‘ब्लड मनी’च्या बदल्यात चौघांची फाशी रद्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2023 07:49 AM2023-12-30T07:49:54+5:302023-12-30T07:50:58+5:30
‘ब्लड मनी’ म्हणजे काय माहीत आहे?
‘ब्लड मनी’ म्हणजे काय माहीत आहे? अरब देशांमध्ये ही संकल्पना खूप प्रचलित आहे. मुळात अरब देशांमध्ये कायदे खूप कडक आहेत. काही ठिकाणी तर जशास तसं ही पद्धत वापरली जाते. म्हणजे हाताच्या बदल्यात हात, पायाच्या बदल्यात पाय आणि जिवाच्या बदल्यात जीव!
ज्याने गुन्हा केला आहे किंवा ज्याच्याकडून अनवधानानं का होईना, असलं काही कृत्य झालं असेल तर त्याच्याकडून त्याच प्रकारे ‘मोबदला’ घेतला जातो.
‘ब्लड मनी’ म्हणजे थोडी वेगळी पद्धत. त्यालाच ‘दिया’ असंही म्हटलं जातं. समजा एखाद्या व्यक्तीनं एखाद्याचा खून केला आणि त्याचा गुन्हा सिद्ध झाला, तर बऱ्याचदा त्याला किंवा त्या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना फाशीची शिक्षा दिली जाते. त्याला एक अपवाद मात्र आहे, ही फाशीची शिक्षा रद्दही होऊ शकते, मात्र तेव्हाच, जेव्हा खून झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या लोकांनी जर ‘ब्लड मनी’ला मान्यता दिली तर! ‘ब्लड मनी’ म्हणजे रक्ताच्या बदल्यात पैसा! आपला जवळचा व्यक्ती तर आता परत येणार नाही, पण त्याबदल्यात मोठी रक्कम घेऊन जर मृताच्या जवळच्या व्यक्तींना आर्थिक दिलासा दिला आणि तो जर त्यांना मान्य असेल, तर गुन्हेगाराची फाशीची शिक्षा रद्द होऊ शकते!
शारजामध्ये नुकत्याच एका घटनेत ब्लड मनीच्या बदल्यात तब्बल चार जणांची फाशीची शिक्षा जवळपास रद्द होण्याची शक्यता आहे. शक्यता अशासाठी की यासंदर्भात अजून थोडी कायदेशीर प्रक्रिया बाकी आहे. यासंदर्भातील अंतिम सुनावणी न्यायालय २२ जानेवारी २०२४ रोजी करणार आहे. आतापर्यंतचा प्रघात असा, की ज्या व्यक्तीचा खून झाला आहे, त्याच्या जवळच्या व्यक्तींनी ‘ब्लड मनी’ला मान्यता दिली आणि ती रक्कम न्यायालयात जमा झाली की आरोपींची शिक्षा रद्द होते. निदान आतापर्यंत तरी न्यायालयानं ब्लड मनी दिल्यानंतर आरोपींची शिक्षा माफ केली आहे. त्यामुळे यावेळीही तसंच होईल, याची सर्वांनाच खात्री आहे.
२०१९ मध्ये एका भारतीय युवकाचा खून केल्याप्रकरणी या चौघाही आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील तीन तरुण पाकिस्तानी, तर एक तरुण भारतीय आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील राव मोहम्मद आदिल, राणा ताबिश राशिद आणि आदिल जावेद चीमा यांचा यात समावेश आहे, तर भारताच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील गुरप्रीत सिंह हादेखील या प्रकरणात आरोपी होता!
मृताच्या नातेवाइकांना ‘ब्लड मनी’साठी राजी करण्याचे प्रयत्न कधीपासून सुरू होते, मोठ्या प्रयत्नांनंतर त्यात यश आलं. त्यामुळे या चारही युवकांना आता जीवदान मिळणार आहे, मात्र त्यासाठी जवळपास ४६ लाख रुपयांची रक्कम मोजावी लागली. खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेले हे चारही तरुण सर्वसामान्य घरांतले. थोडा पैसा मिळावा, घरची गरिबी दूर व्हावी, बहिणींची लग्नं व्हावीत आणि कर्जाच्या विळख्यातून दूर व्हावं यासाठीच हे चारही युवक शारजात आलेले होते. त्यांच्याकडे इतका पैसा कुठून येणार आणि मृताच्या नातेवाइकांना त्यासाठी कोण मनवणार? पण त्यासाठी मूळचे भारतीय, पण काही वर्षांपासून दुबईत स्थायिक झालेले ६७ वर्षीय उद्योजक सुरिंदर पाल सिंह ओबेरॉय उर्फ एस. पी. सिंह ओबेरॉय यांनी पुढाकार घेतला आणि या तरुणांना त्यांनी जीवदान मिळवून दिलं. केवळ या तरुणांसाठीच नव्हे, तर त्यांच्यासारख्या अनेकांसाठी ते यापूर्वीही मसिहा बनून समोर आले आहेत.
एस. पी. सिंह यांची कहाणीही हृदयाला भिडणारी आहे. १९७७ मध्ये ते दुबईत आले. काही वर्षं राहून ते भारतात आले. मात्र त्यानंतर ते पुन्हा दुबईत आले आणि १९९६ मध्ये त्यांनी स्वत:ची एपेक्स इंटरनॅशनल कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी सुरू केली. त्याचबरोबर इतरही काही उद्योग सुरू केले. बघता बघता त्यांचं नाव झालं आणि एक दानशूर व्यक्ती म्हणूनही त्यांनी तिथे नाव कमावलं.
२०१० मध्ये घडलेल्या एका घटनेनं मात्र त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. त्यावेळी एका पाकिस्तानी व्यक्तीच्या मृत्यूला जबाबदार धरत १७ भारतीय तरुणांना फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. एका चुकीमुळे तब्बल १७ तरुणांना आपल्या आयुष्याची आहुती द्यावी लागेल, या विचारानंच ते हळहळले आणि त्यांनी या १७ तरुणांच्या ‘ब्लड मनी’ची व्यवस्था करत त्यांना जीवदान मिळवून दिलं. त्यासाठी मात्र त्यांना तब्बल २.२ दशलक्ष डॉलर्स खर्च करावे लागले होते!
९८ टक्के कमाई समाजहितासाठी!
या अनुभवानंतर एस. पी. सिंह यांनी २०११ मध्ये ‘सरबत दा भला चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली आणि आपल्या कमाईतील तब्बल ९८ टक्के हिस्सा समाजिक कार्यासाठी वापरायला सुरुवात केली. याच ट्रस्टच्या माध्यमातून ते आता आखातात फसवून आणल्या गेलेल्या मुलींना सोडवणं, ब्लड मनी, मृतदेह त्या त्या देशांत पाठवणं... असे अनेक उपक्रम राबवतात.