त्यांनी मला बोलावले तर...!

By admin | Published: December 5, 2014 01:07 AM2014-12-05T01:07:19+5:302014-12-05T08:54:41+5:30

आजपर्यंत मी त्यांच्याकडे काहीही मागितले नाही. काही मागण्याची माझी इच्छाही नाही; पण तरीही त्यानी मला बोलावले, तर मी जरूर

If they call me ...! | त्यांनी मला बोलावले तर...!

त्यांनी मला बोलावले तर...!

Next

अंजली जमदग्नी - 

आजपर्यंत मी त्यांच्याकडे काहीही मागितले नाही. काही मागण्याची माझी इच्छाही नाही; पण तरीही त्यानी मला बोलावले, तर मी जरूर जाईन,’ हे बोल आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विभक्त पत्नी जसोदाबेन यांचे! आजही त्या पतीच्या हितचिंतक आहेत. काय करणार? त्या आदर्श भारतीय स्त्री आहेत आणि पर्यायाने येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या आजही त्या निष्ठेने सांभाळत आहेत. आजही त्या पतीसाठी आठवड्यातून चार दिवस उपवास करतात. मोदी यांनी आपल्याला परत बोलवावे, अशी इच्छा त्या मनाशी बाळगून आहेत. ‘त्यांनी मला एक फोन करावा. असा फोन आल्यास मी लगेच त्यांच्याकडे धावत जाईन व त्यांची सेवा करीन,’ असे जसोदाबेन आता म्हणत आहेत. ‘त्यांनी मी राहत असलेल्या इमारतीखाली यावे आणि मला त्यांच्यासोबत येण्यास सांगावे, मी लगेच त्यांना साथ देईन,’ असेही जसोदाबेन यांचे स्वप्न आहे.
पण हे स्वप्न कधी पूर्ण होईल काय? आतापर्यंत नरेंद्र मोदी व जसोदाबेन यांच्या नात्याचा विचार केल्यास हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असेच आहे. नरेंद्र मोदी १७ वर्षांचे असताना त्यांचा विवाह जसोदाबेन यांच्याशी झाला. तीन वर्षांच्या वैवाहिक जीवनात ते फक्त तीन महिने एकत्र राहिले. १९८७मध्ये मोदी यांनी जसोदाबेन यांच्यासमोर परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता; पण जसोदाबेन यांनी नकार दिला. त्यानंतर मोदी यांनी कधीच जसोदाबेन यांच्याशी संपर्क साधलेला नाही. त्यांना अशाच त्रिशंकू स्थितीत राहणे आवडते
काय? मोदी व जसोदाबेन यांचा विवाह आज फक्त तांत्रिकदृष्ट्या जिवंत आहे. निवडणुकीचा अर्ज भरताना मोदी यांनी आपण विवाहित असल्याची कबुली दिली. ती दिली नसती, तर जसोदाबेन अंधारातच राहिल्या असत्या; पण तसे व्हायचे नव्हते. मोदी यांनी आपण विवाहित असल्याचे कबूल करताच राजकीय पातळीवर गदारोळ उठला. त्याचा त्रास मोदी यांना झालाच असणार. मोदी यांच्या विरोधकांनी त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी जसोदाबेन यांच्या नावाचा उपयोग केला; पण जसोदाबेन यांनी पतीबद्दल कधी तक्रारच केली नाही. त्यामुळे हा बार फुसकाच ठरला.
जसोदाबेन आजच्या युगातील सीता, सती सावित्रीची भूमिका जगण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रार्थना, उपवास करत पतीकडून आपल्याला मान्यता मिळण्याची त्या वाट पाहत आहेत; पण जे सीतेने केले नाही, ते या आधुनिक सीतेने करून दाखवले आहे. आपले अधिकार जाणून घेण्यासाठी त्यांनी माहिती अधिकाराखाली अर्ज दाखल केला आहे. पत्नी म्हणून माझे अधिकार काय आहेत, असा तो प्रश्न आहे.माझ्या रक्षणासाठी एसपीजी कमांडो का? मी रिक्षातून प्रवास करत असताना त्यांच्यासाठी सरकारी कार असते, असे का? प्रोटोकॉलनुसार माझे इतर हक्क कोणते? त्यांचे हे प्रश्न अगदी बरोबर आहेत; पण त्यामागे असणारा प्रश्न वेगळाच आहे. मी मागितले नाही, तरीही मला हे संरक्षण मिळाले; पण मनोमन मागितलेला दर्जा मात्र मिळालेला नाही. एसपीजी कमांडो मला त्याची आठवण दररोज करून देतात, असे जसोदाबार्इंनी म्हटले आहे.
जसोदाबार्इंना नक्की काय हवे आहे? माहिती अधिकाराखाली अर्ज करताना त्यानी हा विचार केला आहे काय? आतापर्यंत त्या कधीच प्रसारमाध्यमांशी बोलल्या नव्हत्या; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक अर्जात विवाहित असल्याची नोंद करताच त्यांच्या आशेला पालवी फुटली आहे. पती आणि आपण विभक्त होणे हे आपले खासगी आयुष्य आहे, असे मानणाऱ्या जसोदाबार्इंना पतीने विवाहित असल्याचे मान्य करणे, हा कबुलीजबाब आहे, असे वाटत असेल, तर त्यात गैर ते काय? आता त्यांचा विवाह आणि विभक्त होणे हे खासगी आयुष्य नाही. ते आता प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. तसे ते आलेच आहे, तर आपल्याला पत्नी म्हणून हक्क का मिळू नये, असा विचार जसोदाबेन करत आहेत. त्यादृष्टीनेच त्यांनी माहिती अर्ज करून एक पाऊल उचलले आहे. त्यानिमित्त प्रसिद्धीच्या झोतावर त्या आल्या आहेत. आता पुढचे पाऊल टाकणे त्यांना अवघड नाही; पण ते मोदी यांना परवडणार आहे काय? लग्नानंतर हेतुपुरस्सरपणे आपल्या पत्नीला बाजूला सारणारे नरेंद्र मोदी आता या जाळ्यात फसणार आहेत काय?
पती-पत्नी नात्याला अनेक पदर असतात. पत्नी वा पती विभक्त असो, घटस्फोटित असो, की वेगळे राहत असोत, त्यांचा एकमेकांवर अधिकार असतोच. काही जण तो मान्य करत नाहीत. याचा अर्थ ते असतच नाहीत, असा नाही. हा अधिकार मिळवण्याचा प्रयत्न जसोदाबेन करत आहेत. त्यांची पतीबरोबर परदेशी जाण्याची इच्छा नाही. त्यांच्या यशात वाटाही मागण्याची इच्छा नाही; पण तरीही पतीची साथ त्यांना हवी आहे. तशी प्रत्यक्ष कबुली त्यांनी दिली आहे. त्यांनी आपल्याला आदराने बोलवले, तर कोणत्याही क्षणी त्यांच्याबरोबर जाण्याची माझी तयारी आहे, असे त्या म्हणतात, ते याच भावनेतून!
त्याच भावनेतून त्यांनी सती सावित्री, आदर्श भारतीय नारीचे व्रत स्वीकारले आहे. हा त्यांच्या विवाहाचा पुरावा आहे आणि त्यातूनच त्यांनी पत्नीपदाचा हक्क मागितला आहे. पंतप्रधान मोदी त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील काय? या प्रश्नाचे उत्तर आजघडीला देता येणार नाही. पत्नीपदाचा मान देऊन ७, सफदरजंग येथे राहण्यासाठी न्या अथवा न न्या; पण मोदी यांना जसोदाबेन यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागेल. जसोदाबेन यांचा तेवढा अधिकार निश्चितच आहे. मोदी यांना पत्नी म्हणून जसोदाबेन यांच्याबद्दल आदर आहे काय? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे आणि वस्तुस्थितीचा विचार केला, तर तो नक्कीच सार्थ आहे. पत्नीबद्दल आदर असता, तर मोदी यांनी तिला असे दूर लोटले नसते. जसोदाबेन यांचे एकाकी जीवन हे एक वास्तव आहे आणि त्याला पती या नात्याने मोदी जबाबदार आहेत. हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी याांच्यासाठी असून अडचण आणि नसून खोळंबा असा ठरलेला असला, तरीही तो त्यांना सोडवावाच लागेल. तेच त्यांच्या हिताचे आहे.
(लेखिका लोकमतच्या औरंगाबाद (मराठवाडा) आवृत्तीच्या सहायक संपादक आहेत.)

Web Title: If they call me ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.