भविष्यात माणसाला ‘एआय’चीच सोबत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 07:25 IST2024-12-16T07:24:23+5:302024-12-16T07:25:04+5:30
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रारूपातून काम करण्याला प्रथमच नोबेलने गौरविण्यात आले आहे. मात्र, या क्षेत्रातील ही नवी पहाट नवी भीतीही सोबत घेऊन आली आहे.

भविष्यात माणसाला ‘एआय’चीच सोबत!
साधना शंकर, लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारी
यंदाच्या नोबेल पुरस्कारातील नवा तारा अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स होता. यात आश्चर्य काही नसले तरी आपल्या जगण्यात ज्या प्रकारे आणि गतीने कृत्रिम बुद्धिमत्तेने स्थान मिळवले, त्याची ही पावतीच ठरते आहे. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत वैज्ञानिक संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्ता हे जरा आडवळणाचे क्षेत्र होते. आता या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार दिला गेल्यामुळे नवी पहाट झाली आहे. डॉ जॉन हॉपफील्ड आणि डॉक्टर जेफ्री हिंटन यांना यंत्राचे अध्ययन आणि आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्समध्ये मोलाचे काम केल्याबद्दल पदार्थविज्ञानाचा नोबेल पुरस्कार दिला गेला.
कृत्रिम न्यूरल नेटवर्क्स तयार केल्याबद्दल डॉ. हॉपफील्ड यांचा गौरव झाला. डॉक्टर हिंटन यांना नेहमीच कृत्रिम बुद्धिमत्तेचे पितामह असे संबोधले गेले आहे. न्युरल नेटवर्क्सचा अध्ययन क्षमतेत मोठी सुधारणा केल्याबद्दल हिंटन यांना गौरविण्यात आले. न शिकवता डेटा पॅटर्न ओळखणे, सहज अध्ययन यासारख्या अनेक गोष्टी त्यामुळे शक्य होणार आहे.
या दोन शास्त्रज्ञांच्या कामामुळे सर्व उद्योगात मानसिक श्रम कमी करण्यासाठी यंत्राच्या अध्ययनाचा वापर शक्य होणार आहे. चॅट जीपीटी आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या इतर उपयोजनांचे नियंत्रण करणाऱ्या न्युरल नेटवर्क्सवर या शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रोटीनची संरचना जाणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करता येईल यावर संशोधन करणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना मिळाला आहे.
मानवी जीवनात या प्रोटीन्सना खूप महत्त्व असते. जीवशास्त्र समजून घेण्यासाठी प्रोटीन्स समजावी लागतात. डॉ. डेव्हिड बेकर यांनी प्रोटीन्सची संरचना समजून घेतली. संगणक आज्ञावलीच्या माध्यमातून त्यांनी नवा प्रोटीन तयार केला. ‘रोझेटा कॉमन्स’ हे त्यांचे सॉफ्टवेअर पॅकेज सध्या जगभर वापरले जाते.
डॉ. डेनिस हस्स्बीस आणि डॉ. जॉन एम जंपर या दोघांनी वेगळ्या वाटेने जाऊन प्रोटीनच्या संरचनेचा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून अमिनो ॲसिड श्रृंखलेच्या अंगाने वेध घेतला. ‘डीप माइंड’ या गूगलच्या एआय कंपनीचे हे दोघेही भाग आहेत. अल्फा फोल्ड एक आणि दोन या दोन्ही आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्सकडे सध्या २० कोटी प्रोटीन संरचनेची प्रेडिक्शन्स आहेत. मे मध्ये प्रसृत झालेल्या अल्फा फोल्ड थ्रीमुळे इतर अनेक बायो मॉलिक्यूल्सची संरचना सांगणे शक्य झाले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेची पायाभरणी तसेच बुद्धिमत्तेच्या प्रारूपातून काम करण्याला प्रथमच नोबेलने गौरविण्यात आले आहे. वैज्ञानिक संशोधनात सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर दिला जात असून, भविष्यात माणसाला या बुद्धिमत्तेबरोबर काम करावे लागणार आहे या समजुतीवर या पुरस्काराने शिक्कामोर्तब झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडित सर्व गोष्टी इशारे देतच येतात. एआयचे पितामह डॉ. हिंटन नोबेल जाहीर होताच म्हणाले, ‘औद्योगिक क्रांतीशी याची तुलना होईल. परंतु, ए. आय. लोकांच्या शारीरिक बळापेक्षा मनोबलाला मागे टाकणार आहे. आपल्यापेक्षा ए. आय. वेगळे कसे असेल याचा आपल्याला अनुभव नाही’, मानवी बुद्धिमत्तेवर शिक्कामोर्तब आणि पुरस्कार देण्यापासून माणसाने एआयबरोबर काम करण्यापर्यंत असा प्रवास झाला. आता एखादा मोठा शोध लावल्याबद्दल नोबेल कमिटीने यंत्राला पुरस्कार देण्याचा दिवस फार दूर नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता हीच एक भीती आपल्याबरोबर घेऊन आली आहे. sadhna99@hotmail.com