हिंमत असेल तर मैदानात या... पण कुठल्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 11:27 AM2021-12-23T11:27:08+5:302021-12-23T11:27:34+5:30

खान्देशातल्या चकचकीत रस्त्याला गुळगुळीत गालाची उपमा व्हायरल झाल्यापासून राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकले अन् जी खणाखणी सुरू झाली, ज्याचं नाव ते!

if you have the courage come on the field but which ones | हिंमत असेल तर मैदानात या... पण कुठल्या?

हिंमत असेल तर मैदानात या... पण कुठल्या?

googlenewsNext

सचिन जवळकोटे

भूतलावरील ‘शड्डू’ ठोकण्याचा आवाज इंद्रदरबारापर्यंत पोहोचला. इंद्रांनी आश्चर्यानं विचारलं, ‘असल्या थंडीतही पैलवानकी करण्याची सुरसुरी कुणाला आलीय?’ मिश्कील हसत नारद मुनी उत्तरले, ‘दिल्लीच्या अमितभाईंनी पुण्यात ओपन चॅलेंज केलंय, देवाधिराज! हिंमत असेल तर मैदानात या. मात्र, नेमकं कोणतं मैदान हे नेत्यांना कळलंच नाही. त्यामुळे तालमीतली खडाखडी आपल्या कानापर्यंत पोहोचतेय!’ 

इंद्रांची आज्ञा मिळताच मुनी भूतलावरच्या ‘त्या’ मैदानात पोहोचले. जिथं सारेच एकमेकांशी लढायला उत्सुक होते... पण बोलाचा शड्डू आणि बोलाचीच कुस्ती... विशेष म्हणजे, प्रत्येक नेत्याच्या बोलण्यात बॉलिवूडमधल्या हिरो-हिरोईन्सच्या स्पेशालिटीचा संदर्भ होता. खान्देशातल्या चकचकीत रस्त्याला ‘हेमा’च्या गुळगुळीत गालाची उपमा व्हायरल झाल्यापासून प्रत्येक नेता तशाच भाषेत बोलत होता.

सुरुवातीला सोमय्यांनी अजितदादांकडं कटाक्ष टाकत अमितभाईंच्या दौऱ्याचा विषय काढला. ‘भंगाराच्या भावात साखर कारखाने घेणाऱ्यांचं आता काही खरं नाही. माधुरीच्या धक-धकसारखं अनेकांचं हार्ट म्हणे आता धडकू लागलंय.’ हे ऐकून दादा राहिले बाजुलाच, रौतांच्या संजयनीच तत्काळ प्रत्युत्तर दिलं, ‘ज्यांना कधी पिठाची गिरणीही चालवता आली नाही, त्यांनी दुसऱ्याच्या कारभारात लुडबूड करू नये. आमच्या दादांच्या दहा-दहा कारखान्यातल्या साखरेनं अख्ख्या महाराष्ट्राचं तोंड गोड केलंय. कतरिना - विकीच्या लग्नातल्या बकलावापेक्षाही मधुर’. 

कारखान्यांचा आकडा ऐकून लातूरचे रितेशदादा चमकले. त्यांनी बंधू अमितदादांच्या कानात विचारलं, ‘भली उनकी फॅक्टरी अपनोंसे जादा कैसी ? पुढच्या वर्षी विक्रम मोडायचा  आपणही. जॅकीदादाच्या दमदार आवाजापेक्षाही आपल्या फॅक्टरींचा भोंगा वाजला पाहिजे अख्ख्या स्टेटमध्ये.’ 

एवढ्यात संगमनेरच्या बाळासाहेबांनी आपलंच तुणतुणं वाजवलं, ‘खरे तर आम्हीच शुगरकिंग, मिल्कमास्टर. रेखाच्या डान्सपेक्षाही जलदगतीनं आम्ही पूर्वी गावोगावी दूध पोचवलंय... आमच्यामुळंच राज्य पुढारलंय, आमच्यामुळंच हे सरकार सत्तेवर आलंय, दोन वर्षे टिकलंय...’ 

मग मात्र उद्धो खवळले, जयांपेक्षाही अधिक राग त्यांना आला, ‘आलियाचं जीके तुमच्यापेक्षा चांगलंय हो! हे सरकार आलं केवळ माझ्यामुळे. मी राजहट्ट धरला नसता तर गब्बरसिंगसारखं डोंगर-दऱ्यात फिरत बसला असतात  तुम्ही चणे-फुटाणे खात.’ या गोंधळातही उद्धोंच्या कानात राऊत कुजबुजलेच, ‘थोरल्या काकांचंही नाव घ्या साहेब. त्यांचंच खरं श्रेय आहे म्हटलं सरकार स्थापण्यात. पावसात भिजत साताऱ्यात घेतलेली त्यांची सभा म्हणजे सलमानच्या बॉडीसारखाच मजबूत इरादा होता. सिक्स पॅक जिद्दीचे... थ्री पार्टी मेंबर सरकारचे.’ 

एवढ्यात देशमुखांच्या अनिलभाऊंची सरकारी व्हॅन या जेलमधून त्या जेलमध्ये निघाली होती. आतमध्ये भाऊ जोराजोरात संजूबाबाच्या आवेशात परमबीरसिंगांना विचारत होते, ‘क्या हुआ पच्चास तोला? कब माँगा था मैने पच्चास तोला ?’ मात्र घाईघाईत उत्तर द्यायला वाझेच पुढे आले. म्हणाले, ‘नही नही... तुमने मांगा नही, मैने सुना नहीं’ तेव्हा तिघांच्या बाजुलाच निवांत रिलॅक्समध्ये बसलेला सुकेश मात्र जोरजोरात हसत म्हणाला, ‘ऐसे पच्चास - पचास तोले तो मैने एकेक हिरॉईन पें उडा दिये थे. अब लग गये सब काम को.’ 

बाहेर नेत्यांच्या गर्दीत ‘कृष्णकुंज’वाल्या राजनी मात्र नेहमीच्या खर्ज्या आवाजात डॉयलॉग टाकला, ‘सर्वांना कामाला मीच लावणार. पुण्याची एक कार्यकर्ती गेली म्हणून काय झालं... मीही बाकीच्या पार्टीतल्या अनेकांना फोडणार. आयेंगे, मेरेभी लोग आयेंगे.’  राखीच्या टोनमध्ये ‘मेरे करण - अर्जुन आयेंगेss’ या त्यांच्या डॉयलॉगला रस्त्यावरच्या लोकांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या. तेव्हा थोरले काका खोचकपणे म्हणाले, ‘हे पहा सूर्यवंशी आले. दुपारी बारानंतर स्क्रिप्ट वाचतायत!! आम्ही तर सकाळीच फोडाफोडीचा पिक्चर हिट बनवतो. पहाटेची शॉर्ट फिल्म तर केव्हाच आपटली आम्ही.’ 

- एकच गोंधळ निर्माण झाला. सारेच एकमेकांना जोरजोरात बोलू लागले. तेव्हा एक “कॉमन पब्लिक” तिथं आला. दोन्ही हात जोडून काकूळतीनं म्हणाला, ‘तुम्हा साऱ्यांचीच ॲक्टिंग जबरदस्त. तुमची कला बच्चनच्या उंचीपेक्षाही मोठी. मात्र, आम्हाला आता जॉनी लिव्हरची मीमिक्री नकोय तुमच्याकडून! बास झालं आता हे!’ ...नारायणऽऽ नारायणऽऽ. 
 

Web Title: if you have the courage come on the field but which ones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.