वेध - रेल्वेस्थानक सौंदर्याचा ‘नाशिक पॅटर्न’

By admin | Published: February 18, 2017 12:16 AM2017-02-18T00:16:52+5:302017-02-18T00:16:52+5:30

सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू असताना व ‘व्हॅलेण्टाइन डे’ला प्रेमालापाचे दर्शन घडून येत असताना

Illumination - 'Nashik Pattern' of Railway Station Beauty | वेध - रेल्वेस्थानक सौंदर्याचा ‘नाशिक पॅटर्न’

वेध - रेल्वेस्थानक सौंदर्याचा ‘नाशिक पॅटर्न’

Next

 व्यवस्थेच्या नावाने बोटे मोडणे, हा अनेकांचा स्थायिभाव झाला असताना कर्तव्य भावनेतून काही तरी करून दाखविण्याची ऊर्मी घेऊन धडपडणारे जेव्हा पुढे येतात तेव्हा ते इतरांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरून जातात, ‘व्हॅलेण्टाईन डे’ला जिकडे-तिकडे प्रेमाचे पाट वाहात असताना नाशकातील ‘हॅण्ड फाउण्डेशन’ तसेच ‘नॅब’ व गुंज फाउण्डेशनसारख्या संस्थांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी घडविलेल्या सामाजिक बांधीलकीच्या प्रत्यंतराकडेही याच भूमिकेतून पाहता येणार आहे.
सध्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडत असल्याने राजकीय कार्यकर्त्यांचे बळ निवडणुकीकडे एकवटले आहे, त्यात आरोप-प्रत्यारोप करताना सत्ताधारी असणाऱ्यांनी अमुक एक केले नाही वा तमुककडे लक्ष दिले नाही म्हणून व्यवस्थेच्या अगर यंत्रणांच्या नावाने ठणाणा केला जात आहे. परंतु तसे न करता सामाजिक भान जपून असणाऱ्या संस्था, संघटनांनी आपल्या सेवाकार्याचे वेगळेपण अबाधित राखत, इतरांकडून अपेक्षा करण्याऐवजी आपण काय करू शकतो याचे अनुकरणीय उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. यात हॅण्ड फाउण्डेशनच्या माध्यमातून नाशिकरोड रेल्वेस्थानकाला चढवला गेलेला रंगसाज तर अनोखा ठरावा. ‘व्हॅलेण्टाइन डे’ला नाशकातील विविध चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामाजिक संदेश तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर, दादासाहेब फाळके यांच्या चित्रांसह नाशिकची ओळख सांगणारी ग्राफिटी साकारल्याने रेल्वेस्थानकाचे अवघे रूपच पालटून गेले आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावरून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वेतील प्रवाशांना याद्वारे नाशिकची ओळख घडून येणार आहे. या उपक्रमाची यशस्वीता व त्यातून साधला जात असलेला परिणाम पाहता आता विभागातील जळगाव व भुसावळ येथील रेल्वेस्थानकांवरही असा प्रयोग राबविण्याची मागणी पुढे आली आहे. रेल्वेस्थानकासारखे सार्वजनिक वापराचे ठिकाण म्हटले की, तेथे अपरिहार्यपणे आढळणारी अस्वच्छता व एकूणच उबग आणणारे वातावरण बदलण्याच्या दृष्टीने सदरचा ‘नाशिक पॅटर्न’ निश्चितच उपयोगी ठरू शकणारा आहे.
नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड (नॅब) व ‘नाशिक सायकलिस्ट’च्या वतीने समाजातल्या दृष्टीबाधित, दिव्यांग तसेच ‘सेलब्रेल प्लासी’ग्रस्त मुला-मुलींबद्दल स्नेहभाव निर्माण होण्यासाठी करण्यात आलेले डिव्हाईन सायक्लोथॉनचे आयोजनही सामाजिक जाणिवांचा परिचय करून देणारे ठरले आहे. यात दृष्टीबाधीत मुलांनी बोटांच्या चुटकीच्या इशाऱ्याचा मागोवा घेत सायक्लोथॉन पूर्ण केली, तसेच या रॅलीतील दिव्यांगांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन व हेल्मेट वापरण्याबाबत दिलेले संदेश धडधाकटांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले. ‘आम्ही आपल्यापेक्षा वेगळे नाहीत तर आपल्या सारखेच आहोत’ हा त्यांचा संदेशही त्यांच्याकडे वेगळ्या भावाने बघणाऱ्यांची दृष्टी सुधारण्यास उपयोगी ठरावा. विशिष्टावस्थेतील समाज घटकासोबतच्या नात्याची, सहचराची व आपुलकीची वीण यातून घट्ट होण्यास नक्कीच मदत व्हावी. नाशकातील काही उद्योग-व्यावसायिकांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘गुंज फाउण्डेशन’चे कार्यही असेच नजरेत भरणारे व कौतुकास पात्र ठरणारे आहे. साधन-संपन्न कुटुंबात वापरून झालेल्या व अडगळीत पडलेल्या सायकल्स भेट म्हणून स्वीकारायच्या व त्या दुरुस्त करून ग्रामीण भागात शाळेसाठी दूरवरून पायी येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरवायच्या, असा उपक्रम या फाउण्डेशनद्वारे गेल्या अनेक दिवसांपासून राबविला जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत शेकडो गरजू विद्यार्थ्यांची पायपीट थांबविली गेली आहे. प्रत्येकवेळी, प्रत्येक बाबतीत शासकीय मदतीकडे डोळे लावून बसणाऱ्या घटकाला स्वयंसाहाय्याची तसेच आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारे हे सारे उपक्रम आहेत. केवळ इतरांकडून अपेक्षा केल्याने काही होत नाही, आपण आपल्याला जे वा जेवढे जमेल ते आणि तेवढे करण्यासाठी पुढे सरसावलो तर बरेच काही आशादायी चित्र रेखाटता येऊ शकेल, तेव्हा केल्याने होत आहे रे, असाच संदेश या उपक्रमांतून मिळून गेला आहे.
- किरण अग्रवाल

Web Title: Illumination - 'Nashik Pattern' of Railway Station Beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.