झुंडशाहीच्या उन्मादाने लोकशाहीस सुरुंग लागेल
By विजय दर्डा | Published: July 23, 2018 04:50 AM2018-07-23T04:50:45+5:302018-07-23T04:56:55+5:30
सध्याचे सत्ताधीश या धोक्याला अटकाव करण्याचे प्रयत्न करताना दिसत नाहीत, हे मोठे दुर्दैव आहे.
आपल्या देशाला झालंय तरी काय? पहावे तिकडे बिनदिक्कतपणे झुंडशाही सुरू असल्याचे दिसते. कोणत्या तरी विषयावरून वाद निर्माण होतात किंवा अफवा पसरते, लोक जमतात आणि कुणावर तरी संशय घेतात आणि त्याला हाणामारी करत चक्क ठार मारून टाकतात! इंग्रजीत याला ‘मॉब लिंचिंग’ म्हणजेच झुंडशाहीने होणाऱ्या हत्या असे म्हटले जाते. चार्ल्स आणि बॉब या लिंच आडनावाच्या दोन सख्ख्या भावांपैकी कुणावरून तरी अमेरिकेत हा शब्द रूढ झाला, असे मानले जाते. १८ व्या शतकात अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये निग्रो लोकांना जमाव मारहाण करून ठार मारत असे. अशा जमावांना उन्मादी बनविण्याचा आरोप या दोन भावांवर केला जात होता. त्यांनी ‘लिंचिंग’ हाच जणू कायदा बनविला होता.
इतिहासावर नजर टाकली तर असे दिसते की, त्या काळात जगात अनेक ठिकाणी उन्मादी जमावांकडून अशा हत्या होण्याच्या घटना घडत असत. भारतातही याची उदाहरणे मिळतात. ‘चेटकीण’ मानून या देशात कितीतरी महिलांची हत्या केली गेली आहे. परंतु काळानुरूप सुसंस्कृतपणा आला, कायद्याचे राज्य आले व अशा घटना कमी झाल्या. मी या बाबतीत दंगलींचा उल्लेख करणार नाही, कारण दंगलींची मानसिकताच वेगळी असते. नागालँडमध्ये गेलात तर ब-याच घरांमध्ये तुम्हाला अनेक मानवी कवट्या लटकवून ठेवलेल्या दिसतील. त्या घरांचे प्रमुख त्याकडे बोट दाखवून तुम्हाला अभिमानाने सांगतील की, त्यांच्या पूर्वजांनी ज्या शत्रूंचा वध केला त्यांची आठवण म्हणून या कवट्या ठेवलेल्या आहेत. यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची भावना असते. त्या काळी ‘बळी तो कान पिळी’, असा जमाना होता. पण आता तर कायद्याचे राज्य असूनही अशा ‘मॉब लिंचिंग’च्या घटना का आणि कशा घडू शकतात, असा प्रश्न पडतो. या झुंडशाहीवर अंकुश ठेवायला कुणी आहे की नाही?
खरं तर आताचे ‘मॉब लिंचिंग’ व पूर्वीच्या काळात होणाºया अशा घटना यात फरक आहे. आकडेवारी पाहिल्यास असे दिसते की, सन २०१५ पासून ते चालू वर्षाच्या मध्यापर्यंत भारतात ६६ लोकांना अशा ‘मॉब लिंचिंग’मुळे हकनाक प्राण गमवावे लागले आहेत. कुणाला गोमांस जवळ बाळगल्याच्या संशयावरून जमावाने ठार केले, काहींना कत्तलीसाठी गार्इंची तस्करी केल्याच्या आरोपावरून तर काहींना मुले पळविण्याच्या संशयावरून जिवानिशी मारण्यात आले. बिहारच्या पाकुड भागात घडलेली घटना तर मोठी विचित्र होती. एक तरुण काही कामासाठी तेथे गेला होता. जवळपास लहान मुले पाहून त्या तरुणाने त्या मुलांना चॉकलेट दिली. गावक-यांनी त्याला मुले पळविणारा समजून ठार मारले. महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातही अशाच प्रकारे मुले पळविणारे समजून पाच निर्दोष व्यक्तींची हत्या केली गेली. परदेशातून भारतात आलेल्या दोन भावांनाही अशा ‘मॉब लिंचिंग’मुळे प्राण गमवावे लागले.
अशा घटनांच्या वेळी जमावाच्या डोक्यात असा उन्माद शिरलेला असतो की, त्यांच्या तावडीतून सुटून पळणेही अशक्य होते. झारखंडमध्ये तर स्वयंभू गोरक्षकांच्या एका जमावाने १५ किमी पाठलाग करून अलिमुद्दीन अन्सारी यांची हत्या केली. अलिमुद्दीन यांनी गाडी थांबविली तेव्हा त्या गाडीतून गोमांस नेले जात असल्याची ओरड करून जमाव जमविला गेला. जमलेल्या लोकांनी अलिमुद्दीन यांचीे ती गाडी पेटवून दिली व अलिमुद्दीन यांना एवढे बेदम मारले की नंतर त्यांचे निधन झाले.
या घटनेच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याचे नाव पुढे आले. जलद गती न्यायालयाने अनेक आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पुढे उच्च न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले तेव्हा त्यांच्या स्वागत समारंभात केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनीही हजेरी लावली. गळ््यात हार घातलेले ‘मॉब लिंचिंग’चे आरोपी उभे आहेत व त्यांच्यासोबत एक केंद्रीय मंत्रीही उभा आहे, या चित्रातून समाजात नेमका कोणता संदेश जाणे अपेक्षित होते? जयंत सिन्हा त्या आरोपींना शाबासकी देण्यासाठी, त्यांचे मनोधैर्य बळकट करण्यासाठी आले होते ना? जयंत सिन्हा यांचे वडील यशवंत सिन्हा यांनाही आपल्या मुलाच्या या करणीने धक्का बसला. त्यांनी टष्ट्वीटरवर लिहिले, ‘पूर्वी मी एका लायक मुलाचा नालायक बाप होतो. पण आता तसे राहिलेले नाही. माझ्या मुलाचे वर्तन मला बिलकूल मान्य नाही’!
जयंत सिन्हा यांच्या या अक्षम्य वर्तनावर त्यांच्या पक्षाने गप्प बसावे, याचे मला आश्चर्य वाटते. पक्षाने त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. वैचारिक मतभेद समजण्यासारखे आहे, पण मनभेद राष्ट्राच्या दृष्टीने विष आहे. यातून देशाचे तुकडे होतील. या जमावी हत्या खरंच माझ्याच देशातील लोक करत आहेत, यावर क्षणभर मनात शंकाही येते. हा देश बुद्ध, महावीर व गांधीजींचा आहे. संतमहात्म्यांचा आणि सुफींचा आहे. या माझ्या देशाला ही कुठली अवदसा आठवली? हल्लीचा काळ गगनाला गवसणी घालण्याचा आहे. देश बलशाली करण्याचा आहे. गावखेड्यांपर्यंत समृद्धीची गंगा नेण्याचा आहे. आपल्या युवकांनी जगात नाव कमावण्याचा आहे. ज्ञानगंगा घरोघरी नेण्याचा आहे. हे सर्व बाजूला पडून गोहत्येच्या नावाने देशात द्वेष आणि तिरस्काराचे विखारी बीज पेरले जात आहे. भारतात धार्मिक आधारावर फूट पाडण्यासाठी हे गोहत्येचे भूत ब्रिटिशांनी प्रथम उभे केले. इंग्रज भारत सोडून निघून गेले पण त्यांची मानसिकता कायम आहे. सत्तेसाठी फुटीचे राजकारण आजही केले जात आहे. हा घातक खेळ खेळणारे देशाचे कट्टर शत्रू आहेत. अशा घटनांमध्ये जे मारले जातात तेही भारतीयच आहेत, हे विसरून चालणार नाही. जात-पात, धर्म-संप्रदाय यावरून समाजात फूट पाडण्याचे हे खेळ बंद झाल्याखेरीज देशाची प्रगती होणार नाही, हे प्रत्येकाने पक्के समजणे गरजेचे आहे. यासंदर्भात गोपालदास ‘नीरज’ यांच्या या काव्यपंक्ती मोठ्या समर्पक आहेत :-
अब तो मजहब कोई ऐसा भी चलाया जाए/ जिसमें इनसान को इनसान बनाया जाए.
या झुंडशाहीला आवर घातला नाही तर यातून देशाच्या लोकशाहीला मोठा धोका निर्माण होईल. सध्याचे सत्ताधीश या धोक्याला अटकाव करण्याचे प्रयत्न करताना दिसत नाहीत, हे मोठे दुर्दैव आहे. यामुळेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेवटी सर्वोच्च न्यायालयाला कान उपटावे लागले. कायद्याचे राज्य असलेल्या लोकशाही देशात कोणत्याही सबबीखाली अशी झुंडशाही खपवून घेतली जाऊ शकत नाही, असे खंबीरपणे बजावून न्यायालयाने यासाठी संसदेने एक स्वतंत्र कायदा करावा, असे सांगितले. लोकसभेतही ‘मॉब लिंचिंग’चा विषय आला. कायदा व सुव्यवस्था हा राज्यांच्या अखत्यारितील विषय असल्याने याचा बंदोबस्त राज्यांनी करावा, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी सांगितले. हा विषय राज्यांचा आहे हे कबूल केले तरी एखादी घातक प्रवृत्ती देशव्यापी स्वरूप धारण करते तेव्हा केंद्र सरकारने हस्तक्षेप करायलाच हवा, असे माझे ठाम मत आहे. केंद्रीय मंत्री कोणताही भेदभाव न करण्याची राज्यघटनेची शपथ घेत असतो. या शपथेचे पालन करण्यासाठीच मंत्र्याला त्या खुर्चीवर बसविलेले असते. त्यामुळे झुंडशाहीचा बिमोड करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करायलाच हवा. अन्यथा देश पुन्हा अंधारवाटेवर जाईल. ‘इस्लामिक स्टेट’ आणि ‘तालिबान’सारखे भस्मासूर अशा झुंडशाहीतूनच उभे राहिले, याचे भान राजकीय नेत्यांना ठेवावेच लागेल.
‘ईश्वर अल्ला तेरो नाम,
सबको सन्मति दे भगवान...!’
समर्पित भावनेने ही प्रार्थना गांधीजींच्या दैनिक प्रार्थनासभेत म्हटली जायची. सध्याच्या प्राप्त परस्थितीत ती सर्वांनी केवळ गुणगुणून भागणार नाही, तर प्रत्यक्ष आचरणात आणावी लागेल.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
काही लोक समर्पित भावनेने काम करून मने जिंकून घेतात. पंजाब पोलिसांच्या वाहतूक शाखेतील गुरधियान सिंग आणि गुरदेव सिंग या दोन शिपायांनी नेमके हेच केले. जिरकपूर फ्लायओव्हरपाशी गुडघाभर पाणी साठले असूनही ते वाहतूक नियंत्रणाचे आपले काम करत राहिले. या कर्तव्यदक्ष पोलिसांची छायाचित्रे प्रसिद्ध अभिनेत्री गुल पनाग यांनी काढली व ती आपल्या टष्ट्वीटर हॅण्डलवर टाकली. ती पाहून पंजाब पोलीसच्या अधिकाºयांनीही या दोघांना बक्षिसे देऊन पाठीवर शाबासकीची थाप दिली. अशा कर्तव्यतत्परतेची मी मनापासून कदर करतो.
(लेखक लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत)