तर अशी साहित्य संमेलने उठवळच ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 02:20 AM2017-10-31T02:20:53+5:302017-10-31T02:21:14+5:30

साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड गुणात्मक व्हावी, ती अविरोधच व्हायला हवी. पण पुढच्या काळात ते अशक्य आहे. ज्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व आहे त्यांना या घाणेरड्या राजकारणात पडायचे नाही. त्यामुळे पुढच्या काळात अनेक हवसे-गवसे संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत उतरतील.

If such literary gatherings are rising ... | तर अशी साहित्य संमेलने उठवळच ...

तर अशी साहित्य संमेलने उठवळच ...

Next

- गजानन जानभोर

साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड गुणात्मक व्हावी, ती अविरोधच व्हायला हवी. पण पुढच्या काळात ते अशक्य आहे. ज्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व आहे त्यांना या घाणेरड्या राजकारणात पडायचे नाही. त्यामुळे पुढच्या काळात अनेक हवसे-गवसे संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत उतरतील. यात अगदी आरत्या रचणाºयांपासून तर चारोळ्या खरडणा-यांचीही गर्दी राहील..

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कसा असावा? खरे तर या प्रश्नाचे उत्तर मराठी वाचकांनी शोधायला हवे. पण तसे होत नाही. केवळ १ हजार ७२ मतदार या अध्यक्षाची पात्रता ठरवतात आणि नंतर साहित्य संमेलनाचे सोपस्कार पार पडतात. या निवडणुकीत १०० टक्के मतदान कधीच होत नाही. ८००-९०० मतदार मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करतात. त्यातील बहुतांश आज्ञाधारक, मांडलिक चक्क कोरी मतपत्रिका संघ किंवा परिषदेच्या टोळीप्रमुखाला आणून देतात. मग टोळीप्रमुख अंतिम निर्णय घेतात.
मागील काही वर्षांपासून सातत्याने हेच धंदे सुरू आहेत आणि अशाच पद्धतीने यंदाही बडोद्याचे संमेलनाध्यक्ष ठरणार आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतिकराव ठाले पाटील असोत किंवा विदर्भ साहित्य संघाचे मनोहर म्हैसाळकर या दोघांकडेच या निवडणुकीची सूत्रे असतात. ठाले पाटलांचे समजून घेता येईल, ते प्राचार्य होते, मराठी भाषेचे तज्ज्ञ आहेत. पण म्हैसाळकरांचा तर साहित्याशी तीळमात्र संबंध नाही. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष त्याच्या वाङ्मयीन कर्तृत्वाऐवजी लांगूलचालनातून, घाणेरड्या राजकारणातून निवडला जात असेल तर मग अशी संमेलनेच उठवळ ठरतात. हे राजकारण केवळ संमेलनाध्यक्षांपुरतेच मर्यादित नसते. संमेलनातील परिसंवाद, कविसंमेलनातील वक्ते, कवींमध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता खुशमस्करेच अधिक असतात. संमेलनाध्यक्षांच्या भाषणात औपचारिक चिंतन असते पण कृतिकार्यक्रम नसतो. फार जुने कशाला? मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी वर्षभर काय केले? अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक असहिष्णूता, गौरी लंकेश यांची हत्या अशा अनेक ज्वलंत प्रश्नांवरची त्यांची साक्षेपी मते मराठी जनांना कळायला नको? हा प्रश्न केवळ डॉ. काळेंपुरता मर्यादित नाही. आजवरच्या बहुतांश संमेलनाध्यक्षांनी (काही अपवाद आहेत) सुद्धा विशेष काहीच केले नाही. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनातही फक्त पुनरावृत्ती होईल. हा निराशेचा सूर नाही. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशी संमेलने आवश्यक आहेतच. पण संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीमागील पाताळयंत्री राजकारण संपायला हवे. याच राजकारणामुळे विंदा करंदीकर, इंदिरा संत, भालचंद्र नेमाडे या प्रज्ञावंतांना अध्यक्ष व्हावेसे वाटले नाही. डॉ. यशवंत मनोहर, सुरेश द्वादशीवार या ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंतांनी संमेलनाध्यक्ष व्हावे असे ठाले पाटील-म्हैसाळकरांना का वाटत नाही? कारण अगदी सोपे आहे, त्यांच्यासमोर आपले खुजेपण ठसठशीतपणे दिसेल, ही भीती त्यांना नेहमी वाटत असते.
संमेलनाध्यक्षांची निवड गुणात्मक व्हावी, ती अविरोधच व्हायला हवी. पण पुढच्या काळात ते अशक्य आहे. ज्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व आहे त्यांना या घाणेरड्या राजकारणात पडायचे नाही. त्यामुळे पुढच्या काळात अनेक हवसे-गवसे संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत उतरतील. यात अगदी आरत्या रचणाºयांपासून तर चारोळ्या खरडणाºयांचीही गर्दी राहील. या साहित्य संमेलनांना मराठी भाषा-संस्कृतीशी काहीच सोयरसुतक नाही. मराठी माणूस तसाही आता अलिप्त आहेच,पुढच्या काळात तो त्रयस्थ होईल.
 

Web Title: If such literary gatherings are rising ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी