एसटीचे तिकीट कोणत्या भाषेत काढायचे..? दोन राज्यांची बससेवा पाच दिवस ठप्प झाली...
By वसंत भोसले | Updated: March 1, 2025 08:26 IST2025-03-01T08:09:55+5:302025-03-01T08:26:24+5:30
एसटीत चढलेल्या एका शाळकरी मुलीने वाहकाकडे मराठीत तिकीट मागितले, त्यावरून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरची वाहतूक तब्बल पाच दिवस ठप्प झाली...

एसटीचे तिकीट कोणत्या भाषेत काढायचे..? दोन राज्यांची बससेवा पाच दिवस ठप्प झाली...
- वसंत भोसले, संपादक, लोकमत कोल्हापूर
दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजीनगरीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगले होते. संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर भाषेविषयी काही मूलभूत मांडणी करत होत्या. ‘भाषा ही जोडणारी असते, तोडणारी नसते’ या त्यांच्या वाक्यावर कडाडून टाळ्या वाजत होत्या; त्याचवेळी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागात मराठी विरुद्ध कन्नड वाद उफाळून एसटीच्या गाड्या फोडण्याचा कार्यक्रम सुरू होता.
‘कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु’ असे सांगत महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल कर्नाटकातून आला आणि महाराष्ट्रात विसावला, असे सांगून ताराबाई पुढे म्हणाल्या, भाषा एक जैविक संस्कृती आहे! - मराठी माणसांच्या मेळाव्यात इतके काही महत्त्वाचे तिकडे दूर दिल्लीत बोलले जात असताना बेळगावच्या पूर्वेस सांबरा विमानतळाशेजारच्या बाळेकुंद्रीला जाणाऱ्या शहर बसगाडीत तिकीट काढताना कोणती भाषा वापरायची, यावरून वाद पेटला. सांबऱ्यातून एसटीत चढलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीकडे पास होता. ‘सोबत आलेल्या भावंडाचे तेवढे तिकीट द्या’, असे त्या मुलीने वाहकाला तिची मातृभाषा असलेल्या मराठीतून सांगितले. तेव्हा महादेव हुक्केरी नामक वाहकाने कन्नडमधून बोलण्याचा आग्रह धरला आणि दमदाटी सुरू केली. बेळगाव शहर आणि परिसरातील अनेक गावांत कर्नाटक राज्य स्थापनेच्या ६९ वर्षांनंतरही मातृभाषा मराठीतून समाजजीवन चालते. बिचाऱ्या मुलीला मराठीशिवाय इतर भाषा येत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही कन्नड बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या महादेव हुक्केरी या वाहकाने आरडाओरडा सुरू केला.
‘कर्नाटकात राहता आणि कन्नड बोलता येत नाही?’ असे दरडावत या महाशयांनी शाळकरी मुलीची लाज काढली. धक्के देत तिला बाळेकुंद्रीत उतरवले. रडत उतरणाऱ्या मुलीकडे गावच्या तरुणांचे लक्ष गेले. त्यांनी झालेला प्रकार समजून घेतला. पुढील गावी गेलेली गाडी परत बेळगावकडे जाण्यासाठी बाळेकुंद्रीत येताच तरुणांनी त्या वाहकाला जाब विचारला. त्यात मराठी-कन्नड अशी सारी तरुण मुले होती. वाहकाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. मारीहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, त्या मुलीचा विनयभंग वगैरे काही न होता ‘मराठीतून की कन्नडमधून बोलायचे’ यावर वाद झाल्याचे महादेव हुक्केरी यांनी कन्नड वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांना कळवले. एवढ्यावरून वाद पेटला. शाळकरी मुलीला हात लावणे वगैरे गैर होतेच, पण या प्रकरणाच्या मुळाशी ‘कर्नाटकात ही मुलगी मराठीत का बोलते? तिने कन्नडमध्येच बोलले पाहिजे’ हा आग्रह होता. सहिष्णुतेचा बांध फुटला.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन शेजारी राज्यांमध्ये चारशे किलोमीटरची सीमा आहे. दोन्ही बाजूचे बारा जिल्हे लागून आहेत. दोन्ही बाजूच्या गावागावांमध्ये दोन्ही भाषा बोलणारे लाखो लोक आहेत. महाराष्ट्रातून दररोज साडेसातशे आणि कर्नाटकातूनही तेवढ्याच एसटी गाड्या दोन्ही राज्यांत ये-जा करतात. शिवाय सुमारे एक हजार खासगी बसगाड्या दररोज धावतात. महादेव हुक्केरी यांच्या हेकटपणामुळे कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मध्य कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटी महामंडळाची गाडी अडवून चालक-वाहकाला मारहाण केली. गाडीवर दगडफेक केली. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. ‘कन्नड विरुद्ध मराठी’ असे युद्ध पेटले. शिवसेनेने कोल्हापूर, मिरज, सोलापूर, आदी ठिकाणी कर्नाटक महामंडळाच्या गाड्या अडवून त्यावर ‘जय महाराष्ट्र’ लिहून चालक-वाहकांना दमदाटी केली.
‘तिकीट काढताना कोणती भाषा वापरायची?’ - यावरून एका शाळकरी प्रवासी मुलीशी वाहकाने घातलेल्या वादापायी पाच दिवस गाड्यांची जा-ये बंद करण्याचा निर्णय दोन्ही राज्यांच्या प्रशासनाने घेतला. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. कर्नाटकाच्या अनेक गावांतून महाराष्ट्रातील मराठी विद्यालयात मुले-मुली ये-जा करतात. लग्नसराई आहे. जत्रा-यात्रांचे दिवस आहेत. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाभागात प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात चालत असतेच, त्यात ही सगळी घाई! पण महादेव हुक्केरी यांनी घोळ घातला आणि हे सारे चक्र थबकले!
त्या मुलीचा दोष काय? - तिला येत असलेल्या भाषेत तिने भावासाठी तिकीट मागितले. याचा इतका बाऊ करण्यात आला की, महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि कर्नाटकच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्या पातळीवर बोलणी करावी लागली. पोलिसांनी मुलीच्या नातेवाइकांवर दबाव आणून पोक्सोअंतर्गत दाखल केलेली तक्रार मागे घ्यायला लावली, तेव्हा कुठे मराठी आणि कन्नड गाड्या पाचव्या दिवशी सुरू झाल्या.
भाषिक अभिमानाचे राजकारण सतत शिजत असले, तरी दररोजच्या व्यवहारात एकमेकांशी संवाद करण्यासाठी समन्वयाने मार्ग काढणे सोयीचे आणि शहाणपणाचेही असते. भाषावार प्रांतरचना झाली आहे म्हणून शेजारपाजारच्या भाषांनी एकमेकींशी वैर धरणे सुज्ञपणाचे नव्हे, असे तुम्ही म्हणालात ताराबाई, पण वास्तव इतके विचित्र तिढ्याचे आणि दुर्दैवी आहे की, ‘एसटीचे तिकीट कोणत्या भाषेत काढायचे..?’ यावरून माणसे एकमेकांची डोकी फोडायला तयार होतात हल्ली!
vasant.bhosale@lokmat.com