मराठा गडी, यशाचा धनी!; भारताच्या विजयाने ऑस्ट्रेलियाचे पुरते गर्वहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 03:27 AM2021-01-20T03:27:15+5:302021-01-20T07:10:58+5:30

अवघ्या ३६ धावांत खुर्दा उडाल्यानंतर भारताला ४-० असा ‘व्हाईट वॉश’ मिळणार असेच भाकीत बहुतेक ‘गल्ली तज्ज्ञ’ वर्तवून मोकळे झाले होते; पण पुढे मेलबर्न आणि सिडनीतल्या कसोटीत भारताने ज्या अत्युच्च संघभावनेचे प्रदर्शन घडवले त्याने ऑस्ट्रेलियाच्या आत्मविश्वासाला चांगलेच खिंडार पाडले.

Ind Vs Aus Maratha Gadi, the master of success | मराठा गडी, यशाचा धनी!; भारताच्या विजयाने ऑस्ट्रेलियाचे पुरते गर्वहरण

मराठा गडी, यशाचा धनी!; भारताच्या विजयाने ऑस्ट्रेलियाचे पुरते गर्वहरण

Next

ऐंशीचे दशक मध्यावर असताना ग्रेग चॅपेल, डेनिस लिली, रॉड मार्श हे दिग्गज एकदम निवृत्त झाले आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाला उतरती कळा लागली. त्यावेळी ॲलन बॉर्डरने स्टीव वॉ, क्रेग मॅकडरमॉट, डीन जोन्स, डेव्हिड बून यासारख्या विशीबाविशीतल्या खेळाडूंना घेऊन कोच बॉबी सिम्पसनसोबत संघ बांधला. या तरण्या संघाला घेऊन बॉर्डर १९८७ च्या वर्ल्डकपसाठी भारतात आले तेव्हा ‘अंडरडॉग’ म्हणूनही त्यांना कोणी मोजले नव्हते. प्रत्यक्षात बॉर्डरच्या नवख्या संघाने ऑस्ट्रेलियाला पहिला क्रिकेट वर्ल्डकप जिंकून दिला. पुढच्या वीस वर्षांतल्या क्रिकेट विश्वावरच्या ऑस्ट्रेलियाच्या दादागिरीचा पाया बॉर्डरच्या त्या अनअनुभवी संघाने घातला. नेमका हाच चमत्कार अजिंक्य रहाणेच्या बॉर्डरच्या संघा इतक्याच अनअनुभवी, नवख्या भारतीय संघाने करून दाखवला. बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेची सुरुवात धक्कादायक होती. अवघ्या ३६ धावांत खुर्दा उडाल्यानंतर भारताला ४-० असा ‘व्हाईट वॉश’ मिळणार असेच भाकीत बहुतेक ‘गल्ली तज्ज्ञ’ वर्तवून मोकळे झाले होते; पण पुढे मेलबर्न आणि सिडनीतल्या कसोटीत भारताने ज्या अत्युच्च संघभावनेचे प्रदर्शन घडवले त्याने ऑस्ट्रेलियाच्या आत्मविश्वासाला चांगलेच खिंडार पाडले. प्रत्येक सामन्यात, प्रत्येक सेशनमध्ये नवा ‘हिरो’ उदयाला येत गेला. ऑस्ट्रेलियात भारत केवळ ‘ड्रॉ’वर समाधान मानण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच आला आहे, हे ऑस्ट्रेलियाला कळून चुकले.
 
या मालिकेतला शेवटचा ब्रिस्बेन सामना म्हणजे भारताच्या जिगरबाज लढ्याचा परमोच्च बिंदू ठरला. भारताच्या विजयाने ऑस्ट्रेलियाचे पुरते गर्वहरण केले. खेळात एकाची हार, एकाची जीत हे तर गृहीतच असते; पण हा जय-पराजय होतो कसा, यावर त्या संघाची लायकी ठरते. यजमान ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेनचा गड ३२ वर्षांत पहिल्यांदाच उद‌्ध्वस्त झाला. भारताने ज्या जिद्दीने, सफाईने तो केला त्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट रसिकांना विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. त्यांच्या लेखी भारताची ‘बी टीम’ खेळत होती आणि ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या तुलनेत सर्वार्थाने तगडा होता. कमिन्स, हेझलवुड, स्टार्क आणि लायन या चौघांच्या एकत्रित कसोटी बळींची संख्याच एक हजारच्या पुढे आहे. भारताच्या वॉशिंग्टन सुंदर, सिराज, नटराजन, सैनी, ठाकूर या तोफखान्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले पदार्पणच मुळी या मालिकेतले. विराट कोहली, आर. आश्विन, जडेजा, बुमराह, शमी, लोकेश राहुल हे सहा सर्वोत्तम खेळाडू संघाबाहेर गेलेले. चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता अजिंक्यने अनअनुभवी खेळांडूसह खिंड लढवली; पण हा नवा, तरुण भारत जिद्दीत कुठेही कमी पडला नाही.

‘आयपीएल’ला कोणी कितीही नावं ठेवो; पण याच ‘आयपीएल’ने गावखेड्यातून येणाऱ्या भारतीय खेळाडूंना जगातल्या कोणत्याही संघापुढे छाती काढून उभे ठाकण्याचा आत्मविश्वास दिला. यात उन्मत्तपणा नाही तर ‘विजय कधीच दूर नसतो, शेवटचा चेंडू पडेपर्यंत पराभव मानायचा नाही,’ ही जिद्द ‘आयपीएल’ने निर्माण केली. भारताची ‘बेंच स्ट्रेन्थ’ किती मजबूत आहे हे ऑस्ट्रेलियातल्या दमदार विजयाने सिद्ध केले. शुभमन गिल, ऋषभ पंत, हनुमा विहारी, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, सैनी हे खेळाडू ‘अंडर नाइन्टीन’मधून आले. वॉशिंग्टन सुंदर, नटराजन हे तर चक्क ‘नेट बॉलर’; पण या सर्वांमधली चुणूक ओळखणाऱ्या राहुल द्रविडचे कौतुक करावे लागेल. भारतीय क्रिकेटची नवी पिढी त्याच्या अनुभवी नजरेतून घडत आहे. लढाऊ बाणा निर्माण करणाऱ्या कोच रवि शास्रीचे योगदान नाकारता येणार नाही.


ब्रिस्बेनच्या विजयाने निवड समितीपुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. जगातले सर्वात श्रीमंत  मंडळ असल्याने ‘आयसीसी’त भारताची दादागिरी चालतेच तशी ती मैदानातही चालवू द्यायची तर कसोटीतले नेतृत्व यशाचा धनी असलेल्या अजिंक्य रहाणेच्या धीरोदात्त हाती सोपवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. ऐंशी-नव्वदच्या दशकानंतर पहिल्यांदाच अजिंक्य, रोहित आणि ठाकूरच्या रुपात तीन मराठी चेहरे क्रिकेट संघात होते ज्यांनी या मालिका विजयात मोलाची कामगिरी बजावली. ‘वन डे’च्या नेतृत्वासाठी रोहित आणि टी-ट्वेन्टीच्या नेतृत्वासाठी राहुल हे पर्याय तपासावे लागतील. सचिन तेंडुलकरने कर्णधारपद सोडून दिले आणि त्याची कारकीर्द आणखी बहरली. विराट कोहलीनेही सचिनप्रमाणेच कर्णधारपदाचा त्याग केला तर ते त्याच्या आणि संघाच्या हिताचे ठरेल. क्रिकेटमधली ‘सुपरपॉवर’ होण्याच्या मार्गावर असल्याची जाणीव करून देणारा ब्रिस्बेनचा विजय भारतीयांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील.
 

Web Title: Ind Vs Aus Maratha Gadi, the master of success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.