अपेक्षा वाढल्याने निर्देशांकांमध्येही वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:43 AM2017-12-11T00:43:29+5:302017-12-11T00:44:11+5:30
रिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याजदर कायम ठेवल्यानंतर, बाजारात निर्माण झालेली मरगळ सप्ताहाच्या अखेरीस विविध अपेक्षांमध्ये वाढ झाल्याने संपली. परिणामी, सप्ताहाचा शेवट हा तेजीत होऊन बाजाराच्या निर्देशांकामध्ये वाढ झाली.
- प्रसाद गो. जोशी
रिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याजदर कायम ठेवल्यानंतर, बाजारात निर्माण झालेली मरगळ सप्ताहाच्या अखेरीस विविध अपेक्षांमध्ये वाढ झाल्याने संपली. परिणामी, सप्ताहाचा शेवट हा तेजीत होऊन बाजाराच्या निर्देशांकामध्ये वाढ झाली. संवेदनशील निर्देशांकाने ३३ हजारांची, तर निफ्टीने १० हजारांची पातळी राखण्यात यश मिळविले. गुजरात निवडणुकीत भाजपाला यश मिळण्याच्या शक्यतेने बाजार वाढला.
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह संमिश्र राहिला. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणानंतर बाजार खाली गेला. मात्र, सप्ताहाच्या अखेरीस जागतिक बाजारांमधील तेजी, आंतरराष्टÑीय बाजारात खनिजतेलाच्या दरामध्ये झालेली घसरण आणि देशी संस्थांकडून झालेली मोठी खरेदी या बळावर बाजार वाढला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ४१७.३६ अंशांनी वाढून ३३२५०.३० अंशांवर बंद झाला. राष्टÑीय शेअरबाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १४३.८५ अंशांनी वाढून १०२६५.६५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉल कॅप या निर्देशांकांमध्येही वाढ झाली.
भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरणात चलनवाढीची, तसेच अर्थसंकल्पीय तूट वाढण्याची भीती व्यक्त करीत सर्व दर कायम राखले. व्याजदरात कपात होण्याची आशा बाळगून असलेल्या बाजारावर त्याचा विपरित परिणाम झाला. सप्ताहाच्या अखेरीस आंतरराष्टÑीय बाजारपेठेत खनिजतेलाचे दर पिंपाला ६१ डॉलर्सपर्यंत कमी झाले. त्याचबरोबर, गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळण्याचा निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचा अंदाज जाहीर झाला. यामुळे बाजारात वैयक्तिक, तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. यामुळेच सप्ताहाच्या अखेरीस बाजार वाढला.
चालू महिन्यात बाजारात परतीय वित्तसंस्था सातत्याने विक्री करताना दिसून आल्या. आतापर्यंत त्यांनी ४ हजार कोटी रुपये भारतीय भांडवल बाजारातून काढून घेतले आहे. आठ महिने सातत्याने गुंतवणूक केल्यानंतर या संस्था पैसे काढत आहेत.
सुमारे एक दशकानंतर भारतीय शेअर बाजाराने कॅनडाला मागे टाकत, आता जगातील आठव्या क्रमांकाचा शेअर बाजार म्हणून स्थान प्राप्त केले आहे. ३० नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजाराचे एकूण भांडवलमूल्य कॅनडाच्या शेअर बाजारापेक्षा अधिक असल्याने कॅनडा भारतापेक्षा मागे पडला आहे.
३० नोव्हेंबर २०१७ रोजी भारतीय शेअर बाजाराचे एकूण भांडवलमूल्य २.२९ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतके झाले आहे, तर कॅनडाचे एकूण भांडवलमूल्य २.२८ ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढे आहे. २१ जानेवारी २००८ रोजी भारतीय शेअर बाजारामध्ये झालेल्या अभूतपूर्व घसरणीनंतर प्रथमच भारत कॅनडाच्या वरचढ झाला आहे.
या वर्षामध्ये कॅनडामध्ये इंधनविषयक समभागांमध्ये सुमारे १३ टक्के घसरण झाली असून, तेथील निर्देशांक सुमारे २० टक्क्यांनी खाली आले आहेत, याउलट भारतीय बाजार ८०० अब्ज अमेरिकन डॉलरने वाढला आहे.