सुतासारख्या सरळ रस्त्यांचा हव्यास धराल, तर माणसे मरणारच !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 08:03 AM2023-05-29T08:03:51+5:302023-05-29T08:04:12+5:30
निसर्गाच्या विरुद्ध वागणाऱ्या माणसांना माफी नाही, हे आपण विसरलो आहोत! भारतासारख्या डोंगरदऱ्यांच्या देशात वळणे नकोत म्हणून किती डोंगर फोडणार?
हल्ली टीव्हीवर बातम्या लावा, नाहीतर सकाळसकाळी वर्तमानपत्र उघडा, हमखास ठरलेली बातमी म्हणजे रस्त्यावरील वाहनाचा अपघात व मृत्यूचा आकडा! हे इतके सातत्याने डोळ्यावर आदळते की, त्याबद्दल काहीच वाटेनासे झाले आहे. हल्ली लोक अपघातातील जखमींना मदत करण्यापेक्षा फोटो व व्हिडीओ काढण्यात मग्न असतात. अपघातातील जखमी व्यक्तीला मदत केल्यास आता पोलिसांचा ससेमिरा मागे लागत नाही, पण हे किती जणांना ठाऊक आहे, कोण जाणे! जाणारे फारच घाईत असतात, त्यांच्याकडे वेळच नसतो! ज्या देशात वेळेला आणि पैशाला अति महत्त्व येते तेथे अनारोग्य वाढते. आपल्या देशाची सध्या तीच परिस्थिती आहे.
देशात गेल्यावर्षी १,५५,६२२ लोक रस्ते अपघातात मृत्यू पावले, असे आकडेवारी सांगते. म्हणजे दररोज ४२२ तर तासाला १८ जण दगावतात! अपघातांची मुख्य कारणे? - तीच ठरलेली! चालकाचा निष्काळजीपणा, लाल लाइट असताना पुढे जाणे, मध्यरात्रीनंतरच्या झोपेचा विचार न करता अवेळी प्रवासाचा हट्ट, पैसे-वेळ वाचविण्यासाठी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबणे, गाडीची देखभाल नीट नसणे, टायर फुटणे, धुक्यात रस्ता दिसत नसताना दामटून गाडी चालविणे, ब्लाईंड कर्व्हवर बिनधास्त वेगात पुढे जाणे... अशी नेहमीचीच! ती इतकी घातक आहेत हे माहीत असूनही लोक पुन्हा त्याच चुका करतात.
काही साधे नियम पाळणे फार अवघड नाही. सीटबेल्ट लावावा, चालक व्यसनी, रागीट नसेल हे पाहावे. त्याची नीट झोप झाली आहे ना, याची खात्री करावी. प्रवासात चालकाचे खाणे, (चहा) पिणे आणि विश्रांती याची काळजी घ्यावी. गाडी अत्याधुनिक म्हणजे ऑटोमॅटिक वगैरे असेल तर ते तंत्र चालकाला माहिती आहे ना, याची खात्री करावी.
लांबचा प्रवास असेल तर उर्वरित सगळ्याच प्रवाशांनी झोपू नये, निदान एकाने तरी चालकासोबत जागे रहावे, गप्पा कराव्यात. वेगावर लक्ष असू द्यावे, अकारण आणि उद्धटपणाने ओव्हरटेक करण्याचा मोह टाळावा. वाहतुकीचे नियम आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या सूचना यांचे पालन करावे. दर तीन-चार तासांनी गाडी थांबवावी, विश्रांती घ्यावी. अकारण वेगाचा मोह आणि इच्छितस्थळी लवकरात लवकर पोहोचण्याची इर्ष्या टाळावी. हे एवढे केले तरी पुष्कळ अपघात कमी होतील. अर्थात, हे काही नवे ज्ञान नव्हे, ते सगळ्यांनाच माहिती असते, वारंवार सांगितले जाते; पण ऐकतो कोण?
त्यात सध्या चर्चेत असलेला समृद्धी महामार्ग! इथे तर रोज किमान एक तरी अपघात झालाच पाहिजे, असा जणू नियम होऊन बसला आहे. मी या विषयातला तज्ज्ञ नाही, पण या रस्त्याची आखणी सदोष असावी, असे या रस्त्यावरून प्रवास करताना मला वाटले जरूर!
खूपच उंच भराव टाकून रस्ता कितीतरी उंच केला आहे आणि नाकासमोर सरळ रेषेत आखला आहे. अनेक ठिकाणी डोंगर व झाडे तोडून रस्ता केला आहे. गाडी चालवताना वाहकाला काहीच काम नसते. नुसते स्टेअरिंग धरून ठेवायचे. या सरळसोट रस्त्यावर अफाट वेगाची गुंगी इतकी आहे की झोपच यावी! नकळत डुलकी लागते व अपघात होतो!
गाडीचा वेगही १६० च्यावर. त्यात संपूर्ण रस्ता सिमेंटचा म्हणजे टायर तापून फुटण्यास आमंत्रणच! या रस्त्यावरच्या अफाट वेगाने प्रवाशांनाही गुंगी येऊन डुलकी लागते आणि चालकाला तर अपघात झाला कसा, हेच उमजत नाही.
निसर्गाच्या विरुद्ध वागणाऱ्या माणसांना माफी नाही, हे आपण विसरलो आहोत! याचे उदाहरण म्हणजे नवीन महाड-पुणे रस्ता! तो ताम्हणी घाटातला डोंगर फोडून केला आहे. या रस्त्यावर वरंध घाटातून जाणाऱ्या रस्त्यापेक्षा जास्त अपघात होतात. वरंध घाट डोंगराचे नुकसान न करता निसर्गानुसार केला आहे. विशेष म्हणजे वळणेदेखील सरळ न करता आहे तशीच ठेवली आहेत. भारत हा डोंगरदऱ्यांचा देश आहे, हे विसरू नये. हा काही वाळवंटी अगर पठारी भाग असलेला अरब देश नव्हे. सुताने आखलेले असावेत असे सरळ रस्ते हवेत म्हणून डोंगर फोडण्याचा उपद्व्याप आपण जितका लवकर थांबवू तेवढे बरे! नाहीतर निसर्गाच्या विरुद्ध वागल्याची शिक्षा म्हणून भरधाव रस्त्यावर माणसे मरत राहतील, हे नक्की आहे!
डॉ. हिम्मतराव बावस्कर,
वैद्यकीय क्षेत्रातले कार्यकर्ते
himmatbawaskar@rediffmail.com