विसंगत विश्लेषण
By admin | Published: December 27, 2014 03:56 AM2014-12-27T03:56:55+5:302014-12-27T03:56:55+5:30
लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला लक्षणीय यश मिळाल्यामुळे काँग्रेस पक्ष सध्या हवालदिल झाला
लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला लक्षणीय यश मिळाल्यामुळे काँग्रेस पक्ष सध्या हवालदिल झाला असून, आपला पक्ष कुठे कमी पडला, याचा शोध घेण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालविला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याझाल्याच काँग्रेसच्या काही ज्येष्ठ पुढाऱ्यांनी या पराभवाचे विश्लेषण करताना पक्षाची हिंदूविरोधी प्रतिमा हे पक्षाच्या पराभवाचे कारण असू शकते, अशा अर्थाचे वक्तव्य केले होते. पक्षाच्या नेतृत्वालाही आता बहुधा तसेच वाटू लागले आहे, असे दिसते. कारण काँग्रेस पक्षाची प्रतिमा हिंदूविरोधी झाली आहे काय, याचा शोध घेण्यास पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. हिंदुत्वाचा मुद्दा भारतात एखाद्या पक्षाला सत्ता मिळवून देण्यास किंवा त्याची सत्ता घालविण्यास कारणीभूत ठरू शकतो, हा निष्कर्ष अर्धाकच्चा असाच म्हणावा लागेल आणि त्याचा अर्थ, भारताची धर्मनिरपेक्षतेवरची श्रद्धा अनाठायी आहे, असाच काढवा लागेल. पण, हे तितकेसे खरे नाही. मुळात काँग्रेस हिंदूविरोधी नाही. काँग्रेस हा अनेक मतप्रवाह असलेला एक सर्वसमावेशक राजकीय पक्ष आहे. कुठलीही अतिरेकी किंवा टोकाची भूमिका न घेणे आणि जनमानसाचा तीव्र विरोध होईल अशी धोरणे टाळणे, हे काँग्रेसचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच दीर्घ काळ हा पक्ष सत्तेवर राहू शकला. याउलट, टोकाच्या आणि तीव्र भूमिका घेणारे मार्क्सवादी किवा जनसंघासारखे पक्ष कधीही सत्तेच्या जवळपासही पोहोचू शकले नाहीत. जनसंघाचे भारतीय जनता पक्षात रूपांतर झाले, तेव्हा पक्षाध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांनी या नव्या पक्षाला अतिरेकी धार्मिक स्वरूपापासून दूर नेऊ न त्याला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी गांधीवादी समाजवादाचा स्वीकार केला. तेव्हाच कुठे आता भाजपा सत्तेच्या वर्तुळाजवळ जाण्यात यशस्वी ठरला आहे. भारतीय जनता पक्षाच्या यशात वाजपेयींच्या सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्वाचा मोठा वाटा आहे. नरेंद्र मोदी यांनाही पंतप्रधान म्हणून आपला चेहरा पुढे आणण्यासाठी विकासपुरुष ही प्रतिमाच धारण करावी लागली. गुजरातच्या जातीय दंगलीला कारणीभूत असलेला त्यांचा चेहरा त्यांना कायमचा दडवून ठेवावा लागला. आजही त्यांच्या पक्षातील अनेक उठवळ हिंदुत्वाचा जप करताना मोदी ह्यहिंदूह्णतला ह्यहिंह्णदेखील उच्चारायला तयार नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. बहुसंख्य भारतीय समाज हिंदू आहे. याचा अर्थ, तो कर्मठ हिंदू आहे असा नाही किंवा सकाळी उठून सगळेच पूजापाठ करीत बसतात असा नाही; पण हा समाज देवभोळा व सश्रद्ध आहे. त्यामुळेच इतिहासात जवळपास सात-आठशे वर्षे मुस्लिम राज्यकर्त्यांची सत्ता तो सहन करू शकला. काँग्रेसवर हिंदूविरोधी असल्याचा आरोप त्यामुळेच होऊ शकत नाही; पण त्यावर मुस्लिम अनुनयाचा आरोप मात्र केला जातो व तो काही वेळा खरा वाटावा, असे या पक्षाचे वर्तन राहिले आहे. कोणत्याही धर्माच्या लोकांच्या धार्मिक भावना तीव्रच असतात. त्यामुळे सुधारणांना सर्वच धर्ममार्तंडांचा विरोध असतो तसा तो मुस्लिम धर्मीयांचाही असला, तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही; पण काही वेळा लोकसमूहाला चुचकारून, तर काही वेळा बळाने सुधारणा लादाव्याच लागतात. त्याचे वेळापत्रक नीट आखले, तर त्यात काही गडबड होण्याची शक्यता नसते. शहाबानो प्रकरणात तशी संधी काँग्रेसच्या सरकारला प्राप्त झाली होती; पण मुस्लिम जनमत दुखावेल, या भीतीने काँग्रेस पक्षाने ती गमावली. त्यामुळे हिंदूंना हा मुस्लिम अनुनय वाटला. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्यामुळे सर्व धर्मसमूहांची सारखीच काळजी घेणे हे जसे त्याचे कर्तव्य आहे, तसेच त्यांना त्यांच्या अंधश्रद्धांवर मात करून सुधारणा करण्यास मदत करणे, हेही कर्तव्य आहे. पण, मतांच्या राजकारणात या गोष्टीकडे दुर्लक्ष होते. एखाद्या जातिसमूहाला खूष केले, तर त्याची मते मिळण्याचा जसा फायदा असतो तसाच दुसरा जातिसमूह त्यामुळे नाराज होऊ न त्याची मते हातची जाण्याचाही धोका असतो. कदाचित, या निवडणुकांत काँग्रेस पक्षाला हा धोका झाला असू शकतो; पण त्याचा अर्थ तो पक्ष हिंदूविरोधी आहे, असा मात्र नाही. मोदींनीही आपल्या प्रचारसभांत काँग्रेसच्या विरोधात तसा मुद्दा उपस्थित केलेला दिसला नाही. त्यांचा सारा भर काँग्रेसच्या कारभाराचे वाभाडे काढण्यावर होता. भारताला सध्या एक आर्थिक गती प्राप्त झाली आहे व सर्व लोकांचे लक्ष ही गती कशी वाढेल, याकडे आहे. ती कुंठित झालेली दिसली, की लोक अस्वस्थ होत आहेत. अलीकडे मोदींविषयी नाराजी व्यक्त होऊ लागली, याचे कारणही तेच आहे. तेव्हा काँग्रेसने जातीपातीचा विचार सोडून कारभार सुधारण्याकडे लक्ष देणे योग्य!