गांधी-नेहरूंमुळेच देशाचे दोन तुकडे झाले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 09:52 AM2022-08-14T09:52:08+5:302022-08-14T09:52:57+5:30
Independence Day : खरे स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मात्र रावीकिनारी भलताच झेंडा फडकत होता; कारण फाळणी झाली ती स्वातंत्र्याचीच. भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगळे देश त्या दिवशी जन्माला आले.
- संजय आवटे, संपादक, पुणे आवृत्ती
भारताचा तिरंगा सर्वप्रथम फडकला तो ३१ डिसेंबर १९२९च्या मध्यरात्री. तो कोठे फडकला माहीत आहे? आता पाकिस्तानात असलेल्या लाहोरमध्ये. रावी नदीच्या किनारी. याच लाहोर कॉंग्रेसमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झाला आणि मग पहाटे तिरंगा दिमाखात फडकला.
खरे स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मात्र रावीकिनारी भलताच झेंडा फडकत होता; कारण फाळणी झाली ती स्वातंत्र्याचीच. भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगळे देश त्या दिवशी जन्माला आले. ब्रिटिशांचा डाव जुना होता. काही झाले तरी त्यांना फाळणी करूनच हा देश सोडायचा होता. मीर जाफरला लाच देऊन, ‘तुला आम्ही नवाब करू’, अशी लालूच दाखवून, घरात भांडण लावून प्लासीची लढाई जिंकलेले इंग्रज जातानाही असेच घर फोडून जाणार होते.
‘फोडा आणि झोडा’चा अवलंब त्यांनी यापूर्वी अनेकदा केला होता. जिना अथवा इक्बाल यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी करण्यापूर्वीच त्यांनी बंगालच्या फाळणीचा प्रयत्न करून पाहिला होता! १८५७च्या उठावानंतर काही काळ मुस्लीम हे इंग्रजांसाठी खलनायक ठरले. ‘इंडियन नॅशनल कॉंग्रेस’च्या स्थापनेनंतर हिंदू खलनायक झाले. मग या दोघांना वेगळे पाडण्याचे कारस्थान आखले जाऊ लागले. १९०६ मध्ये मुस्लीम लीग स्थापन होणे, हे लॉर्ड मिंटोचेच ‘ब्रेनचाइल्ड’.
‘आयडिया ऑफ पाकिस्तान’ या पुस्तकात स्टिफन कोहेन म्हणतात, ‘पहिल्या महायुद्धात भारताने इंग्लंडला मदत केली होती; पण, १९४२मध्ये गांधीजींनी ‘चले जाव’ची घोषणा दिली. दुसऱ्या महायुद्धात मदत हवी असेल तर भारताला स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन द्या, अशी अट गांधींनी ठेवली. मग ब्रिटिशांनी मुस्लीम लीगला सोबत घेतले. लष्करात तेव्हा तसेही पंजाबी मुस्लिमांचे प्रमाण मोठे होते. कॉंग्रेस मदत करत नाही, हे समजल्यानेच ब्रिटिश साशंक झाले. मग मुस्लिम लीगला जवळ केले गेले.
‘डाव्या’ नेहरूंमुळे स्वातंत्र्यानंतर सोव्हिएत रशियासोबत भारत जाईल अथवा स्वयंप्रज्ञ राहील, अशी अटकळ जगभर बांधली जात होती. अशा वेळी, पाकिस्तान तरी आपल्यासोबत म्हणजे पाश्चात्त्य जगाबरोबर असेल आणि स्ट्रॅटेजिकली असा देश अधिक सोयीचा आहे, असा इंग्लंडचा होरा होता. हा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न गांधी-नेहरू यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसने केला. पण, त्यात त्यांना यश आले नाही. मुळात, ‘धर्माला राष्ट्रीयत्व मानण्याची चूक जो देश करील, त्याच्यावर आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य गमावण्याची वेळ येईल’, असा इशारा नेहरूंनी तेव्हाच दिला होता; पण, अखेर फाळणी झाली.
फाळणी झाल्याचे शल्य आजही आहेच; पण, ज्यांचा स्वातंत्र्य आंदोलनाशी अथवा तिरंग्याशी काहीही संबंध नव्हता, अशा संघटना त्याचा शोक करतात, हे हास्यास्पद आहे. काही वेळा तर गांधी-नेहरूंनाच या फाळणीसाठी जबाबदार धरेपर्यंत काहींची मजल जाते. मग त्यांना हे सांगायलाच हवे.
होय ! गांधी-नेहरू आणि पटेलांमुळेच भारताची दोन तुकड्यांत फाळणी झाली. हे तिघे नसते, तर देशाचे शे-पाचशे तुकडे झाले असते. क्रिप्स योजनेच्या निमित्ताने ब्रिटिशांचा हाच तर डाव होता. सुमारे साडेपाचशे संस्थानांमध्ये तेव्हा देश विभागला गेला होता. या सर्व संस्थानांनी स्वातंत्र्याची मागणी केली असती, तर अराजक निर्माण झाले असते. त्यासाठी संस्थानिकांना फोडण्याचा, वातावरण पेटवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी अखेरपर्यंत केला.
काश्मीर, हैदराबाद, जुनागढ या संस्थानांनी आडमुठेपणाचा कहर केला. मात्र, सरदार वल्लभभाई पटेल हे गांधीजींच्या तालमीत तयार झालेले पोलादी नेते होते. नेहरूंच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोहीम फत्ते केली आणि सगळी संस्थाने भारतात विलीन झाली! धर्माच्या पायावर उभा राहिलेल्या पाकिस्तानची पुढे पुन्हा फाळणी झाली. संविधानिक मूल्यांवर उभा ठाकलेला भारत मात्र दिमाखात झेपावत राहिला.