Independence Day 2021 : राजे आपण आहात, म्हणून लोकशाही सुरक्षित
By वसंत भोसले | Published: August 15, 2021 09:27 AM2021-08-15T09:27:40+5:302021-08-15T09:28:12+5:30
Celebrating Happy Independence Day 2021: भारताने पावणे तीन वर्षांच्या अथक अभ्यासू, विचारमंथन आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचारधारेच्या जोरावर २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना स्वीकारली.
- वसंत भोसले
भारतीय मतदारांनी नेहमी देशाची अखंडता, कणखर नेतृत्व आदींची पाठराखण केली. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करताच प्रचंड मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहिले. त्याच्या रेट्यामुळे इंदिराजींना आणीबाणी मागे घेऊन निवडणुका जाहीर कराव्या लागल्या. मार्च १९७७ मध्ये झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसचा पराभव केला आणि जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. सरकारातील मतभेदांमुळे केवळ पावणे तीन वर्षांत देशात प्रथमच मध्यावधी निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी, तसेच काँग्रेसला नाकारणाऱ्या मतदारांनीच त्यांना पुन्हा सत्तेवर बसविले. मतदारांनी केंद्रात बहुमतासह सरकार स्थापन करून सद्सद्विवेकबुद्धीचा पुरेपूर प्रत्यय दाखविला. भारतीय जनता मोठ्या प्रमाणात अशिक्षित आणि अर्धपोटी असली तरी तिने देशाच्या राष्ट्रहितासाठी जागृतपणे मतदान करून भारतीय लोकशाहीला बळकट केले आहे. १९७७ ते १९८० च्या दरम्यानचा हा मतदारांनी घडविलेला हा चमत्कार म्हणजे त्यांचा जाणतेपणा, परिपक्वपणा होता.
भारताने पावणे तीन वर्षांच्या अथक अभ्यासू, विचारमंथन आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचारधारेच्या जोरावर २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना स्वीकारली. राज्यघटनेतील तरतुदीनुसार लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींमधून आकाराला आलेल्या लोकसभागृहातून सरकार स्थापन करण्याची रचना निश्चित झाली. या राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्याने डिसेंबर १९५१ ते मार्च १९५२ दरम्यान साडेतीन महिन्यांत लोकसभेची पहिली निवडणूक झाली.
लोकसभेच्या आजवर झालेल्या १७ निवडणुकांपैकी चार मुदतपूर्व झाल्या. पहिल्या निवडणुकीत १० कोटी मतदार होते. २०१९च्या निवडणुकीत ९१ कोटी २० लाख ५० हजार ५७८ मतदार होते.
७ निवडणुकांमध्ये एकाही पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि आघाड्यांचे सरकार स्थापन झाले. त्यापैकी काँग्रेसने तीन, जनता दलाने दोन, तर भाजपने दोनवेळा आघाडी सरकार स्थापन केले.
आतापर्यंत १७ निवडणुका १० वेळा भारतीय मतदारांनी एका पक्षाला बहुमताने निवडून दिले.
एकाच पक्षाला बहुमत कितीवेळा
७ वेळा काँग्रेस
१ वेळा जनता पक्ष
२ वेळा भाजप