. मला वाटते तुमचे नाव दिलीपकुमार असावे, तुम्हाला हे नाव कसे वाटते’? पुस्तकातून मात्र अप्रत्यक्षरीत्या हेच समजते की देविका राणींच्या मते मुस्लीम आडनाव भारतात चालणार नाही आणि तेही १९४० च्या काळात. म्हणून नेहरू युगातल्या व बहु-सांस्कृतिक भारतीय लोकशाहीतल्या पहिल्या महानायकाचे नामकरण दिलीपकुमार असे झाले.
आज त्यानंतरच्या जवळपास सात दशकांनंतर हिंदी चित्रपट सृष्टीवर प्रभाव असणाऱ्या खान त्रिकूटावर नाव बदलून घेण्यासाठी कुठलाच दबाव आला नाही कारण भारतीय समाज दरम्यान बराच पुढे निघून आला. या तिघातला प्रत्येकजण ‘माय नेम इज खान’ असे अभिमानाने सांगू शकतो. पडद्यावरील त्यांच्या भूमिकांची नावे लोकाना सुपरिचित आहेत. शाहरुख खानच्या सहा चित्रपटात त्याचे नाव राहुल होते तर तब्बल १५ चित्रपटात सलमान खान प्रेम होता! (आमीर काही या पठडीत येत नाही). तरीही जग त्यांना किंग खान आणि दिलीपकुमार यांच्या महान परंपरेचे वारसदार म्हणून ओळखतात. त्यांच्या महानायक बनण्याच्या प्रवासात ते मुस्लीम असल्याचा अडसर कधीच आडवा आला नाही. सलमान आणि आमीर यांना जशी चित्रपट सृष्टीची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे तशी शाहरुखला ती नाही. केवळ एकदाच शिवसेनेने शाहरुखच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाला लक्ष्य केले, तेव्हां खान हे आडनाव वादात सापडले होते. अर्थात त्याला एक पार्श्वभूमी होती. काही वर्ष अगोदर शाहरुखने इंडियन प्रिमियर लिगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना सहभागी करून घेण्याचे वक्तव्य केले होते. तेव्हां शिवसेनेच्या प्रवक्त्याने ‘हे सर्व शाहरुख नव्हे तर त्याच्यातला खान बोलला’ अशी प्रतिक्रिया दिली होती. तरीही सर्व खानांचा प्रभाव धार्मिक कुंपणांच्या पलीकडचाच राहिला आहे. सलमान उत्साहात गणेशोत्सव साजरा करतो तर आमीर अतुल्य भारत मोहिमेचा दूत आहे. शाहरुखला तर त्याच्या एका चाहत्याने लुंगी डान्स केला म्हणून चक्क मिठीत घेऊन ओरबाडलेच होते.
आता याच खान त्रिकूटाला गेल्या काही आठवड्यांपासून असहिष्णुतेच्या वादात ओढण्यात येऊन त्यांना भारतीय मुस्लीम म्हणून त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या जात आहेत. मी शाहरुखची मुलाखत घेतली तेव्हां त्याच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेणाऱ्यांवर तो प्रचंड संतापला होता. असहिष्णुतेच्या मुद्यावर बोलताना तो असे म्हणाला होता की, ‘राष्ट्रभक्त असलात तरी धर्मनिरपेक्ष नसणे हा मोठा गुन्हा आहे’. मनात जे आहे तेच बोलणे आवडणाऱ्या अभिनेत्याकडून आलेली ती उत्कृष्ट प्रतिक्रिया वाटली. पण भगव्या कंपूकरिता त्याला राष्ट्रविरोधी ठरवण्यासाठी व पाकिस्तानात त्याची रवानगी करण्यासाठी तेवढे पुरेसे होते.
आता आमीरही तशाच प्रतिक्रियांना सामोरा जात आहे. त्याच्या पत्नीने देशातील असुरक्षित वातावरणाच्या संदर्भात त्याला काही महिन्यांपूर्वी जे सूचित केले त्यातून त्याला केवळ देशातील वाढती चिंता दर्शवून द्यायची होती. पण हेच निमित्त त्याला राष्ट्र-विरोधी ठरविण्यासाठी आणि पाकिस्तानात जा हे ऐकविण्यासाठी पुरेसे ठरले.
यातून प्रश्न असा पडतो की शाहरुख आणि आमीर यांना लक्ष्य करण्यासाठी त्यांचे वलयांकित अभिनेतेपण कारणीभूत ठरले की ते भारतीय मुस्लीम समाजातील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती असणे कारणीभूत ठरले? या वादात जर रणबीर किंवा हृतिक पडले तर त्यांनाही अशाच प्रतिक्रियांना सामोरे जावे लागेल का? स्पष्ट सांगायचे तर या अभिनेत्यांमध्ये आणि त्यांच्या आडनावांमध्ये एक संबंध आहे. त्यांच्या वक्तव्यांबाबत त्यांना सहजी लक्ष्य केले जाते कारण मुस्लिमांच्या राष्ट्रनिष्ठेविषयी देशात नेहमीच शंका उपस्थित केली जाते. दिलीपकुमार यांना पाकिस्तान सरकारने निशाने इम्तियाज हा पुरस्कार दिला तेव्हां त्यांनाही पाकिस्तानी हस्तक आणि समर्थक म्हटलेच गेले होते. सानिया मिर्झाने जेव्हा एका पाकिस्तानी पुरुषाशी लग्न केले, तेव्हा तिला किती दूषणे दिली गेली हेही आज बऱ्याच लोकांच्या लक्षात असेल.
फार फार तर प्रसिद्धी पावलेल्या लोकानी आपल्या मनीच्या भावना व्यक्त करताना काळजीपूर्वक बोलावे, असे तुम्ही म्हणू शकता. पण हेही नाकारुन चालणार नाही की हिंदुत्ववादी शक्ती धर्माच्या आधारावर इतरांवर दोषारोप करण्याची संधीच शोधत असतात. ते विरु द्ध आपण असे ध्रुवीकरण आता वाढत चालले आहे. यामुळे खानांना लक्ष्य करून जे आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत, त्यांच्या दबावाला काही विख्यात लोकदेखील बळी पडत आहेत. हे ध्रुवीकरण सार्वजनिक मतांचेसुद्धा आहे व विशेषत: सामाजिक माध्यमे असहिष्णुतेच्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. इथे समोरच्याची मते राष्ट्रविरोधी ठरवली जातात व त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीदेखील त्यांचा राष्ट्रवाद ठरवीत असतात.
ठेचून मारण्याची मानसिकता असणारा एक समूह दुर्दैवाने दिखाऊ राष्ट्रवादाच्या उन्मादात हरवला गेला आहे. पण वास्तव हेही आहे की समाजातील एक मोठा समूह २१ व्या शतकातील भारताला हिंदू-मुस्लिम विभागणीच्या पलीकडे नेऊ पाहतो आहे. शाहरुख आणि आमीर यांचे आंतर-धर्मीय विवाह हे नव-भारताचे प्रेरक आहेत. शाहरुखने त्याच्या नेहमीच्या पद्धतीत मला सांगितले होते की त्याच्या कुटुंबात ते ईद फटाक्यांनी तर दिवाळी शेवयांनी साजरी करतात.
ताजा कलम- आश्चर्याची गोष्ट अशी की सलमान खान नेहमीच हिंदुत्ववाद्यांकडून होणाऱ्या सरळ हल्ल्यांपासून वाचला आहे. त्याने मुंबई स्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीसंबंधी वादग्रस्त ट्विट केले होते तरी त्याचा निषेध वेगळ्या मार्गांनी झाला होता. कदाचित सलमान जास्त सुरक्षित आहे, कारण त्याने मागील वर्षी मोदींसोबत अहमदाबाद येथे पतंग उडवण्याची संधी शोधली होती. त्या प्रसंगाचे छायाचित्र पंतप्रधानांच्या अल्पसंख्यांक विरोधाचे चित्र सौम्य करणारे होते. आमीर आणि शाहरुख यांना असेच काही करण्याची गरज भासेल का?