Independence Day: गांधीजींच्या विचारांना तिलांजलीने अस्थिरता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 05:14 AM2020-08-15T05:14:54+5:302020-08-15T05:15:09+5:30

आपण राष्ट्र म्हणून आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा साऱ्या क्षेत्रांत महात्मा गांधींनी सांगितलेल्या मूल्यांना गेल्या ७३ वर्षांत तिलांजली दिल्यामुळे देशात अस्थिरता वाढली आहे. आपल्याला परत राष्ट्रपित्याकडे जावेच लागेल.

Independence Day Instability due to forgetting mahatma gandhis thought | Independence Day: गांधीजींच्या विचारांना तिलांजलीने अस्थिरता

Independence Day: गांधीजींच्या विचारांना तिलांजलीने अस्थिरता

Next

- डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ गांधीवादी नेते

महात्मा गांधींना आज जगभर सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे. हजारो विचारवंत आपापल्या दृष्टिकोनातून त्यांच्या विचारांचा सखोल अभ्यास करून सूक्ष्म परीक्षण करीत आहेत. त्यांच्या विचारांचा आजच्या संदर्भात पुनश्च विचार करून रोज नवे ग्रंथ प्रकाशित होत आहेत.

लोकशाहीप्रणाली, पर्यावरण, सामाजिक ऐक्य, महायुद्ध, नरसंहार, रोगराई यांचे धोके अखिल मानवतेला चिंताग्रस्त करीत असताना सर्वजण गांधींच्या विचारांचा आश्रय घेत आहेत. त्यांचा जन्मदिन २ आॅक्टोबर. तो ‘अहिंसा दिन’ म्हणून सर्व राष्ट्रांमध्ये पाळला जातो.

पर्यावरण, अहिंसा, शांततापूर्ण अन्यायाचा प्रतिकार, जगातील सर्वांच्या किमान गरजा मूठभरांच्या हावरटपणाला लगाम घातला तर सहज भागातील हे विचार त्यांनी विश्वाला दिले. मानवाने युद्ध टाळले तर गरिबांचे निर्मूलन करणे शक्य आहे, हे त्यांनी सांगितले. ते सत्ताधीशांनी मनापासून मान्य केले नसले तरी सिव्हिल सोसायटीला ते मान्य झाले आहे. गांधींना त्यांच्या निधनानंतर विश्वात अधिक लोकांना जवळचे वाटू लागले आहेत.

याच्या उलट परिस्थिती भारतात आहे. त्यांनी ज्या पक्षातर्फे स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व केले, ज्या कॉँग्रेस पक्षाचे ते पिता आहेत त्यालाच त्यांचे विस्मरण झाले. अजून सामान्य भारतीय जनता त्यांना राष्ट्रपिता मानते, हे नशीब म्हणायचे. हिंदुत्ववाद्यांनी ७२ वर्षांपूर्वी त्या वृद्धावस्थेत शारीरिक हत्या केली; पण अजूनही त्यांना गांधीला संपविता आलेली नाही. ते गांधींच्या चित्रावर पिस्तुलाने गोळ्या झाडतात. नथूराम गोडसे या खुनी माणसाच्या शौर्याचे गौरवीकरण करतात. नितीन सोनवणे नावाचा एक तरुण गेली चार वर्षे जगभर सायकलवरून फिरतो आहे. त्याने गांधींचा फोटो सायकलीवर लावलाय. सर्व खंडांतून त्याच्या शांतीयात्रेला भिन्न जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. गांधींच्या देशातून आलेला माणूस त्याचे स्वागत होते. भोजन, निवास याची सोय होते.
भारत एक देश म्हणून राष्ट्रपित्याला विसरला नाही; पण त्यांच्या विचारांपासून आपण नक्की फार दूर गेलो आहोत. कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करताना आपली एवढी तारांबळ का व्हावी? कारण आपण त्यांच्या स्वच्छता व आरोग्य या विषयांना दूर सारले.

स्वातंत्र्याचा विचार करतानाच त्यांनी नव्या राष्ट्राच्या बांधणीचा विचार सुरू केला होता. स्वराज्यात राष्ट्र उभारायचे कसे, हे त्यांनी पंधरा कार्यक्रमांद्वारे सांगून ठेवले आहे. आपण राष्ट्र म्हणून आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा साऱ्या क्षेत्रांत महात्मा गांधींनी सांगितलेल्या मूल्यांना गेल्या ७३ वर्षांत तिलांजली दिल्यामुळे देशात अस्थिरता वाढली आहे. आपल्याला परत राष्ट्रपित्याकडे जावेच लागेल.

Web Title: Independence Day Instability due to forgetting mahatma gandhis thought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.