शहाणी माणसं मौनात, धर्मांधाचा कलकलाट वाढला; वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे?
By नंदकिशोर पाटील | Published: April 5, 2023 12:47 PM2023-04-05T12:47:11+5:302023-04-05T12:47:33+5:30
वाट चुकलेल्यांना कोणीतरी खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे. परंतु ज्यांच्याबद्दल आदर वाटावा अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वांची उणीव असल्याने कोणालाच कुणाचा धाक उरलेला नाही.
७ नोव्हेंबर १९४६ ही तारीख इतिहासात खूप महत्वाची आहे. स्वातंत्र्याचा लढा अंतिम टप्प्यात असताना देशभर धार्मिक दंगे भडकले. मोहम्मद अली जिन्नांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी ‘ॲक्शन’चा नारा दिल्यानंतर संयुक्त बंगालमध्ये दंगली सुरू झाल्या. आताच्या बांगलादेशात असलेल्या नौखालीत तर तेव्हा रक्ताचे पाट वाहिले. दिल्लीत स्वातंत्र्याच्या वाटाघाटी सुरू असताना नौखाली कित्येक दिवस जळत होते. आता सारखी मिनिटागणिक ‘ब्रेकिंग न्यूज’ देणारी न्यूज चॅनल्स तेव्हा नव्हती. वर्तमानपत्रांचा खपही शहरांपुरताच होता. टेलिफोन व्यतिरिक्त संवादाचे कोणतही माध्यम नव्हते. तेदेखील मर्यादित. परिणामी, नौखालीच्या दंगलीची बातमी दिल्लीपर्यंत पोहोचायला पंधरा दिवस लागले!
या पंधरा दिवसात विशिष्ट समुदायाच्या घरांची राखरांगोळी झाली होती. नौखालीच्या बातमीने महात्मा गांधी अस्वस्थ झाले. त्यांनी नौखालीला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथली स्फोटक परिस्थिती पाहता बापूंनी आपला दौरा पुढे ढकलावा, अशी विनंती पंडित नेहरू आदी नेत्यांनी केली. मात्र गांधीजी ठाम राहिले. सरोजिनी नायडू, निर्मलकुमार बसू, सुशीला नायडू, जे. बी. कृपलानी अशा निवडक सहकाऱ्यांना सोबत घेऊन रेल्वेने दीड हजार किलोमीटर प्रवास करून गांधीजी बंगालमध्ये पोहोचले. जागोजागी धार्मिक दंगे पेटलेले होते. अनेक ठिकाणी बापूंना विरोध झाला. मात्र, जिवाची पर्वा न करता बापू नौखालीत पोहोचले. पदयात्रा, बैठका, सभा घेऊन त्यांनी नौखालीत शांतता प्रस्थापित केली. तब्बल चार महिने ते तिथे होते! गांधीजींच्या नौखाली दौऱ्याचे फलित काय तर फाळणीनंतर पूर्व पाकिस्तानात आणि आता बांगलादेशात असलेल्या नौखालीत हिंदू- मुस्लिम समुदायात एकही धार्मिक दंगल अथवा तणावाची घटना घडलेली नाही! एवढेच नव्हे, तर गांधीजींच्या कार्याने भारावून गेलेल्या बॅरिस्टर हेमंत कुमार घोष यांनी त्यांच्या मालकीची सुमारे अडीच हजार एकर जमीन बापूंनी स्थापन केलेल्या ट्रस्टला दान केली! आजही तिथे गांधी आश्रम आहे.
आज या घटनेची आठवण होण्याचे कारण म्हणजे, सध्याचे अस्वस्थ वातावरण. गेल्या तीन-चार दिवसात राज्यात ठिकठिकाणी घडलेल्या घटना पाहिल्या तर, कोणीतरी सामाजिक ऐक्याला नख लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा संशय येतो. किरकोळ कारणांचे निमित्त करून जाळपोळ, दगडफेक केली जाते. पोलिसांना लक्ष्य बनविले जाते. धार्मिक तणाव निर्माण करून कोणाला राजकीय पोळी भाजायची असेल तर हा आगीशी खेळ त्यांच्या अंगाशी आल्याशिवाय राहाणार नाही. एखादी ठिणगी तुमच्याही घरावर येऊ शकते. कोणत्याही राष्ट्राची प्रगती सामाजिक शांततीशिवाय शक्य नसते. आधीच कोरोनामुळे उद्योगधंद्याचे कंबरडे मोडले. अनेकांचे रोजगार बुडाले. दोन वर्षांनंतर आता कुठे जनजीवन पूर्वपदावर येत असताना अशा घटनांमुळे निरपराध लोक हकनाक बळी पडतील. नवे उद्योग येणार नाही. गुंतवणुकीला खीळ बसेल. तरुणाईच्या भविष्यात आपण अंधार पेरत आहोत, याची जाणीव ठेवा.
समाजात शहाण्या माणसांचीच संख्या बहुसंख्य असते. मात्र, त्यांनी मौन बाळगल्यामुळे अडाण्यांचा हैदोस सुरू आहे. वाट चुकलेल्यांना कोणीतरी खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे. परंतु ज्यांच्याबद्दल आदर वाटावा अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वांची उणीव असल्याने कोणालाच कुणाचा धाक उरलेला नाही. गांधी-नेहरूंबद्दल टिंगल करणे वेगळे आणि मानवतेसाठी त्यांनी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेणे वेगळे. म्हणूनच, इलाही जमादार यांच्या गझलेतील ‘वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे?’ हा सवाल खूप महत्त्वाचा आहे.
आता तरी जागे व्हा!
लोकशाहीत नागरी समाजाची भूमिका खूप महत्त्वाची असते. अधिकार, हक्क आणि स्वातंत्र्याबाबत जागृत असणाऱ्या प्रबुद्ध समाजाने समाजविघातक प्रवृत्तीवर अंकुश ठेवला पाहिजे. धर्म आणि राजकारणाची सरमिसळ करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायसंस्थेने खडसावले आहेच. नागरी समाजातूनदेखील आवाज उठवला पाहिजे. कारण, प्रबुद्धांचा आवाज बुलंद झाल्याखेरीज द्वेषाच्या मशाली विझणार नाहीत. परंतु, दुर्दैवाने आज कधीकाळी हातात मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरणारी ‘सिव्हिल सोसायटी’च गायब आहे! समाजातील शहाणी माणसं मौनात गेल्याने, सामाजिक चळवळींनी अंग टाकल्याने धर्मांधाचा कलकलाट वाढला आहे. २१ व्या शतकातही कोणाला आपला धर्म संकटात आहे, असे कसे वाटू शकते? नक्कीच कोणीतरी अफू आणि अफवा पिकवित असावेत.