त्यापेक्षा शासकीय गुंडच पाळले तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 01:05 AM2018-03-31T01:05:00+5:302018-03-31T01:05:00+5:30
राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा विषय तसा जुनाच आहे. साम, दाम, दंड, भेद या चतु:सूत्रीशिवाय आजचे राजकारण हलत नाही आणि चालतही नाही.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा विषय तसा जुनाच आहे. साम, दाम, दंड, भेद या चतु:सूत्रीशिवाय आजचे राजकारण हलत नाही आणि चालतही नाही. यातील ‘दंड’ हा तर काही राजकीय नेत्यांचा आवडता ‘मंत्र’ असतो. मग अशी दंडेलशाही करण्यासाठी त्या नेत्यांनी आपल्या पदरी गुंड बाळगणे हे ओघानेच आले. आम्ही बापडे मात्र त्याचा विनाकारण बाऊ करतो.
आता हेच बघा ना...! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका विद्यमान मंत्र्यावर गंभीर आरोप केला. या मंत्र्याने म्हणे यवतमाळातील गुंडांच्या कुख्यात टोळीला आश्रय दिला, आणि हे गुंड राजरोसपणे लोकांचा छळ करतात. आता यवतमाळच्या गुंडांना आश्रय देणारा मंत्री हा यवतमाळचाच असला पाहिजे असा समज सर्वसामान्य नागरिकांनी करून घेतला यात त्यांचे काही चुकले का? नाहीतरी एका मंत्र्याच्या कार्यक्षेत्रात दुसरा मंत्री उगाच लुडबुड करणार नाही...! पण विखे साहेबांनी या मंत्र्याचे नाव लीक केले नसल्यामुळे सरकारदफ्तरी मात्र तो मंत्री यवतमाळचाच आहे याची नोंद झाली नाही. असे असले तरी हा आरोप प्रत्यक्ष विरोधी पक्ष नेत्याने केल्यामुळे आणि प्रकरण विदर्भाशी संबधित असल्यामुळे सीएमसाहेब फार अस्वस्थ झाले. अधिवेशन संपल्यावर त्यांनी सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलाविली. सुरुवातीलाच भूमिका विशद करताना सीएम म्हणाले, निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशास्थितीत आपल्या मंत्र्यांवर असल्याप्रकारचे आरोप होता कामा नयेत. आपण सर्वांनी यापासून दूर राहिले पाहिजे. त्यांना आणखी बरेच काही सांगायचे होते पण, एक मंत्री मध्येच उठून म्हणाले, साहेब कसे दूर राहणार...? लोक आमचं ऐकत नाहीत. काम करू देत नाही. मग गुंडांना हाताशी धरण्याशिवाय पर्याय राहत नाही.
दुसरा मंत्री : हे म्हणतात, ते खरं आहे. आज मंत्री त्याच्याच मतदारसंघात निर्भयपणे फिरू शकत नाही. त्याला सोबत दोन, चार गुंड बाळगावेच लागतात.
आणखी एक मंत्री : सर...! राजकारणात भ्रष्टाचार बोकाळल्याची ओरड होते. तो संपविण्याच्या घोषणाही होतात. पण संपला का भ्रष्टाचार? नाही संपला...आणि संपणारही नाही. आता तर अनेक विद्वान म्हणतात, ‘मर्यादित भ्रष्टाचार’ कायदेशीर केला पाहिजे म्हणून. राजकारणातील गुन्हेगारीचेही तेच.
येथेही मर्यादित गुन्हेगारी कायदेशीर करता येईल.
सेनेचा मंत्री : एकदम करेक्ट. मंत्री झाल्यावर सरकार त्याला ओएसडी देते, पीए देते, चार सहा सुरक्षा जवान देते. सोबतच चार गुंडही पुरविले तर...! सरकारी खजिन्यावर थोडा भार पडेल. पण ते कायदेशीर मार्गाने होईल.
भाजपा मंत्री : (उपहासाने) तुम्हाला कशाला हवेत हो गुंड...!
सेना मंत्री : (रोख ओळखून) तुम्हाला नेमके म्हणायचे काय आहे ?
वातावरण तापत असल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली.
मुख्यमंत्री : हे बघा...! शासकीय गुंड पाळण्याची भाषा आपल्याला करता येणार नाही. मंत्रिमंडळ विस्तारासाठी यादी घेऊन मी दिल्लीला जातोच आहे. दरम्यान विखेंना खासगीत ‘त्या’ मंत्र्यांचे नाव विचारून त्याला डच्चू कसा देता येईल ते बघतो. मग सर्वजण ‘तो मी नव्हेच’ म्हणत बाहेर पडले.
- दिलीप तिखिले