Imran Khan: उनके दिल का खिलौना हाय टूट गया...!
By विजय दर्डा | Published: April 4, 2022 05:48 AM2022-04-04T05:48:52+5:302022-04-04T05:59:41+5:30
Imran Khan: अमेरिकेने अशी स्थिती निर्माण केली की इम्रान यांना सत्ता सोडावी लागली; पण संसद विसर्जित करून त्यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला.
- विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,
लोकमत समूह)
जे अपेक्षित होते तेच शेवटी झाले. इम्रान यांना सत्ता सोडणे भाग पडले; पण बाहेर पडताना त्यांनी मोठी खेळी केली. सभागृहाच्या उपसभापतींनी इम्रान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला आणि त्याबरोबर इम्रान खान यांनी संसद विसर्जित करण्याची शिफारस केली. राष्ट्रपतींनी ती मान्य केली. गणित आपल्या बाजूने असल्याने इम्रान राजीनामा देतील आणि शाहबाज पंतप्रधान होतील, असा विरोधकांचा कयास होता. मात्र, इम्रान यांचे पारडे जड होत असल्याचे दिसत आहे. त्यांनी उघडपणे अमेरिकेला फटकारले आहे आणि जनमत आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आहे.
क्रिकेटने आपल्याला इतका पैसा, मान-सन्मान दिला की इंग्लंडमध्ये आरामात जीवन व्यतीत करता आले असते; पण मनात एक चांगला पाकिस्तान कायम रुंजी घालत होता, असे खुद्द इम्रान खान यांनी म्हटले आहे. देशातल्या तरुणांच्या मनातला पाकिस्तान साकार करण्याची इच्छा त्यांनी बाळगली. राजकारणात नसताना त्यांनी शाळा, इस्पितळे उभारून या सेवा मोफत देणे चालू केले होते. देशाला लुटणाऱ्या लालची नेत्यांच्या कचाट्यातून देश सोडवण्याचे स्वप्न घेऊन राजकारणात आल्याचे इम्रान म्हणत आले.
त्यांना शानदार विजय मिळाला, पदार्पण झोकात झाले हेही वास्तव आहे. पाकिस्तानी लष्कराने साथ दिली; पण शेवटी त्यांना जावं लागलं. सगळ्यात मोठा प्रश्न ही वेळ का, कशी आली हाच आहे. त्याकरिता पाकिस्तानची मूस काय आहे, हे समजून घ्यावे लागेल. पाकिस्तान अमेरिकेच्या कृपेवर चालणारे राष्ट्र आहे, हे आपण जाणतो. अमेरिकेला जे हवे असते तेच पाकिस्तानात होते. लष्करप्रमुख किंवा आयएसआयचा प्रमुख कोण होणार, हेही अमेरिकाच ठरवते. नवाझ शरीफ, परवेज मुशर्रफ यांचा जीव अमेरिकेने वाचवला. एरवी भुत्तोंप्रमाणे त्यांनाही फासावर लटकवण्यात आले असते. पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यात अमेरिकेच्या गुप्तचरांची नजर असते हे मी पूर्वीच लिहिले आहे. अमेरिकन तुकडीने ओसामा बिन लादेनला शोधून संपवले त्याचवेळी लोकांच्या हे लक्षात आले होते. आम्हाला काही माहीत नाही, असे म्हणणे हे पाकचे नाटक होते. वास्तवात प्रत्येक नेता आणि लष्करापासून साऱ्या अधिकाऱ्यांची बारीक-सारीक माहिती आयएसआयकडे असते. त्यामुळेच कोणी काही म्हणू शकत नाही. आपण म्हणू तसे करावे यासाठी पाकिस्तानच्या झोळीत अमेरिका हजारो डॉलर्स घालत आला आहे. एकेकाळी पाकिस्तानी सत्ताधीशांनी देशाचे हवाई अवकाश अमेरिकेला पूर्णपणे दिले होते.
अफगाणिस्तानाच्या लढाईत पाकने अमेरिकेला पुष्कळ साथ दिली; पण जेव्हा अमेरिका तेथून बाहेर पडली तेव्हा ड्रोन हल्ल्यांसाठी पाकिस्तानची जमीन आणि आकाश मिळावे, अशी त्या देशाची इच्छा होती; परंतु इम्रान खान यांनी नकार दिला. आंतरराष्ट्रीय राजकारण काबूत ठेवू पाहणारी अमेरिका या नकाराने भडकली. अमेरिकेला वाटले, ही भाषा पाकिस्तानची नसून रशिया आणि चीनची आहे. संतापलेल्या ज्यो बायडेन यांनी इम्रान खान यांना फोनही केला नव्हता हे आपणास आठवत असेल. अमेरिकेच्या नजरेला नजर भिडवताना इम्रान खान एकटे नव्हते हे येथे लक्षात घ्यावे लागेल. रशिया आणि चीनने पाकिस्तानी लष्कर तसेच आयएसआयला खुबीने आपलेसे करून घेतले आहे. लष्कराने इम्रान यांना पुढे करून अमेरिकेला नजर भिडवली. पाकने चीन, रशियाबरोबर जावे हे अमेरिकेला पसंत पडले नाही. चीन, रशिया सध्या एकत्र असल्याने अमेरिका आधीच चिंतेत आहे.
युक्रेन युद्ध सुरू होण्याच्या आधी इम्रान रशिया दौऱ्यावर जाऊन आले, हेही अमेरिकेला आवडले नव्हते. आता हा माणूस सत्तेत राहणे अमेरिकेच्या मुळीच हिताचे नाही हे त्यांना कळून चुकले. याशिवाय आयएसआयने पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) तसेच जमियत उलेमा-ए-इस्लाम फजल (जेयूआय-एफ) यांच्यासह छोट्या विरोधी दलांचे संघटन करून ठेवले आहे. इम्रान यांच्या निकटवर्तीयांनीही त्यांची साथ सोडली, हा ‘सीआयए’च्या उद्योगांचाच परिपाक होता. इम्रानच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या आघाडीत सामील मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट-पाकिस्ताननेही (एमक्यूएम-पी) विरोधकांशी हात मिळवले आहेत. ३४२ सदस्यांच्या सभागृहात बहुमताच्या १७२ या आकड्यापासून इम्रान खूपच दूर असल्याने त्यांची हार निश्चित होती. विरोधी पक्षांना वाटत होतं, की इम्रान राजीनामा देतील; पण त्यांनी संसदच बरखास्त करून टाकली.
लष्कराचाच विषय असेल तर त्यांनाही हे कळून चुकले आहे की, अयुब खान, झिया उल हक किंवा परवेझ मुशर्रफ यांच्याप्रमाणे लष्करप्रमुखांनी राज्य करण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. लोकतंत्राच्या चौकटीत आपले प्यादे बसवूनच राज्य करावे लागेल. इम्रान यांच्याशी त्यांचे तंत्र जमतही होते; पण अमेरिकेने अशी स्थिती निर्माण करून ठेवली की लष्करालाही गप्प राहावं लागलं. विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनाही त्यांचा विरोध नाही, कारण शरीफ लष्करासोबत चालतील आणि त्यांचे अमेरिकेशीही चांगले संबंध आहेत.
इम्रान यांच्याविरुद्ध वातावरण तयार करण्यात तिथली आर्थिक स्थिती हेही एक कारण आहे. पेट्रोल आणि धान्याच्या किमती तर सोडाच, टोमॅटो, बटाट्याचे भावही गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानात टोमॅटोचे भाव ३०० रुपये किलो आहेत, यावर आपण विश्वास ठेवाल? अनेक वस्तूंचे भाव भारताच्या ५ पट झाले आहेत. इम्रान यांच्या राज्यात उद्योग भरभराटीला येतील, नोकऱ्या मिळतील असे स्वप्न लोकांनी पहिले; पण लाहोरसारख्या ठिकाणी जर १०-१० तास वीज नसेल तर उद्योग वाढणार कसे? दहशतवाद संपून शांतता येईल, देशाची प्रगती होईल असे स्वप्न लोकांनी पाहिले. मात्र, तहरीक-ए-तालिबान आणि दुसरे दहशतवादी गट सक्रिय झाले आहेत. तहरीक-ए-तालिबानने मोठ्या हल्ल्याची धमकीही दिली आहे. स्वप्नांच्या आकाशात उड्डाण करण्याच्या पाकिस्तानी आकांक्षेचे पंख घायाळ झाले आहेत. मला एक गाणे आठवतेय...
दिल का खिलौना हाय टूट गया
कोई लुटेरा आके लूट गया...!
मी हा स्तंभ लिहित असतानाच संसद बरखास्त करण्याचे प्रकरण पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. इम्रान समर्थकांचं म्हणणं आहे की, संसदेची पुनर्स्थापना सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारित येत नाही, कारण संसदेच्या आतच सर्व घडामोडी झाल्या आहेत. मात्र संसद पूर्ववत झाली तर आपल्याला संधी मिळेल, अशी विरोधकांची भावना आहे.
आगे-आगे देखिए होता है क्या...!