लांब पल्ल्याचा प्रवास करायचा, तर गुरुचा हात डोक्यावर हवाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 08:58 IST2024-12-17T08:58:12+5:302024-12-17T08:58:58+5:30

अनेक गुंतागुंतीच्या सुंदर कोड्यांचा उलगडा करणारा असा. अविस्मरणीय..

if you want to travel long distances you need the guru hand on your head said late ustad zakir hussain | लांब पल्ल्याचा प्रवास करायचा, तर गुरुचा हात डोक्यावर हवाच!

लांब पल्ल्याचा प्रवास करायचा, तर गुरुचा हात डोक्यावर हवाच!

मैफलीतलं ध्वनी-वर्धन, इंटरनेटवरच्या मैफली, गुरु-शिष्यांच्या ऑनलाइन शिकवण्या, बदलत्या परिस्थितीचे धक्के याबाबत पंचम-निषादचे संस्थापक शशी व्यास यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांच्याशी केलेल्या संवादाचं स्मरण!

संगीताच्या मैफलीतली ध्वनिनिर्मिती हा सध्या सर्वात महत्त्वाचा घटक झाला आहे. मैफलीतल्या संगीतापेक्षा आजच्या काळात ध्वनी हा वरचढ ठरतो आहे, असं तुम्हाला वाटतं का? 

- संगीत, मग ते प्रत्यक्ष मैफलीतलं असो किंवा इंटरनेटच्या मंचावरून प्रक्षेपित होणारं, ते सुस्पष्टपणे, ध्वनीमध्ये कोणताही बिघाड न होता रसिकांपर्यंत जाणं महत्त्वाचं असं मी मानतो. ध्वनीच्या दर्जाचा आग्रह धरला, म्हणून मैफलीतलं संगीत दुय्यम ठरतं, असा त्याचा अर्थ कसा होईल? उलट, ध्वनीच्या दर्जाबाबत कलाकार एकदा आश्वस्त झाला की, त्या ताणातून मुक्त होत तो आपलं सगळं लक्ष सादरीकरणाकडे केंद्रित करू शकतो. मैफलीतले संभाव्य तांत्रिक अडथळे आधीच पार करणं हे कार्यक्रमाचा दर्जा उंचावण्यासाठी हातभार लावण्यासारखं आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणं हे दर्जाशी तडजोड करण्यासारखं आणि रसिकांवर अन्याय करण्यासारखं आहे. 

शास्त्रीय संगीतात काही गोष्टी शाश्वत असतात.  पण, बदलता काळ आणि परिस्थिती यांचे काही धक्के या संगीतालासुद्धा बसतात. तुमच्या मते गेल्या सहा दशकांत शास्त्रीय संगीतात काय बदल झाले आहेत? 

अनेक पिढ्यांपासून जे राग आणि ताल रसिकांना प्रिय आहेत, रसिक ज्यांचा वारंवार आग्रह धरत असतात त्यांचं स्थान आजही अढळ आहे आणि ते तसंच राहील. उलट त्या रागातले जे तरल सूक्ष्म स्वर पूर्वी रसिकांपर्यंत पोहचत नव्हते, ते ध्वनी वर्धनाच्या नव्या तंत्रज्ञानामुळे आता त्यांच्यापर्यंत पोहचू लागल्यानं त्यांचं सौंदर्य आणि नजाकत कितीतरी पटींनी वाढली आहे. तबल्यामधून किंवा वाद्यामधून उमटत असलेल्या स्वराकृतींमध्ये असलेल्या सूक्ष्म श्रुतीसुद्धा जेव्हा रसिकांच्या  कानांवर पडतात, तेव्हा त्या रागाचा डौल आणि त्यातला रस, भावना या  पुरेपूर पोहचतात.  गाणं म्हणण्यासाठी किंवा वाद्य वाजवण्यासाठी फार शक्ती खर्च करावी लागत नसल्यानं, त्याचे अनेक चांगले परिणाम जाणवताहेत. कलाकाराला वेगावर नियंत्रण ठेवणं शक्य झालं आहेच, पण सर्व घराण्यांमधल्या स्वरांचं परस्परांशी नातं आजमावून बघणंही शक्य होत आहे. 

अनेक प्रकारच्या संगीताला आपल्यात सामावून घेणारा शक्ती बँडचा प्रयोग गाजला. अशा प्रकारच्या सर्जनशील सांगीतिक प्रयोगाच्या निर्मितीमध्ये कोणते घटक खूप महत्त्वाचे असतात? 

भारतीय आणि जाझ संगीताची एकत्र मोट बांधण्याचा हेतू शक्तीच्या निर्मितीमागे अजिबात नव्हता. तसं काही केलं असतं, तर त्यामुळे कितीतरी मानसिक भिंती आणि कुंपणं आम्हाला घालून घ्यावी लागली असती. आमचं प्रत्येकाचं जे-जे म्हणून संचित होतं, त्यातून अशा प्रयोगासाठी काही उचलणं हे पुरेसं नव्हतं आणि त्याला आमचा ठाम नकार होता. आमच्याकडे आमचं असं जे काही होतं, ते ओलांडून त्याच्या पलीकडे आम्हांला जायचं होतं. परंपरेनं आमच्या प्रत्येकात ठाकून-ठोकून पक्के केलेले संगीतविषयक नियम-कायदे धुडकावून, त्या नियमांची सत्ता झुगारून आमच्या आत, खोलवर जे स्वर-ताल जन्माला येत होते, बाहेर येण्याची वाट शोधत होते; ते सारे बाहेर काढायचे होते.  भेदांच्या  पलीकडे असलेलं सगळ्या जगाचं एकच असं संगीत निर्माण करण्याचा तो प्रयत्न होता.

पाश्चिमात्य संगीत अतिशय नियमबद्ध आहे तर भारतीय संगीतात उत्स्फूर्तपणा. तुम्ही जेव्हा पाश्चिमात्य कलाकारांबरोबर मैफल करत असता, तेव्हा हे अंतर ओलांडून जाणं तुम्हाला कसं साधतं?

- भारतीय संगीतात नियम नाहीत का? उलट मला अनेकदा वाटतं, आपल्या संगीतात असलेल्या या उत्स्फूर्ततेचा आपण जरा जास्तच बडेजाव माजवला आहे! प्रत्यक्षात मात्र, आपल्या नियमांचं उदात्तीकरण, रागांची शुद्धा-शुद्धता, प्रत्येक रागामधले हवे-नकोचे आग्रह या सापळ्यात आपण अडकून पडलो आहोत. काळाच्या पुढे बघण्याची क्षमता असलेल्या प्रगत विचारांच्या आधुनिक पंडितांनी, पूर्वी आणि आत्तासुद्धा, या व्यवस्थेत थोडा जरी बदल सुचवला तरी आपल्या परंपरेचे काही तथाकथित रक्षणकर्ते त्यावर टीकेचे जे वार करतात ते उमेद खचवणारे असतात. आता या टीकेचं प्रमाण कमी होतं आहे. दोन संगीतांमध्ये पूल बांधण्याची प्रक्रिया कदाचित या बुजुर्गांचं मन वळवू शकेल. 

पारंपरिक गुरू-शिष्य परंपरेत तुमचं सर्व शिक्षण झालं आहे. बदलत्या परिस्थितीत या परंपरेला काही नवं रूप देण्याची गरज तुम्हाला वाटते का?

- सध्याचा काळ हा अखंड वाहत असलेल्या माहितीचा आहे. एक बटण दाबताच विद्यार्थ्यांना हवी ती माहिती, हवी तेव्हा उपलब्ध होऊ शकते. पूर्वी गुरू प्रसन्न होऊन, त्यांच्याकडून ज्ञानाचे काही थेंब ओंजळीत पडावे यासाठी दिवस-दिवस वाट बघावी लागायची. आता, तुम्ही गुरूकडून शिकता आणि लगेच घरी जाऊन वेबवर जास्तीची माहिती मिळवता. गुरूचे व्हिडिओ, रेकॉर्डिंग, अन्य तज्ज्ञ आणि कलाकार यांची मतं, मैफली असं सगळं उपलब्ध असतं. पण हे सगळं कोणासाठी उपयोगी? तर जे शिष्य शिक्षणाच्या काही पायऱ्या चढून, एका टप्प्यावर पोचले आहेत त्यांच्यासाठी. जे शिक्षणाच्या पहिल्या-दुसऱ्या पायरीवर उभे आहेत त्यांना गुरूंच्या उपस्थितीत शिकण्याशिवाय पर्यायच नाही. पायाची उभारणी भक्कम व्हायची असेल तर माथ्यावर गुरूचा हात हवाच आणि तंत्रज्ञानानं सगळी माहिती शिष्याच्या घरात आणून ठेवली आहे, हे आता गुरूंनीही लक्षात घेणं गरजेचं आहे. 

गुरूचा आशीर्वाद मिळवण्याची पात्रता शिष्यात असावी लागते. गुरू जे-जे देणार, ते शोषून घेण्याचा आवेग शिष्याला झेपला नाही, तर शिक्षणाचा हा झरा आटायला वेळ लागणार नाही. गुरूच्या बरोबरीनं, त्याच्या वेगानं शिष्य चालत राहिला तर होणारा प्रवास अद्भुत असतो! अनेक गुंतागुंतीच्या सुंदर कोड्यांचा उलगडा करणारा असा. अविस्मरणीय...
 

Web Title: if you want to travel long distances you need the guru hand on your head said late ustad zakir hussain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.