प्रतिमा भंजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 09:31 PM2018-06-13T21:31:43+5:302018-06-13T21:31:43+5:30

काळाची पावले ओळखत धुळे बदलत गेले. भौगोलिक लाभ होऊन दळणवळणाचे मोठे माध्यम ठरलेले तब्बल ७ राष्टÑीय महामार्ग कार्यरत आहेत. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश असल्याने औद्योगिक क्षेत्राचे चित्र आशादायी आहे.

Image breaks | प्रतिमा भंजन

प्रतिमा भंजन

Next

मिलींद कुलकर्णी
खान्देशातील धुळे हे शहर सांस्कृतिक, साहित्यिक, पुरोगामी, औद्योगिक विकासाकडे वाटचाल करणारे शहर म्हणून लौकिकप्राप्त आहे. मु.ब.शहा, मुकुंद धाराशिवकर, पुरुषोत्तम पाटील, अनिल सोनार, कॉ.शरद पाटील, झेड.बी.पाटील, पी.डी.दलाल, डॉ.एन.के.ठाकरे यांच्यासारख्या विविध क्षेत्रात कार्यरत अनेक व्यक्ती, श्री समर्थ वाग्देवता मंदीर, राजवाडे संशोधन मंडळ, गरुड वाचनालय, जयहिंद शिक्षण संस्था, कमलाबाई विद्यालय यासारख्या अनेक संस्था, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रध्दा निर्मूलन समिती या पुरोगामी चळवळींना मिळालेले जनसमर्थन हे सगळे धुळ्याचे वैभव आहे. काळाची पावले ओळखत धुळे बदलत गेले. भौगोलिक लाभ होऊन दळणवळणाचे मोठे माध्यम ठरलेले तब्बल ७ राष्टÑीय महामार्ग कार्यरत आहेत. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश असल्याने औद्योगिक क्षेत्राचे चित्र आशादायी आहे. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला मिळालेली चालना उत्साहवर्धक आहे. या आशादायी वातावरणात भूतकाळात घडलेले भास्कर वाघ प्रकरण, तेलगी प्रकरण विस्मृतीत जात असताना पुन्हा धुळ्याला कुणाची तरी दृष्ट लागली आहे. ११ महिन्यांमध्ये खुनाच्या तब्बल ६ घटना घडल्या. पारोळा रस्त्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी सकाळी हॉटेलमध्ये १५-२० लोक येऊन शस्त्रांचा बेछूट वापर करीत खून करुन पळून जातात. देवपूरसारख्या भागात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ७-८ लोक शस्त्र घेऊन बाप-बेट्याचा निर्दयी खून करतात. कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणा-या या घटना आहेत. नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेल्या विनयकुमार चौबे यांनी गेल्या महिन्यात अवैध शस्त्र आणि गुंडांविरुध्द मोहीम राबविण्याचे आदेश दिल्याने खान्देशात सर्वत्र मोठा शस्त्रसाठा जप्त झाला. तडीपार गुंडांना अटक करण्यात आली. याचा अर्थ बिनबोभाटपणे अवैध व्यवसाय सुरु होते. चौबे यांनी लक्ष दिले नसते, तर ते सुरुच राहिले असते. ही मोहीम राबविल्यानंतरही खून होतो, या गुन्हयात तलवारी, कुकरी, चाकू अशा शस्त्रांचा वापर होतो. त्यातून या मोहिमेच्या यशाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. जिल्हा परिषदेच्या आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना, महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणा-या ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापकाला घरात घुसून मारहाण या घटना पोलीस दलाच्या क्षमतेविषयी शंका उपस्थित करणाºया आहेत. वर्षाखेर होणाºया जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून तर वातावरण दूषित केले जात नाही ना, अशी शंका घेण्याला वाव आहे. सत्ताधारी आमदार मुख्यमंत्र्यांकडील गृहखात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी कृती, महिलांना स्वसंरक्षणार्थ काठ्या वाटप करतात, त्यात सारे आले असेच म्हणावे लागेल.

Web Title: Image breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.