८३ देशांचे नागरिक आजही पारतंत्र्यात! आपण स्वतंत्र देशात जन्माला आलो, हे आपले भाग्य! 

By विजय दर्डा | Published: August 15, 2022 10:57 AM2022-08-15T10:57:21+5:302022-08-15T10:58:13+5:30

Independence Day : आज आपण ज्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या आनंदात न्हाऊन निघत आहोत; त्यामागे महात्मा गांधी यांची अहिंसा आणि त्याचबरोबर कित्येक महान क्रांतिकारकांनी सांडलेले रक्त आहे.

Independence Day : Citizens of 83 countries are still in captivity! We are born in a free country, this is our destiny! | ८३ देशांचे नागरिक आजही पारतंत्र्यात! आपण स्वतंत्र देशात जन्माला आलो, हे आपले भाग्य! 

८३ देशांचे नागरिक आजही पारतंत्र्यात! आपण स्वतंत्र देशात जन्माला आलो, हे आपले भाग्य! 

googlenewsNext

- विजय दर्डा  (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

चिनी उद्योग सम्राट जॅक मा यांना तुम्ही विसरला नसाल कदाचित! दीड वर्षांपूर्वी जगभर त्यांच्या नावाची बरीच चर्चा होती. तेव्हा त्याची संपत्ती होती सुमारे २३७० कोटी अमेरिकी डॉलर्स! आज त्यांचे नावही फारसे कुठे ऐकू येत नाही. सार्वजनिक स्वरूपात जॅक मा शेवटचे दिसले नोव्हेंबर२०२० मध्ये! त्यानंतर २०२१ मध्ये ते हॉंगकॉंगमध्ये दिसल्याचे सांगितले जाते. पण या दाव्याला कोणीही दुजोरा दिलेला नाही. तुम्हाला वाटेल, आज भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी मी हे जॅक माचे पुराण का लावले आहे?- कारण सत्तेला स्वातंत्र्य कसे दडपून टाकता येते, याचे हे महत्त्वाचे उदाहरण होय. 

चिनी सरकारने जॅक मा यांना आपल्या विक्राळ जबड्यात दाबून टाकले आहे. कारण?- ते खूपच श्रीमंत आणि बलवान होत होते. हुकूमशाही असते तेथे सत्तेपेक्षा कोणालाही जास्त ताकदवान होण्याची अनुमती असत नाही. अशा ताकदवानांची सत्तेला भीती वाटते, म्हणून जॅक मा यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीलाही संपवले जाते. जर जॅक मांचे हे हाल होत असतील तर त्यांच्या देशात सामान्य माणसाची काय स्थिती असेल? चीनच्या शिनजियांग प्रांतात नव्या शिक्षणाच्या नावाने सुमारे दहा लाख मुसलमानांना सुधारगृह नावाच्या कैदखान्यात बंद केले गेले. त्या देशात मशीद, चर्च किंवा मंदिर असे काहीही नाही. धर्मपरायण तिबेटलाही चीनने उध्वस्त केले, आणि आता तो देश तैवानला गिळंकृत करू पाहतोय. 

- ही कहाणी केवळ चीनचीच नाही. तर पूर्ण जगामधल्या अशा जवळपास ८३ देशांची आहे, जिथे  कोणी ना कोणी हुकूमशहा सत्तेवर बसलेला आहे. धर्माच्या नावाने हुकूमशाही फोफावली आहे. पुतीन सत्तेवर येण्याच्या आधी रशियात अनेक बडे उद्योगपती  असत. पण आता त्यांचा काही पत्ता लागत नाही. सगळे नष्ट झाले. इराण आणि मध्यपूर्वेतील परिस्थिती सर्वांना ठाऊक आहे. पाकिस्तानमध्ये नावाला लोकशाही आहे. पण तिथल्या सत्तेवर ताबा मात्र लष्कराचा आहे. म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्याचे आपण गेल्याच वर्षी पाहिले. पाकिस्तानमधल्या सत्ता पालटाचे किस्सेही आपल्याला नवीन नाहीत. श्रीलंकेचे हाल
सध्या आपण पाहतोच आहोत.  उत्तर कोरियाची वेदनादायी कहाणी पुन्हा पुन्हा समोर येते. 

किम जोंगउन नावाच्या सणकी हुकूमशहाने कोट्यवधींच्या लोकसंख्येला गुलाम केले आहे. लोक कसेबसे जगतात इतकेच. तिथे कुणी आपल्या मर्जीने आपली केशरचनासुद्धा बदलू शकत नाही. हुकूमशहाचा फोटो घरात लावला नाही तर मृत्युदंडाला सामोरे जावे लागते. शेजारी लोकशाही असलेला दक्षिण कोरिया दररोज प्रगती करतो आहे. आफ्रिकी देशातही अनेक हुकुमशहा बसले आहेत. त्यांना हटवू पाहण्याचा प्रयत्न करणारे धर्मांध लोकही हुकुमशहांपेक्षा कमी नाहीत. या कहाण्या  यासाठी सांगतो आहे की स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला समजावा. 

स्वातंत्र्याचा श्वास आपल्याला घेता यावा म्हणून प्राणांचीही पर्वा न करणाऱ्या आपल्या पूर्वजांप्रती आपण नतमस्तक झाले पाहिजे. मी नेहमी म्हणतो, माझी दिवाळी महात्मा गांधी आहेत, माझी होळी पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आणि त्यांच्यासारखे हजारो वीर आहेत. माझा भरवसा महावीर आणि गौतम बुद्धावर आहे. माझा विचार शिवाजी महाराजांचा आहे. कारण मी स्वातंत्र्य सेनानी असलेल्या घरात जन्माला आलो. माझे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जवाहरलाल दर्डा पावणेदोन वर्ष जबलपूरच्या कारागृहात कैद होते.  

आज आपण ज्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या आनंदात न्हाऊन निघत आहोत; त्यामागे महात्मा गांधी यांची अहिंसा आणि त्याचबरोबर कित्येक महान क्रांतिकारकांनी सांडलेले रक्त आहे. किती मातांनी या लढ्यात आपले सुपुत्र गमावले, किती बहिणींचे भाऊ गेले आणि किती स्त्रिया विधवा झाल्या; याची मोजदाद कधीतरी कुणाला करता येऊ शकेल का? या देशाच्या स्वातंत्र्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी बलिदान दिले आहे. अगणित लोक इंग्रजांच्या कारागृहात वर्षानुवर्षे बंदिवान राहिले. 

स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांचा एक मोठा काळ निघून गेला आहे. स्वातंत्र्य सैनिकांची पिढी आता जवळपास आपला निरोप घेऊन गेली असून स्वातंत्र्यानंतरच्या तिसऱ्या पिढीकडे आता सूत्रे आली आहेत. सामाजिक भान थोडे पातळ होत चालले आहे. नातेसंबंधात थोडी का होईना फट पडलेली दिसते. प्रेमभावाला काहीशी ओहोटी लागलेली दिसते, परंतु राष्ट्राबद्दलचे प्रेम मात्र अजून जसेच्या तसे आहे; ही अभिमानाची गोष्ट होय! स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला इतके मोठे स्वरूप दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी आभारी आहे. प्रत्येक घरी तिरंगा फडकवण्याची घोषणा त्यांनी केली. सामान्य माणसालाही दररोज तिरंगा फडकवता आला पाहिजे. भारतीय नागरिकाला तो अधिकार मिळावा, यासाठी मी राज्यसभेत सतत प्रयत्न केले. असा अधिकार मिळणे हे स्वातंत्र्याला आणखी शिखरावर नेणे होय!

क्रांतिकारकांनी जो तिरंगा आपल्याकडे सोपवला त्याचा सन्मान आपल्याला सांभाळायचा आहे. तरुणांनो, अभिमानाने रोज तिरंगा फडकवा. गेल्या महिन्यातच मी काश्मीरच्या खडतर अशा खोऱ्यात सीमेवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांना भेटून आलो. कैफी आजमी यांच्या ओळी तिथे माझ्या ओठावर येत होत्या... ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’....आणखी एक गोष्ट जरूर सांगावीशी वाटते. देशाने अभिमान वाटावा अशी प्रगती केलझे खरे, पण आजही असे लोक आहेत ज्यांना दोन वेळा अन्न मिळत नाही.

आजही अनेकजण रोजगारासाठी धडपडत असतात. खांद्यावर किंवा सायकलवर आप्ताचा मृतदेह नेण्याचे वेदनादायी दुर्भाग्य आजही अनेकांच्या वाट्याला येते. अनेकांच्या बहिणी आणि मुली क्रौर्याची शिकार होतात. आदिवासींचे जीवन आजही सुखाच्या, आनंदाच्या प्रतीक्षेत आहे. आपण या सर्व दुखण्यापासून मुक्ती मिळवली पाहिजे. यासाठी केवळ सरकारवर भरवसा ठेवता येणार नाही. सरकारच्या मदतीने आपल्यालाही पूर्ण ताकदीने काम करावे लागेल, तसे झाले तरच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद समाजातल्या कमजोर लोकांच्याही वाट्याला येईल; आणि आपणही खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याच्या अमृताचा आनंद घेऊ शकू. 
- असे झाले तरच  आपण सारे अभिमानाने म्हणू शकू, ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’...
जय हिंद!.

Web Title: Independence Day : Citizens of 83 countries are still in captivity! We are born in a free country, this is our destiny!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.