आमची उंची तुम्ही ठरवणार तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 03:22 AM2018-07-21T03:22:40+5:302018-07-21T03:23:10+5:30
गोंधळी सारे नागपुरात गोंधळाला गेले... मुंबईचे विधानभवन कसे शांत शांत झाले.
-दिलीप तिखिले
गोंधळी सारे नागपुरात गोंधळाला गेले... मुंबईचे विधानभवन कसे शांत शांत झाले. बऱ्याच दिवसांनंतर या संकुलाला अशी शांतता लाभली होती. या नीरव (मोदी नव्हे) शांततेत मग संकुलातील महापुरुषांच्या पुतळ्यांत संवाद सुरू झाला. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, स्वामी रामानंद तीर्थ, म. जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी आठ महापुरुषांचे पुतळे विधानभवन परिसरात उभारण्यात आले आहेत. पण हे पुतळे कमी-जास्त उंचीचे का उभारण्यात आले हे आमच्या सर्वसामान्य बुद्धीसाठी अजूनही कोडेच आहे. अर्थात पुतळे उभारताना त्या-त्या वेळचा राजकीय दबाव यासाठी कारणीभूत असू शकतो हे आम्ही आताच्या घडामोडींवरून सांगू शकतो.
पण या पुतळ्यांच्या संवादात मात्र या कमी-जास्त उंचीचा, उचनीचतेचा लवलेशही नव्हता. संवादाचा विषय अनायसे ताजाच होता. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीवरून नागपूरच्या अधिवेशनात सत्ताधारी-विरोधकांत प्रचंड खडाजंगी झाली. या वादाने इकडे मुंबईचे पुतळे अस्वस्थ झाले.
१६ फुटाचा (यात २१ फुटाची चौथºयाची उंची वेगळी) म.फुलेंचा पुतळा ७.२ फुटाच्या (१०.६ फुटाचा चौथरा वेगळा) शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला म्हणाला, शिवबा... अरबी समुद्रात उभारण्यात येणाºया तुझ्या पुतळ्याच्या उंचीवरून हा काय वाद चालवला आहे, या लोकांनी? उंची मोजायचीच तर ती कर्तृत्वाची मोजा ना! हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारा तू... प्रतापगडाजवळ अफजलखानचा वध करायला निघालास तेव्हा त्या धिप्पाड खानाच्या उंचीचा तू विचार केला होतास का? पुण्याच्या लालकिल्ल्यात दीड लाखाची सेना घेऊन डेरा टाकून बसलेल्या शाहिस्तेखानावर निधड्या छातीने वार करून त्याची बोटे छाटली तेव्हा तुझी छाती ५६ इंची होती की आणखी किती, याचे मोजमाप झाले होते का?
अरे... आज तुझ्या या ९ फुटी पुतळ्यापुढे बोलताना माझ्या १६ फुटी पुतळ्याला खाली मान घालावी लागते याचा मला सार्थ अभिमान आहे. तुझ्या कर्तृत्वाला माझा हा सलाम आहे. पण आपली ही लेकरं म्हणतात, शिवबाचा पुतळा सर्वात लहान का केला. राजकारण आहे हे दुसरे काही नाही.
शिवबाच्या पुतळ्याच्या चेहºयावर खिन्नतेचे भाव होते. एवढा वेळ शांत असलेल्या शिवबाने आता मौन सोडले.
शिवबा : आतापर्यंत झाले ते झाले... पण, अरबी समुद्रात उभारण्यात येणाºया पुतळ्याबद्दलच माझा आक्षेप आहे. समुद्री जैवविविधतेला हानी पोहचणार असेल, पर्यावरणाचे नुकसान होत असेल तर कशाला उभारायचा पुतळा? अडीच हजार कोटी रुपये खर्च करणार आहेत म्हणे या माझ्या पुतळ्यावर! शिवाय ३०० कोटी रु. जीएसटी वेगळीच. म्हणजे आमचे पुतळे उभारून सरकार आपली तिजोरीही भरु पाहात आहे. एवढा पैसा मला त्या काळात मिळाला असता तर माझ्या रयतेच्या कल्याणासाठी मी तो खर्च केला असता? एक म्हणतो उंची कमी केली. दुसरा म्हणतो, नाही... उंचावलेल्या तलवारीच्या टोकापासून पायापर्यंत मोजा. . असं वाटते...तीच तलवार उगारून धडा शिकवावा यांना.
शिवबाचा संताप सर्वच पुतळ्यांनी ग्राह्य ठरविला. इतर पुतळ्यांच्याही आपआपल्या व्यथा होत्या, त्यांनाही बरंच काही बोलायचे होतं पण मध्येच सुरक्षा रक्षक आले आणि संवाद थांबला.